Join us  

केळीच्या पानात जेवणाचे फायदे काय? केळी आरोग्यास उत्तम, तशीच केळीची पानेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 1:56 PM

केळीच्या पानात जेवण्याचे आहेत अनेक फायदे. जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच आरोग्य राखण्यास केळीच्या पानाचा होतो खूप फायदा. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की 6 कारणांसाठी केळीच्या पानात जेवायलाच हवं. ही कारणं कोणती?

ठळक मुद्दे केळीच्या पानात अनेक खनिजं असतात. या खनिजांन पॉलीफेनॉल्स म्हटलं जातं.केळीच्या पानात जेवायला वाढल्यास पदार्थ केळीच्या पानतील पॉलीफेनॉल्स शोषून घेतात आणि जेवणाद्वारे ते आपल्या शरीरात जातात.केळीच्या पानात जेवल्यानं पोटाचे विकार दूर होतात.

श्रावणात, गणपती बसल्यावर बहुतांश घरात सत्यनारायणाची पूजा केली जाते. य पुजेसाठी केळीचे खांब आणि प्रसादासाठी केळीची पानं गरजेची असतात. केळीच्या पानाशी आपला संबंध येतो तो एवढाच. फारतर अनेकजणी उकडीचे मोदक वाफवायला ठेवताना केळीच्या पानाचा उपयोग करतात. पूर्वी आपल्याकडे केळीच्या पानावर जेवलं जायचं हेच जणू आपण विसरुन गेलो आहे. अनेकजणी तर नैवैद्यासाठी केळीच्या पानाच्या आकाराचं स्टीलचं ताट घेऊन येतात आणि त्यात नैवेद्य दाखवतात. आधुनिक झालो आहोत म्हणून ज्या गोष्टी आरोग्याच्या फायद्यासाठी त्याही आपण मागे सोडत जात आहोत ही खरंतर दुखाची बाब आहे. पण आज अजूनही आपल्या देशातल्या काही भागात केळीच्या पानावर जेवलं जातं. केळीच्या पानावर जेवण्याची ही हजारो वर्षांपूर्वीची परंपरा आजही दक्षिण भारतातील राज्यात दिसून येते.

छायाचित्र- गुगल

दक्षिण भारतात आजही अनेक घरात केळीच्या पानावर जेवतात. पाहुणे आले की त्यांनाही केळीच्या पानातच वाढलं जातं. इतकंच नाही तर अनेक हॉटेल आणि रेस्टॉरण्टमधेही केळीच्या पानातच पदार्थ वाढले जातात. इथे केळीची पानं परवडतात हा मुद्दा नसून ती आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळेच ती जेवणासाठी म्हणून वापरली जातात. बंगळूर येथील जीवोत्तमा आयुर्वेद केंद्राचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शरद कुलकर्णी यांनी केळीच्या पानात जेवणाचे आरोग्यदृष्टया अनेक फायदे सांगितले आहेत.

छायाचित्र- गुगल

केळीच्या पानात जेवावं कारण1. आयुर्वेद तज्ज़ डॉ. शरद कुलकर्णी म्हणतात की केळीच्या पानात अनेक खनिजं असतात. या खनिजांन पॉलीफेनॉल्स म्हटलं जातं. हा गुण प्रामुख्याने ग्रीन टीमधे असतो. पॉलीफेनॉल्स हे नैसर्गिक अँण्टिऑक्सिडण्ट असून ते फ्री रॅडिकल्स अर्थात मुक्त मुलक ( कण) यापासून आपलं रक्षण करतात . त्यामुळे अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं.

2. केळीचं पानं आपण थेट खाऊ शकत नाही. कारण ते पचायला अवघड असतं. पण केळीच्या पानात जेवायला वाढल्यास पदार्थ केळीच्या पानतील पॉलीफेनॉल्स शोषून घेतात आणि जेवणाद्वारे ते आपल्या शरीरात जातात. केळीचं पान आपल्याला पोषण देतं ते असं. तसेच केळीच्या पानात जीवाणूविरोधी घटक असतात. हे घटक जेवणातील सर्व कीटाणुंना मारतात. यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

3. केळीच्या पानात जेवताना पदार्थांना खास चव येते. याचं कारण म्हणजे केळीचं पान. केळीच्या पानावर एक मेणासारखा सूक्ष्म थर असतो. हा थरच जेवणाला आणखी चविष्ट करतो. जेव्हा केळीच्या पानात गरमागरम जेवण वाढलं जातं तेव्हा केळीच्या पानावरील हा मेणासारखा थर वितळतो आणि तो पदार्थात समाविष्ट होऊन पदार्थांना विशिष्ट चव देतो.

छायाचित्र- गुगल

4. केळीच्या पानात जेवणं हे पर्यावरणदृष्ट्याही खूप सुरक्षित असतं. केळीच्या पानाचं विघटन लवकर होतं. तसेच केळीचं पान जेवायला घेताना त्याची विशेष स्वच्छता करावी लागते असंही नाही. केवळ थोडया पाण्यानं ती स्वच्छ होतात. स्वच्छतेचा विचार करता केळीचं पान जेवणासाठी अतिशय सुरक्षित असतं.

5. धातुच्या ताटात जेवल्यानंतर आपण ते ताट साबणानं स्वच्छ करतो. पण ताटात साबणाचे अवशेष राहून नंतर ते त्यात वाढल्या जाणार्‍या जेवणाला दूषित करण्यास कारणीभूत ठरतात. पण केळीचं पान जेवायला घेताना त्याला साबणानं धुण्याची गरज नसते. त्यामुळेच केळीचं पान जेवणासाठी वापरल्यास आपण जेवण हे नक्कीच रसायनमुक्त होईल. केळीचं पान आकारानं मोठं असल्यानं सर्व पदार्थ एकाचवेळी व्यवस्थित वाढले जातात.

6. याशिवाय केळीच्या पानावर रोज जेवल्यास आपले केस चांगले होतात. केळीच्या पानात असे गुणधर्म असतात जे शरीरावरील फोड आणि गाठी यापासून आपलं रक्षण करतात. केळीच्या पानात जेवल्यानं पोटाचे विकार जसे बध्दकोष्ठता, अपचन, गॅसेस होणे यासारख्या समस्या दूर होतात.

हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर केळीच्या पानात जेवायलाच हवं!