Join us  

9 दिवसांच्या उपवासासाठी काय तयारी केली? ही यादी घ्या, उपवासाचे टेन्शन कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 6:10 PM

उपवासाला चालणारे पदार्थ आणि त्यासाठी लागणारी तयारी नवरात्रीच्या आधीच करुन ठेवली तर ऐनवेळी ताण येणार नाही...

ठळक मुद्देउपवासासाठी आधीच थोडी तयारी करुन ठेवली तर तुमची नक्कीच दमछाक होणार नाहीउपवासाच्या तयारीसाठी काही सोप्या आणि सहज करता येतील अशा गोष्टींची यादी

कोणतेही सणवार म्हटले की घरातील महिलांची धावपळ आलीच. विभक्त कुटुंब पद्धती, नोकरीचे ताण यांमुळे तर सणवार आले की महिलांना एकप्रकारेचे दडपण येते. नवरात्रात बसणारे घट, त्यासाठी  लागणारे सामान, दररोजची देवीची उपासना, पूजा, आरती, नैवेद्य हे करता करता महिला अगदी दमून जातात. यातच देवीचे उपवास करणेही अनेकदा महिलांचीच जबाबदारी असते. ही सगळी व्रतवैकल्ये महिला मनापासून स्त्री मनापासून करत असली तरी तिची दमछाक होते, यातच पुढील ९ दिवस उपवास म्हणजे तिला थकवाही येऊ शकतो. पण नवरात्रीचे नऊ दिवस सगळे रितसर, वेळच्या वेळी व्हावे यासाठी तिच्यात एनर्जी तर असायलाच हवी. ती टिकून राहण्यासाठी उपवास असतानाही तिने चांगले आणि आरोग्यदायी खाणे गरजेचे आहे. पण असे होऊ नये म्हणून उपवासासाठी आधीच थोडी तयारी करुन ठेवली तर तुमची नक्कीच दमछाक होणार नाही. तसेच ऐनवेळी भूक लागलीच तर हाताशी खायला हेल्दी पर्यायही असतील. तेव्ही उपवासाच्या दृष्टीने आधीपासून करता येईल अशा तयारीविषयी थोडक्यात जाणून घेऊया...

१. उपवासाच्या बऱ्याचशा पदार्थांना दाण्याचा कूट लागतो. तेव्हा दाणे भाजून कूट करुन ठेवण्याचे काम तुम्ही आधीच करुन ठेऊ शकता. जेणेकरुन ऐनवेळी तुम्हाला हा कूट पटकन वापरता येईल.

२. उपवासाच्या दिवसात काही वेळा एकदम एनर्जी डाऊन वाटते, अशावेळी खाण्यासाठी खजूर रोल, दाण्याचे लाडू, सुकामेव्याचे लाडू असे पदार्थ घरच्या घरी करुन ठेऊ शकता. 

( Image : Google)

३. ऑक्टोबर हिट असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी ताक, सरबत, शहाळे, सोलकढी ही पेये घेऊ शकता. सरबतासाठी लिंबू आणून ठेवणे, ताकासाठी दही लावून ठेवणे अशी तयारी करुन ठेवता येते.

४. उपवासाला नारळ चालतो, नारळात आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात. तुम्ही नारळाची चटणी करु शकता किंवा उपवासाच्या पदार्थांवर नारळ घालू शकता. यासाठी नारळ फो़डून खोवून ठेवल्यास ऐनवेळी वापरता येऊ शकतो.

५. सतत साबुदाणा किंवा बटाटा खाण्यापेक्षा उपवासाच्या थालिपीठाची भाजणी, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा पीठ हे आरोग्यदायी असते. हे पचायला तर हलके असतेच पण याने पोटही भरते. त्यामुळे ही पीठे आधीच दळून ठेवली तर ऐनवेळी तुमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध राहतात.

( Image : Google)

६. उपवासाचे बटाटा पापड, साबुदाण्याच्या पापड्या, चकल्या, घरी केलेले वेफर्स हे आपण घरच्या तेलात किंवा तुपात तळतो त्यामुळे ते हेल्दी असते. बाहेरच्या वेफर्समध्ये किंवा पापड्यांमध्ये काय घटक आहेत, ते कोणत्या तेलात तळलेले आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे घरगुती पद्धतीने केलेले हे पदार्थ केव्हाही चांगले. तेव्हा शक्यतो हे पदार्थ उन्हाळ्यात करुन ठेवावेत किंवा घरगुती ठिकाणहून आणून ठेवावेत.

७. साजूक तूप हा उपवासाला लागणारा एक महत्त्वाचा घटक आहे. हे तूप तुम्ही आधीच नियोजन करुन लोणी करुन कढवून ठेवले तर ऐनवेळी त्याचा ताण येणार नाही.

८. या उपवासाला भेंडी, राजगिरा, लाल भोपळा, काकडी, रताळे यांसारख्या भाज्या चालतात. तसेच उपवासाला सर्व प्रकारची फळे चालतात. या भाज्या आणि फळे एक किंवा दोन दिवस आधीच आणून निवडून ठेवावीत.

९. उपवासामुळे अॅसिडीटी वाढण्याची शक्यता असते. अशावेळी दही, दूध, ताक हे पदार्थ आहारात असायला हवेत. दूध आणून नवरात्री सुरू होण्याच्या आधी दही लावले तर हे दही पुढचे दोन ते तीन दिवस नक्की खाता येऊ शकते.   

टॅग्स :अन्नमहिलानवरात्री