चिवडा म्हणजे दिवाळसणाची जान.... एकवेळ तुम्ही चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळे, शेव असे पदार्थ केले नाही तरी चालेल. पण चिवडा मात्र हमखास झालाच पाहिजे. लाडू आणि चिवडा या दोन गोष्टींशिवाय दिवाळीची मजा नाही. दिवाळी अवघी दोन दिवसांवर आली आहे आणि तरीही प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची चिवडा रेसिपी अजून कशी व्हायरल झाली नाही, असा विचार करत असाल, तर तुमची ही प्रतिक्षा आता संपली आहे. ''आपने क्या सोचा इस दिवाली चिवडा नहीं होगा..... ?'' असा प्रश्न विचारतच संजीव कपूर यांनी त्यांची नमकीन चंपाकली ही स्पेशल चिवडा रेसिपी नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे.
पोह्याचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा, उपवासाचा चिवडा असे चिवड्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही नक्की खाल्ले असणार. पण यासगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिवड्यांचा स्वाद एकाच चिवड्यात आणून खमंग, खुसखुशीत मिक्स चिवडा कसा करायचा हे संजीव कपूर यांनी या रेसिपीमध्ये सांगितलं आहे. हा चिवडा प्रकार अतिशय वेगळा असून तुम्ही तो नक्कीच ट्राय करून बघा. हा चिवडा तुमच्या दिवाळीच्या फराळाला चार चाँद लावून जाईल आणि पाहुण्यांची वाहवा मिळविणारा ठरेल, असं खुद्द संजीव कपूर यांनीच सांगितलं आहे.
मिक्स चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य
तेल, कॉर्नफ्लेक्स, बटाट्याचा वाळलेला किस, पोहे, साबुदाणा, काजू, बदाम, शेंगदाणे, मुगाची डाळ, कढीपत्ता, तिखट, मीठ, साखर, आमचूर पावडर, काळं मीठ, भाजलेली बडीशेप आणि भाजलेले धणे.
कसा करायचा संजीव कपूर स्टाईल मिक्स चिवडा?
- सगळ्यात आधी तर कढईत तेल तापायला ठेवा.
- तेल चांगलं तापलं की त्यात एक वाटी कॉर्नफ्लेक्स घाला आणि ते तळून बाजूला काढून घ्या.
- आता तेलात एक वाटी बटाट्याचा वाळलेला किस टाका आणि तो देखील तळून कढईबाहेर काढून घ्या.
- यानंतर एक वाटी पोहे टाका आणि ते तळून घ्या.
- पोहे तळून झाल्यानंतर अर्धी वाटी साबूदाणा टाका आणि तो ही तळून कढईबाहेर काढून घ्या.
- आता सगळ्यात आधी बदाम, त्यानंतर काजू आणि त्यानंतर शेंगदाणे असे वेगवेगळे टाकून तळून घ्या.
- यानंतर मुगाची डाळ अर्धीवाटी घ्या आणि ती देखील तेलात टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- यानंतर कढीपत्त्याची पानेही तळून घ्या.
- तळण्याचं सगळं काम संपल्यानंतर चिवड्याचा मसाला करण्याच्या तयारीला लागा.
- मसाला तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे पीठी साखर, चवीनुसार तिखट आणि मीठ, एक चमचा काळं मीठ, आमचूर पावडर असं सगळं टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- आता आपण ज्या ज्या गोष्टी तळल्या आहेत त्या सगळ्या एकत्र करा. त्यामध्ये एक चमचा भाजलेली बडीशेप आणि भाजलेले धणे हातावर चोळून थोडे रगडून टाका.
- सगळ्यात शेवटी आपण जो मसाला तयार केला आहे तो त्या चिवड्यात टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र केलं की झाला संजीव कपूर स्टाईल मिक्स चिवडा तयार...