आपण जे खातो पितो त्यामुळे आपली भूक भागते, तहान भागते. पण केवळ या दोनच गोष्टींसाठी आपण खात पित नाही. तर आनंद, समाधान या मानसिक भावनांचाही खाण्यापिण्याशी जवळचा संबंध असतो. गेल्या दिड वर्षांपासुन जगभरात कोरोनाचा प्रभाव आहे. अनेक महिने जगातील जवळजवळ सर्वजण आपल्या घरातल्या चार भिंतीआड दडलेले होते. लोकं समाजमाध्यमांच्याद्वारे व्यक्त होत होते. त्याकाळात आणि अजूनही समाजमाध्यमांवर खाण्यापिण्याच्या पोस्ट व्हायरल होण्याचं प्रमाण खूप होतं आणि आजही आहे. अनेकांनी या तणावाच्या काळात आपला आनंद पदार्थ बनवण्यात, नवनवीन पदार्थ करुन घरातल्यांना खिलवण्यात आणि पदार्थांचा आस्वाद घेण्यात शोधला.
छायाचित्र- गुगल
अभ्यासक , डॉक्टर, मनोविकार तज्ज्ञ म्हणतात, याचं कारण म्हणजे खाण्याचा आणि मानसिक स्थितीचा थेट संबंध असतो. इतकंच नाही तर आपल्या मानसिक स्थितीचा परिणाम आपल्या आतड्यांच्या कार्यावर होतो, पचनावर होतो. घाबरलेलं असताना अनेकांचं पोट बिघडतं, त्यांना जुलाब होतात. तर अनेकांना मानसिक ताण आल्यावर भूकच लागत नाही.
हे सर्व होतं कारण पोट आणि मेंदू यांच्यातल्या लाखो नसा आणि चेता पेशी एकमेकांना जोडलेले असतात. म्हणूनच पोटात जे हार्मोन्स आणि रसायनं निर्माण होतात त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. जेव्हा पोटात सेरेटॉनिन हे आनंदी हार्मोन नावानं ओळखलं जाणारं हार्मोन निर्माण होतं तेव्हा ते मेंदूवर अवसाद विरोधी ( अँण्टि डिप्रेसेंट) म्हणून काम करतं. ‘ मायथाली, आरोग्य वल्र्डच्या आरोग्य तज्ज्ञ डॉ. मेघना पासी म्हणतात की आपण जे पदार्थ आहारात घेतो त्यातल्या काहींचा परिणाम म्हणून आपला मूड सुधारतो तर काहींमुळे आपला मूड बिघडतोही. म्हणूनच आपल्याला आनंदी करणारे, मूड चांगला ठेवणारे पदार्थ कोणते आणि मूड खराब करणारे पदार्थ कोणते हे माहित असणं आवश्यक आहे.
मूड चांगला करणारे पदार्थ
* केळ - केळात असलेलं बी6 जीवनसत्त्वं हे डोपामाइन आणि सेरोटॅनिन सारखे फील गुड हार्मोन्सला स्त्रवण्यास मदत करतं. केळातली नैसर्गिक साखर ट्रिप्टोफॅन नावाचं अमीनो अँसिड बनवण्यास मदत करते. त्यामुळे आनंदी करणारं सेरोटॅनिन जास्त प्रमाणात स्त्रवतं.
* सुकामेवा आणि बिया- बदाम, शेंगदाणे, आक्रोड, डांगराच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया आणि तीळ यांच्यात प्रथिनं भरपूर असतात आणि ट्रिप्टोफॅन नावाचं अमीनो अँसिड असतं. हे घटक ताण तणाव दूर करतात.
* शेंगा आणि डाळी- यात तंतूमय घटक, फोलेट आणि प्रथिनं भरपूर असतात. शिवाय शेंगा आणि डाळींमधे ‘ फील गुड’ पोषक घटक असतात. हे घटक सेरोटॅनिन, डोपमाइन, नोरेपाइनफ्राइन या हार्मोन्सचं स्त्रवण्याचं प्रमाण वाढवतात आणि त्याचा परिणाम म्हणून मूड चांगला होतो.
छायाचित्र- गुगल
* धान्यं- गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी सारखी धान्यं यात ब1, ब5, ब6 आणि ब12 ही जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. ही जीवनसत्त्वं हॅप्पी हार्मोन्सच्या निर्मितीला मदत करतात. आणि मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवतात.
* हळद- हळदीत करक्यूमिन नावाचा घटक असतो. या घटकाचा सूज आणि दाहविरोधी चांगला उपयोग होतो. हा घटक ताण निर्माण करणारा कॉर्टिसॉल नावाच्या हार्मोन्सची पातळी कमी करुन डिप्रेशन कमी करण्यास मदत करतो.
* बीट- बीटामधे नैसर्गिक पॉलीफेनॉल्स असतात. हे पॉलीफेनॉल्स सेरोटॅनिन या हार्मोनच्या निर्मितीस मस्दत करतात. यामुळे आपला मूड चांगला होतो.
* टमाटा- टमाट्यात लायकोपीन नावाचं अँण्टिऑक्सिडण्ट असतो. हा अँण्टिऑक्सिडण्ट आपल्या मेंदूचं संरक्षण करण्यास महत्त्वाचा असतो. हा घटक नैराश्य वाढवणार्या दाहाविरुध्द लढतो.
या पदार्थांनी होतो मूड खराब
छायाचित्र- गुगल
* सोडा आणि अति साखर असलेली पेय- सोडा आणि ज्यात रिफाइंड साखरेचं प्रमाण जास्त असतं अशी पेयं आपला मूड खराब करतात , चिडचिडीस कारणीभूत ठरतात. या पेयात असलेली साखर थेट रक्तात शोषली जाते. यामुळे पटकन ऊर्जा वाढते. पण जशी ऊर्जा वाढते तशी ती पटकन कमीही होते. त्याचा परिणाम मूड बदलण्याच्या समस्येवर होतो.
* प्रक्रिया केलेले पदार्थ- प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधे मीठ, साखर, तेल आणि प्रिझव्र्हेटिव्ह्ज जास्त असतात. हे सर्व घटक शरीरातला आळस वाढवतात आणि स्वभाव चिडचिडा करतात.
* कॉफी- कॉफी पिल्यामुळे शरीरास तत्काळ ऊर्जा मिळते. मेंदू सतर्क होतो. मात्र कॉफीतील घटकांमुळे भीती आणि ताणही वाढतो.
* फ्लॉवर-कोबी- या भाज्या मूडवर नकारात्मक परिणाम करतात. या भाज्यांमुळे पोटात गॅस तयार होतो. पोटात गडबड झाली की त्याचा परिणाम आपोआपच मूड जाण्यावर होतो.