Join us  

जीवापाड प्रिय चहातच भेसळ असेल तर? कशी ओळखाल चहा पावडरीतली भेसळ? हे घ्या उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 2:57 PM

आपण दिवसभर कित्येकदा चहा पितो. पण या चहा पावडरमध्येही भेसळ असू शकते याची आपल्याला कल्पना नसते. चहाची किंमत जास्त असल्याने त्यामध्ये इतर वनस्पतींच्या पानाचा भुगा किंवा चक्क माती मिक्स केली जाऊ शकते.

ठळक मुद्देचहा पावडरीतील भेसळ ओळखण्याची सोपी पद्धत माहित करुन घ्याभेसळ करायला लोक एकही पदार्थ सोडत नाहीत

चहा म्हणजे भारतीयांसाठी अमृतच. अनेकांसाठी चहानेच दिवस सुरु होतो आणि चहानेच संपतो. कोणाच्या घरी गेलो की, मिटींगमध्ये, कोणी रस्त्यात भेटले की आणि अन्य काही कारणांसाठी चहा हवाच. चहा हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. ग्रामीण भागात तर अजूनही एकमेकांकडे चहाला बोलवायची पद्धत आहे. इंग्रजांनी सुरू केलेला चहाचा व्यवसाय भारतात स्थिरावला आणि आता त्याला विशेष महत्त्वही आले. आसामचा चहा तर जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या पारंपरिक चहाबरोबरच लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी, जिंजर टी, आईस टी असे चहाचे वेगवेगळे प्रकार घेतले जातात. अनेक घरांमध्ये तर दिवसातून ४ ते ५ वेळा चहा होतोच. शहरांमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारची चहाची दुकाने पाहायला मिळतात. यामध्ये उकळा चहा, बासुंदी चहा, गुळाचा चहा असे एक ना अनेक प्रकार असतात. 

 

आपण अतिशय आवडीने पित असलेल्या या चहाच्या पावडरमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. सध्या पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही पदार्थात भेसळ होऊ शकते. चहा चॉकलेटी रंगाचा असल्याने त्यामध्ये माती, इतर पानांचा चुरा किंवा अन्य काही गोष्टी असण्याची शक्यता असते. आता ही भेसळ घरच्या घरी तुम्ही अगदी सहज ओळखू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटी चाचणी करावी लागेल. फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (Fssai) याबाबत जागृती करणारा एक व्हिडिओ नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी भेसळ ओळखायची चाचणी कशी करायची याबाबत सांगितले आहे. पाहूया ही चाचणी करायच्या पायऱ्या...

1. फिल्टर पेपर घ्यायचा, त्यावर चहा पावडर घ्यायची

2. पाण्याचे काही थेंब या पावडरवर कागद भिजेपर्यंत घालायचे

3. हा पेपर नळाखाली धुवायचा

4. या पेपरला चहा पावडरचा गडद डाग पडल्यास त्या पावडरीत भेसळ आहे हे सिद्ध होते. जर पेपरला डाग पडला नाही किंवा अगदी हलका डाग पडला तर त्यात भेसळ नाही असे समजायचे. 

( Image : Google)

व्हिडिओच्या माध्यमातून Fssai ने अतिशय नेमक्या पद्धतीने याबाबत सांगितले असून ही टेस्ट कोणीही घरच्या घरी करू शकते. त्यासाठी फक्त फिल्टर पेपरची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही बाजारातून आणत असलेल्या महागड्या चहा पावडरमध्ये भेसळ आहे की नाही हे सहज ओळखू शकता. अशाप्रकारे भेसळ असलेले पदार्थ पोटात गेल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होण्याचीही शक्यता असते. Fssai नेहमी वेगवेगळ्या व्हिडियोच्या आणि माहितीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना सज्ञान करायचा प्रयत्न करत असते. याआधीही मैदा, तांदूळ पिठी, काळी मिरी यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती व्हिडियोद्वारे सांगण्यात आल्या होत्या. आताच्या या व्हिडियोला ३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :अन्नव्यभिचारइन्स्टाग्राम