Join us  

हिवाळ्यात लोणच्याला बुरशी लागली तर? ६ टिप्स, लोणचं टिकेल वर्षभर मस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 2:57 PM

How To Store Pickles In Winter For Better Shelf Life : Easy Tips : वातावरणातील गारठा आणि दमटपणामुळे फक्त पावसाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातसुद्धा लोणचं खराब होऊ शकतं.

महाराष्ट्रीयन लोणच्याला जगभरात सर्वत्र मोठी मागणी आहे. महाराष्ट्रीयन थाळीत डाव्या बाजूला असणारी आंबट - चिंबट लोणच्याची फोड जिभेचे चोचले पुरवते. लोणच हा एक असा खाद्यपदार्थ आहे, जे केवळ स्वतःच स्वादिष्ट नसून आपले जेवण अधिक स्वादिष्ट बनवते. जवळपास सर्वच घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची साठवून ठेवलेली असतात. काही लोक स्वतःच घरी लोणची बनवतात, तर अनेक लोक आहेत ज्यांना लोणची खूप आवडतात पण बनवता येत नाहीत असे लोक ते बाजारातून विकत घेतात. उन्हाळ्यामध्ये वर्षभराकरिता काही गृहिणी पापड, कुरडया आणि लोणची बनवतात. मात्र ही लोणची वर्षानुवर्षे टिकवून ठेवणे कठीण काम असते. लोणच्याची साठवण योग्यरीत्या न केल्यास त्या लोणच्याला बुरशी देखील येते. मात्र काही वेळा या लोणच्याची साठवण कशी करावी? हा प्रश्न पडतो. परंतु योग्य काळजी घेतल्यास लोणचे वर्षानुवर्षे उत्तम टिकून राहते. वातावरणातील गारठा आणि दमटपणामुळे फक्त पावसाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातसुद्धा वाळवणीच्या पदार्थांची विशेष काळजी घेणे गरजेचं असते. हिवाळ्याच्या दिवसात साठवलेली लोणची बुरशी लागून खराब होऊ नयेत म्हणून काही टीप्स समजून घेऊयात(How To Store Pickles In Winter For Better Shelf Life : Easy Tips).

काय काय करता येऊ शकते ? 

१. काचेची बरणी वापरा - मुरलेलं लोणचच छान लागतं. त्यासाठी आपण विशिष्ट बरण्यासुद्धा वापरतो. खूप जणांकडे वर्षभरासाठी लोणचं केलं जातं. जर तुम्ही देखील यंदा लोणचं केलं असेल तर ते प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्याची चुकी अजिबात करु नका. कारण काचेचे भांड आणि चिनी मातीच्या भांड्यात लोणचं अधिक काळासाठी टिकतं. शिवाय ही बरणी उन्हात ठेवल्यानंतर लोणचं टिकण्याही मदत मिळते. त्यामुळे लोणचं केलं असेल तर तुम्ही ते काचेच्या आणि चीनी मातीच्या हवाबंद डब्यात ठेवा. म्हणजे त्यामध्ये ओलावा शिरणार नाही आणि लोणचं टिकायला मदत होईल. 

२. पुरेसे तेल घाला - कोणताही पदार्थ तयार करताना त्यातील जिन्नस योग्य प्रमाणात असतील तर तो पदार्थ चविष्टय बनतो. लोणच्यात तेलाचे प्रमाण योग्य असेल तर तुमचे लोणचं अजिबात खराब होणार नाही. विशेषत: तेलाचे प्रमाण हे लोणच्यासाठी फारच महत्वाचे असते. त्यामुळे तेल हे योग्य प्रमाणात हवे. तेल भरपूर असेल तर लोणंच्याला बुरशी येत नाही. 

३. बरणीचे झाकण नीट लावा - काहीवेळा बाजारातून विकत आणलेले लोणचे देखील खराब होते. परंतु जर हे लोणचे तुम्ही एका हवाबंद डब्यात भरून ठेवले तर ते खूप काळ चांगले राहते. लोणचे बराच काळ चांगले टिकवून ठेवण्यासाठी बरणीचे झाकण असे व्यावस्थित बंद करा की, त्यातून हवा आत जाणार नाही. लोणचे टिकवून ठेवण्यासाठी शक्यतो हवाबंद झाकण असलेल्या बरण्यांच्या वापर करा. 

४. पेपर किंवा कापडाने झाकून ठेवा - लोणचं साठवलेल्या बरणीचे झाकण लूज असेल तर झाकण लावण्याआधी त्यावर एखादा पेपर किंवा स्वच्छ धुतलेल कापड बांधावं. मग त्यावर झाकण लावाव. यामुळे तुमचे लोणचे बरणीतून लिक होणार नाही किंवा वातावरणातील दमटपणामुळे खराबही होणार नाही. कापड किंवा पेपर बांधल्यामुळे लोणच्याचा हवेशी फारसा संबंध येत नाही व लोणचं बराच काळ टिकून राहत. 

५. ओला चमचा वापरू नका - लोणचं वाढून घेताना जर तुम्ही ओला चमचा त्यात बुडवला तर पाण्याच्या संपर्कामुळे लोणचे खराब होऊ शकते. लोणचं वाढून घेताना चमचा स्वच्छ धुतलेला आणि कोरडा असावा याची खबरदारी घ्यावी.      

६. ऊन्हात ठेवा - हिवाळ्यात आणि पावसाळयात लोणच्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दोन्ही ऋतूंमध्ये जर तुम्हाला लोणचे टिकवून ठेवायचे असल्यास लोणच्याची बरणी ४ ते ५ दिवस उन्हात ठेवा. ऊन्हात ठेवल्याने लोणचे व्यावस्थित प्रीजर्व होऊन खराब होण्याची शक्यता कमी होईल.

टॅग्स :किचन टिप्सअन्न