Lokmat Sakhi >Food > मेयो वडापाव ते मेयो सँडविच; मुळात आलं कुठून हे चविष्ट मेयॉनेज? आणलं कुणी?

मेयो वडापाव ते मेयो सँडविच; मुळात आलं कुठून हे चविष्ट मेयॉनेज? आणलं कुणी?

मेयॉनेज? हा पदार्थ हल्ली ज्यातत्यात वापरला जातो, पण तो आपल्या आहारात आला कुठून? who invented mayonnaise?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 04:39 PM2023-03-28T16:39:29+5:302023-03-28T16:42:20+5:30

मेयॉनेज? हा पदार्थ हल्ली ज्यातत्यात वापरला जातो, पण तो आपल्या आहारात आला कुठून? who invented mayonnaise?

What Is Mayo? Mayonnaise is made of? where it came from? who invented mayonnaise? | मेयो वडापाव ते मेयो सँडविच; मुळात आलं कुठून हे चविष्ट मेयॉनेज? आणलं कुणी?

मेयो वडापाव ते मेयो सँडविच; मुळात आलं कुठून हे चविष्ट मेयॉनेज? आणलं कुणी?

Highlights टोमॅटो केचप कसं भारतात टेबलाटेबलावर आढळतं, मेयॉनेजचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे.

मेघना सामंत

अगदी पंधरावीस वर्षांपूर्वीपर्यंत मेयॉनेज हा शब्द आपल्या गावीही नव्हता. आज जबरदस्त फॅनफॉलोइंग आहे त्याचं. मेयो वडापाव, पनीर मेयो फ्रँकी, मेयो डोसा, फ्राइज विथ मेयो डिप. मेयॉनेजने लदबदलेलं कायकाय मिळत नाही ते विचारा. नंबर १ म्हणावं तर सँडविच. लुसलुशीत ब्रेडबरोबर मऊमुलायम मेयॉनेजचे पूर्वीपासून सूर जुळले ते कायमचेच. नुसतं स्लाइसला फासून किंवा कोबी-काकडी वगैरे घालून त्याचं सॅलड (कोलस्लॉ) करून खा. मेयॉनेजची ती आंबट-गोड-खारट क्रीमी चव! मुलखावेगळीच! दुसऱ्या कशाहीसारखी नाही.
आता मुळात आलं कुठून हे मेयॉनेज.

(Image :google)

आता हे युरोपातनं आलं हे तर उघडच. पण तिथेही स्पेन आणि फ्रान्स या देशांत मेयॉनेजच्या जन्मावरून उभा दावा आहे. १७५६ साली एक फ्रेंच राजाने ब्रिटिशांच्या ताब्यातलं पोर्ट महॉन नावाचं बेट जिंकून घेतलं. राजाने आपल्या विजयानिमित्त दिलेल्या मेजवानीत हे चविष्ट मलईदार सॉस सर्व्ह केलं गेलं, आणि राजाने खुश होऊन आरोळी ठोकली— महॉनेज! म्हणून म्हणे या सॉसला नाव पडलं मेयॉनेज! ही झाली एक दंतकथा.
अर्थात स्पेनकडल्या संशोधकांना ही कहाणी मान्य नाही. त्यांनी त्यांच्या बाजूचे पुरावे सादर केले आहेत, इतर अनेकांनीही आपापल्या देशात हे सॉस आधीपासूनच कसं होतं याच्या कथा मांडल्या आहेत. असो. एकोणिसाव्या शतकात मेयोला उदंड लोकाश्रय लाभला. युरोपीय स्थलांतरितांनी ते अमेरिकेत नेलं. घरगुती पातळीवर तयार होणारं मेयो बाटलीबंद, टिकाऊ स्वरूपात मिळायला लागल्यावर अधिकच लोकप्रिय झालं. ब्रिटिशांनी ते आपल्यासोबत भारतात आणलं. इथल्या कडक उन्हाळ्यात दुपारच्या खाण्यासाठी थंडगार मेयॉनेज चोपडलेले काकडीचे सँडविच बहारदार. पण एतद्देशीयांमध्ये हे सॉस फारसं प्रचलित झालं नाही.
गेल्या तीसचाळीस वर्षांत बर्गर, पिझ्झा, पास्ता असे पदार्थ सार्वत्रिक झाल्यानंतरच मेयोला इथे एक ओळख लाभली.

(Image :google)

मूळ कृतीत तेल, व्हिनेगरसोबत अंडं अत्यावश्यक, किंबहुना अंडं नसेल तर लेबलवर मेयॉनेज असं लिहायलाही अमेरिकेत परवानगी नाही. पण भारतात माल विकू पाहणाऱ्या कंपन्यांना इथे मात्र मेयॉनेज शाकाहारी करण्याची निकड भासली. प्रयोगांती सिद्ध झालेलं दुग्धजन्य मेयॉनेज आज तडाखेबंद खपतं. टोमॅटो केचप कसं भारतात टेबलाटेबलावर आढळतं, मेयॉनेजचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे.


(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: What Is Mayo? Mayonnaise is made of? where it came from? who invented mayonnaise?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न