- डॉ. वर्षा जोशी
बाजारात कितीही प्रकारचे चिवडे मिळत असले तरी घरी स्वत:च्या हातानं चिवडा बनवण्याचं समाधान आणि आनंद वेगळाच असतो. घरी बनवण्यासाठी पातळ पोह्यांच्या चिवडा हा उत्तम पर्याय असतो. या चिवड्यात आपण शेंगदाणे, खोबरे, डाळ्या, बडिशेप अशा सर्व गोष्टी वापरु शकतो. शिवाय कमी किंमतीत भरपूर चिवडा होतो. पातळ पोह्यांच्या चिवड्याला तेल कमी लागत असल्यानं तो मनसोक्त खाताही येतो. चिवड्याची चव जितकी महत्त्वाची तितकेच चिवड्यातले पोहे कसे दिसतात हे ही महत्त्वाचं. चिवड्यातले पोहे आक्रसलेले दिसत असले तर चिवड्याची चव कितीही जमून आली तरी चिवडा हा खरंतर बिघडलेलाच असतो.चिवडा करताना पोहे भाजावे कसे हे तंत्रच पातळ पोह्यांच्या चिवड्याला चव आणि रूप देत असतो.
Image: Google
चिवड्यातले पोहे आक्रसू नये म्हणून..
1. चिवडा कुरकुरीत व्हायला हवा म्हणूृन काही घरांमध्ये पोहे कढईत घालून भाजले जातात. पातळ पोह्यांमधे भरपूर छिद्रं असतात आणि त्यात हवेनं जागा व्यापलेली असते. कढईच्या उष्णतेनं पोह्यांमधे जागा व्यापलेल्या हवेचं प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते. आणि पोहे आक्रसतात. त्यामुळे अशा प्रकारे पोहे कधीही भाजू नयेत. पोह्यांमधला अंगीभूत पाण्याचा अंश निघून गेलेला असतो त्यामुळे ते अशा प्रकारे भाजल्यावर कुरकुरीत होतात पण चिवडा बनवल्यावर ते आक्रसलेले मात्र दिसतात.
2. पोहे उन्हात तापवले की त्यामधील अंगीभूत पाण्याचा अंश जवळजवळ गेलेला असतो. पोहे उन्हातून घरात आणले की लगेच चिवडा करण्यासाठी वापरावेत म्हणजे जास्त परतावे लागत नाहीत आणि पोहे न आक्रसता चिवडा कुरकुरीत होतो.
Image: Google
3. उन्हं जेव्हा कडक असतात तेव्हा काही घरात बरेच पोहे विकत आणून उन्हामधे तापवून गार करुन डब्यामधे भरुन ठेवतात. चिवडा करतांना मंद विस्तवावर असे पोहे कढईत थोडे थोडे घालून हाताने ढवळून गरम झाले की कागदावर काढावेत. गरम पोहे ताटामधे काढू नयेत. ताटात त्यांना खाली वाफ धरण्याची शक्यता असते. सर्व पोहे असे भाजून झाले की मग चिवडा करावा.
4. पातळ पोहे ओव्हनमधे ठेवूनही भाजता येतात. पण ज्या ओव्हनमधे गरम झालेली हवा सगळीकडे पसरवण्याची सोय आहे अशा ओव्हनमधे ते भाजले जातात आणि आक्रसत नाहीत. गरम भाजलेले पोहे कागदावर काढावेत. थोडे थोडे पोहे भाजावेत.
5. स्वयंपाकात कुठेही कागद वापरतांना वर्तमानपत्राचा कागद वापरु नये. त्याची शाई पदार्थाला लागण्याची शक्यता असते आणि ते शरीराला अगदी घातक असतं.
Image: Google
6. पातळ पोहे उन्हात ठेवलेले असोत, ओव्हनमधे भाजलेले असोत किंवा न भाजता वापरलेले असोत, एक गोष्ट अत्यंत महत्वाची असते. चिवड्यासाठी फोडणी करुन त्यात मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घालून मंद विस्तवावर जरा तळून कढई खाली काढून फोडणी गार होऊ द्यावी. मग त्यात तळलेले दाणे, काजू, खोबरं वगैरे घालून पोहे घालावेत. पोहो आणि तेलातला मसाला व्यवस्थित मिसळावा.
7. फोडणीतील तेलाचं सूृक्ष्म आवरण प्रत्येक पोह्यावर चढलं पाहिजे. असं केलं की पोह्यात असलेल्या हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात आणि मग पोहे परतले की आक्रसत नाहीत.
8. नंतर कढई मंद विस्तवावर ठेवून चिवडा कुरकुरीत होईपर्यंत परतावा. मंद विस्तवावर पोहे परतले की त्यातील अंगीभूत पाण्याचा अंश निघूृन जातो. तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. उन्हात तापवलेले आणि ओव्हनमधे भाजलेल्या पोह्यांमधे अंगीभूत पाण्याचा अंश जवळजवळ नसतो म्हणून असे पोहे जास्त परतावे लागत नाहीत.
(लेखिका भौतिकशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून, त्यांची दैनंदिनब विज्ञानाबद्दलची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)varshajoshi611@gmail.com