नाश्ता असू देत नाहीतर जेवण, रोज वेगळं काय करणार? पण मग तेच तेच पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. पौष्टिक पदार्थ असले तरी मग नाक मुरडलं जातं. असं होवू नये म्हणून मग चटपटीत आणि पौष्टिक असा मेळ घालून नक्कीच काही वेगळं करता येतं. पालकाची भाजी खायला तसं फारसं कोणाला आवडत नाही. पण पालक पनीरचे रोल केले तर आवडीने खाल्ले जातील.
अनेकदा फ्रीजमधे ब्रेड असतो. या ब्रेडचं काय करायचं असा विचार करता करता ब्रेड अगदीच शिळा होतो. शिळा ब्रेड कडक झाल्यानं त्याचं काहीच करता येत नाही आणि ब्रेड टाकून द्यावा लागतो. नाश्त्याल एकाच प्रकारचे पोहे- उपमा नकोसे वाटतात. तेव्हा फ्रीजमधले ब्रेड वापरुन ब्रेडचे कुरकुरीत पोहे करता येतात. हे पोहे चवीला छान लागतात आणि झटपट होतात. आठवड्यातून फार नाही एक दोनदा नाश्ता आणि जेवणात थोडी चवबदल हवीच. पौष्टिकतेसाठीचा आपला आग्रह पुरवूनही चटपटीत वेगळे पदार्थ करता येतात.
छायाचित्र- गुगल
पालक पनीर काठी रोल
पालक पनीर काठी रोल संध्याकाळच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ बनवायला अगदीच सोपा आहे. यासाठी एक कप कणिक, अर्धा कप पालकाची प्युरी, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा जीरे पावडर, चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार तेल तर रोलमधील आतल्या सारणासाठी दिडशे ग्राम पनीर, दोन बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक कापलेल्या पाच लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला एक कांदा, 1 टमाटा, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि चार चमचे पास्ता सॉस एवढं जिन्नस घ्यावं.
पालक पनीर काठी रोल्स करण्यासाठी पालक निवडून धुवून घ्यावा. तो उकळवून त्याची प्युरी करुन घ्यावी. उकळलेला पालक वाटताना त्यात मिरची घालून वाटावं. एका भांड्यात पालक प्युरी, जीरे पूड आणि मीठ घालून कणीक मळावी. नीट अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी घालावं. पोळ्यांना लागते तशी कणीक मळावी. ती फार पातळ मळू नये. कणकेला तेलाचा हात लावून ती चांगली मऊ करुन घ्यावी. पीठ थोडावेळ सेट होवू द्यावं. तोपर्यंत या रोलच्या आतलं सारण तयार करावं. हे सारण म्हणजेच पनीरची भुर्जी. भुर्जी करण्यासाठी कांदा,टमाटा, मिरची हे सर्व एकत्र करावं, तेल गरम करुन त्यात हे टाकून परतावं. थोडं लाल तिखटही घालावं. किसलेलं पनीर आणि चवीपुरती मीठ घालून भुर्जी नीट परतून घ्यावी. गॅस बंद करुन शेवटी त्यावर कोथिंबीर पेरावी.
छायाचित्र- गुगल
रोल करताना कणकेच्या पराठ्यांसाठी जेवढ्या आकाराच्या लाट्या घेतो तेवढया घेऊन त्याचे पराठे करावेत. पराठे तेलावर छान सोनेरी रंगावर शेकावेत. मग पराठयावर आधी एक चमचा सॉस घालून ते पसरुन घ्यावं.नंतर पराठ्यावर भुर्जी घालून त्याचा रोल करावा. किती सोपा आहे ना जेवणासाठीचा हा पौष्टिक चटपटीत पर्याय!
छायाचित्र- गुगल
ब्रेडचे पोहे
ब्रेडचे पोहे तयार करण्यासाठी ब्रेड, कांदा, कढीपत्ता, टमाटा, हिरव्या मिरच्या, सिमला मिरची, तेल, मोहरी, हळद,मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर हे जिन्नस घ्यावं.
छायाचित्र- गुगल
ब्रेडचे पोहे तयार करणं अगदीच सोपं आहे. हे पोहे करण्यासाठी एका कढईत तेल गरम करावं. या पोह्यांसाठी मोहरीचं किंवा ऑलिव्ह तेल वापरलं तर पोह्यांना छान चव येते. तेल गरम झालं की मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता घालावा. नंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून मध्यम आचेवर ते चांगलं परतून घ्यावं. कांदा मिरची परतून झालं की बारीक चिरलेली सिमला मिरची त्यात घालावी. ती किमान दोन मिनिटं परतून घ्यावी. हळद घातली की टमाटा घालून तो पाच मिनिटं शिजू द्यावा. नंतर यात ब्रेडचे तुकडे घालावेत. ते फोडणीत चांगले मिसळले की मीठ आणि गरम मसाला घालावा. मध्यम आचेवर ब्रेड परतावा. आपल्या नेहेमीच्या पोह्यांसारखं रुप आलं की गॅस बंद करुन लिंबाचा रस घालावा. शेवटी भरपूर कोथिंबीर घालावी. हे पोहे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहासोबत खूप छान लागतात.