वाढदिवस असो की इतर कोणता कार्यक्रम. आजकाल केक आणणं आणि आनंद सेलिब्रेट करणं अगदी नेहमीचं झालं आहे. त्यामुळे केक (cake) वारंवार आणलाच जातो. पण बऱ्याचदा केक खाणारी माणसं आणि केकचा आकार यांचा अंदाज चुकतो आणि केक खूप उरतो. आपण तो दुसऱ्या दिवशी खाऊ म्हणून फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण आदल्या दिवशीच खाल्लेला असल्याने मग पुन्हा दुसऱ्या दिवशी केक (leftover cake) जात नाही. त्यामुळे मग तो वाया जातो. म्हणूनच केक अशा पद्धतीने वाया घालविण्यापेक्षा त्याच्यापासून या वेगवेगळ्या रेसिपी (recipe) करून बघा. उरलेल्या केकचीच रेसिपी असली तरी खाणारे तो पदार्थ अगदी आवडीने आणि चवीने खातील हे नक्की. (How to use leftover cake?)
१. केक कस्टर्ड पुडींग
हा एक चवदार पदार्थ उरलेल्या केकपासून झटपट बनवता येतो. यासाठी साधारण अर्धा लीटर दूध उकळत ठेवा. दुध उकळत आलं की त्यात १ टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाका. कस्टर्ड पावडर एकदम टाकू नये. अर्धी वाटी दुधात आधी एकत्र करून घ्यावी आणि मग टाकावी. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध आटून यायला सुरुवात होईल. दुध घट्ट झालं की गॅस बंद करा. एका बाऊलमध्ये एक पळीभर दूध टाका. त्यात केकचे तुकडे करून टाका. वरतून पुन्हा एक पळी दूध टाका. त्यावर आवडीचा सुकामेवा टाका. तयार झाल तुमचं केक कस्टर्ड पुडींग.
२. केक ट्रफल्स
हा पदार्थ बनविण्यासाठी केक मिक्सरमध्ये टाकून ग्राईंड करून घ्या. त्यानंतर हाताला थोडं बटर लावून ग्राईंड केलेल्या केकपासून छोटे छोटे बॉल बनवा. कॅडबरी आणून ती वितळून घ्या. वितळलेल्या कॅडबरीमध्ये केकचे बॉल डिप करा आणि लगेच काढून एका डिशमध्ये प्लास्टिकची पिशवी ठेवून त्यावर ठेवा. ही डिश फ्रिजमध्ये एखाद्या तासासाठी सेट करायला ठेवा. तासाभरातच केक ट्रफल्स तयार. चॉकलेट असल्याने लहान मुलांना हा पदार्थ विशेष आवडेल.
३. केक शेक
उन्हाळ्यासाठी हा एक मस्त आणि एकदम हटके पदार्थ आहे. यासाठी केक आणि दूध मिक्सरमध्ये फिरवून ग्राईंड करून घ्या. हा केक शेक आता एका ग्लासमध्ये ओता. त्यावर वरतून व्हॅनिला आईस्क्रिमचे एक- दोन स्कूप टाका. त्यावर तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रुट्स बारीक करून टाका. अतिशय चवदार आणि थंडगार असा केक आईस्क्रिम शेक झाला तयार.