Join us  

मुलांना रोज पौष्टिक काय द्यायचं? ही घ्या पौष्टिक पोळीची भन्नाट आयडिया, एकाच पोळीत भरपूर पोषण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 7:01 PM

How To Make Your Child’s Roti Or Paratha More Nutritious : मुलांच्या रोजच्या जेवणातली पोळी किंवा पराठा आपण वेगवेगळ्या छुप्या ट्रिक्स वापरून अधिक पौष्टिक करु शकतो.

लहान मुलं आणि त्यांचे खाण्याबाबतचे हजार नखरे हे समीकरण ठरलेलंच आहे. लहान मुलांची जेवणाबाबतची रोजची नाटक हे कोड अजून जगातील कुठल्याही आईला सुटलेलं नाही. आई - वडील मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना सकस व पौष्टिक अन्न खायला देतात. परंतु मुलांना हे पौष्टिक अन्न सोडून बाहेरचे तेलकट, मसालेदार पदार्थ खायला भरपूर आवडतात. जेवताना मुलांच्या मागे बराच आटापिटा करून त्यांना जेवण भरवावे लागते. अशावेळी मुलांना सकस आणि पौष्टिक आहार कसा द्यावा असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. अशा परिस्थितीत घरातील कित्येक आया मुलांच्या आवडीचे पदार्थ हेरून ठेवतात आणि तेच पदार्थ कसे अधिक पौष्टिक करता येतील याकडे त्यांचे लक्ष असते.

अशावेळी घरातील आया मुलांच्या आवडीचे सॅन्डविच बनवून त्यामध्ये पौष्टिक भाज्या घालून किंवा त्यांच्या आवडीच्या पदार्थात भाज्यांचे स्टफिंग करून तो अधिक पौष्टिक बनवून मुलांना देतात. परंतु आता चिंता करू नका मुलांच्या रोजच्या जेवणातली पोळी किंवा पराठा आपण वेगवेगळ्या छुप्या ट्रिक्स वापरून अधिक पौष्टिक करु शकतो. जेणेकरून ही पोळी खाल्ल्याने मुलांच्या शरीरात अधिक पौष्टिक घटक जातील व त्यांच्या आरोग्याची आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकता (How To Make Your Child’s Roti Or Paratha More Nutritious).

नक्की काय उपाय करता येऊ शकतात ? 

१. कणिक मळताना :- 

१. पोळी किंवा पराठा तयार करत असाल तर त्याचे कणिक मळताना त्यात पांढरे किंवा काळे तीळ घालावेत. २. कणिक मळताना तीळ घालण्यासोबतच पोळी किंवा पराठा लाटताना देखील आपण त्यावर थोडेसे तीळ भुरभुरवून मग पोळी लाटावी. ३. तिळासोबतच आपण घरी तयार केलेले शुद्ध तूप देखील कणिक मळताना त्यात घालू शकतो. मुलांना जर पोळीवर लावलेले तूप आवडत नसेल तर कणिक मळताना त्यात थोडे तूप घालावे. 

४. अळशी भाजून घेऊन त्याची पावडर करून ती स्टोअर करून ठेवावी. पोळीसाठी कणिक मळताना त्यात ही अळशीची पावडर घालावी यामुळे अळशीतील पौष्टिक गुणधर्म पोळीमार्फत मुलांना मिळतील. ५. ओट्स भाजून त्याची पावडर तयार करून घावी कणिक मळताना त्यात ओट्स पावडर घातल्याने ओट्समधील पोषक तत्व मुलांना मिळतील.  

२. पोळी लाटताना :- 

१. पोळी लटतानासुद्धा आपण त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी पावडर भुरभुरवून पोळी अधिक पौष्टिक करू शकतो. २. पोळी लाटताना आपण त्यावर सुकी कसुरी मेथी पसरवून मग पोळी किंवा पराठा लाटू शकतो. ३. गाजर, बीटरूट यांसारख्या भाज्या किसून घेऊन, पोळी लाटताना हा किस पोळीवर सर्वत्र व्यवस्थित पसरवून मग पोळी लाटू शकतो. 

४. बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या वेगवेगळ्या ड्रायफ्रुटसची पावडर तयार करून पोळी लाटताना ही ड्रायफ्रुटसची पावडर भुरभुरावी. ५. सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया यांसारख्या बिया भाजून घेऊन त्यांची पावडर तयार करून घ्यावी. पोळी लाटताना या पौष्टिक बियांची पावडर भुरभुरावी व  त्यावरून थोडे तूप सोडून आपण घडीची पोळी देखील करु शकता. 

३. कणिक भिजवताना :- 

१. आपण सर्वसाधारणपणे कणिक भिजवताना पाण्याचा वापर करतो. परंतु जर आपल्याला रोजच्या जेवणातील पोळी अधिक पौष्टिक करायची असेल तर वेगवेगळ्या भाज्यांच्या प्युरी करून त्यात कणिक भिजवावी. उदाहरणार्थ :- जर आपल्या मुलांना पालक, बीटरुट खायला आवडत नसेल तर त्यांची पातळसर प्युरी करून घ्यावी आणि याच प्युरीचा वापर करुन त्यात कणिक भिजवावी. जेणेकरून पालक आणि बीटरुटचे पोषक तत्व मुलांना पोळीतून मिळतील.  

४. पराठे बनवताना भाज्यांचे स्टफिंग :- 

१. बऱ्याचशा मुलांना भाज्या आवडत नाहीत. भाज्या खाण्यासाठी मुले पटकन तयार होत नाहीत. अशावेळी पराठे बनवताना त्यात भाज्यांचे स्टफिंग बनवून घालावे. जेणेकरून पराठ्यांसोबत मुलांच्या पोटांत पौष्टिक भाज्या देखील जातील. २. बहुतेक मुलांना बटाटा फार आवडतो अशावेळी बटाट्याचे स्टफिंग तयार करून त्यात भाज्या बारीक चिरून किंवा किसून घालाव्यात. अशाप्रकारे पराठ्यांत भाज्या घातल्याचे मुलांना लक्षातही येणार नाही आणि त्यांच्याकडून पौष्टिक पराठा खाल्ला जाईल.

टॅग्स :अन्नपाककृती