Join us  

शाळा सुरू झाली, आता रोज डबा काय द्यायचा? आणि तो खाऊन मुलांचं खरंच पोषण होतं की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 6:41 PM

शाळा सुरू झाली की मुलांना डबा काय द्यायचा? पण मुळात आपण डब्यात जो आहार देतो, त्यानं मुलांचं पोषण होतं आहे का?

ठळक मुद्देर्वात महत्त्वाचे म्हणजे आज डब्यात जे दिले आहे त्याने तुला काय-काय मिळणार आहे, याबद्दल मुलांशी संवाद साधावा.

-मंजिरी कुलकर्णीजून महिना सुरू झाला की, शाळेचा डबा हे मोठे टेन्शन आईच्या डोक्यावर असते. पुन्हा तोच प्रश्न डब्यात काय द्यायचं आणि मुलांनी डबा पूर्ण नीट खायला हवा.खरंतर पोषक आहार हा सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठीच आवश्यक आहे. पण वाढत्या वयातील मुलांसाठी पौष्टिक आणि संपूर्ण आहार अत्यंत आवश्यक असतो. या संपूर्ण आहारावर मुलांची वाढ, विकास, प्रतिकारशक्ती, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता अवलंबून असते. शाळेत खातात तो आहार हा मुलांची पौष्टिक तत्त्वांची रोजची गरज भागविणार असावा. म्हणूनच तर शाळकरी मुलांचा डबा आणि त्यांची प्रगती यावर सध्या देशभरात संशोधनसुद्धा चालू आहे.शाळेच्या डब्याचे मुलांसाठी नियोजन करताना त्या संदर्भात मुलांशी बोलायला हवं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहार अणि त्याचे परिणाम याबद्दल मुलांशी संवाद अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या आहाराचे कसे चुकीचे परिणाम होतील, हे जर मुलांना समजावून सांगितलं तर मुलं स्वत:च पौष्टिक आहारासाठी सहज तयार होतात. याचा अर्थ मुलांनी पिझ्झा, पास्ता खाऊ नये असे नाही, पण त्यातही त्याला पौष्टिक कसे बनवता येईल, हे आपण पाहूया.त्यात काही मुलांना प्रत्येक वेळी आवडीचेच काहीतरी डब्यात हवे असते. ते नाही दिले तर मुले डबा तसाच परत आणतात.शाळेचा डबा पौष्टिक आणि मुलांच्या आवडीचा असावा, यासाठी प्रत्येक आई-बाबा धडपड करत असतात. मात्र, एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की, आजकाल बहुतांश मुले ही अतिपोषक या प्रकारातही येतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्ये केस पांढरे होणे, मुलांचे वाढते वजन म्हणजेच लहान मुलांमधील स्थूलता तसेच मधुमेह, रक्तदाब आणि मानसिक आजारसुद्धा प्रकर्षाने दिसून येत आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे वाटेल तसे पदार्थ मिसळून चव आणि रंग आणण्यासाठी केलेली धडपड. मुलांच्या डब्यात काहीही असले तरी ते मुलांनी संपविले पाहिजे हा पालकांचा आणि शिक्षकांचा असलेला अट्टाहास. ह्या सगळ्या गोष्टींमुळे लहान मुलांची भूक लागण्याची क्षमता आणि पोट भरलं आहे हे ओळखण्याची क्षमता कमी होत चालली आहे.खरंतर प्रत्येक मुलाची भूक ओळखून त्याप्रमाणेच आणि त्याच प्रमाणात त्याच्या डब्यात पदार्थाचे प्रमाण किती असावे, हे ठरवायला हवे.आजकाल सगळ्या शाळांमध्ये भाजी-पोळी कंपल्सरी केलेली आहे. पण त्यातूनसुद्धा पोषक तत्त्व मिळतीलच, असे नाही. पदार्थ बनविल्यानंतर जसजसा वेळ वाढत जातो, तसतशी त्यातील पोषक तत्त्व कमी होत जातात. त्यामुळे डब्यात पदार्थ किती वेळ असणार आहे, त्याप्रमाणे कोणता पदार्थ द्यायचा हे ठरवावे. त्याचप्रमाणे वातावरणातील तापमान कसे आहे हे पाहून डब्यात पदार्थ ठरवावा.आता हे पदार्थ कसे ठरवायचे हे पाहू.

(Image : google)मुलांच्या डब्यात काय द्यायचे हे कसे ठरवायचे?

बहुतांश मुलांची शाळा सकाळची असते. त्यामुळे ते खात असलेला डबा हा त्यांचा दिवसभरातील पहिला आहार ठरतो. रात्रभर झालेला उपवास आणि सकाळी शाळा यामुळे मुलांना कडकडून भूक लागलेली असते. त्यामुळे पहिला आहार हा सात्विक आणि पौष्टिक तत्त्वाने युक्त असेल तर मुले दिवसभर उत्साही राहतात आणि त्यांची प्रतिकारशक्तीसुद्धा बळकट होते.मुलांचे वाढते वय आणि त्यांच्या शरीराची तसेच बुद्धीची गरज लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं. आजकाल लहान मुलांमध्ये फूड ॲलर्जीचे प्रमाणसुद्धा वाढलेले दिसून येत आहे. उदा. काजू, बदाम, शेंगदाणे, दुधाचे पदार्थ ह्या गोष्टींची काहींना ॲलर्जी दिसून येते तर आपल्या मुलांमध्ये अशी काही ॲलर्जी नाही ना? याची खात्री करूनच पदार्थ बनवावेत.त्याचप्रमाणे मुलांना प्रकार १ चा मधुमेह असेल आणि ते इन्सुलिन घेत असतील तर इन्सुलिनच्या युनिटप्रमाणे कर्बोदके डब्यात असणे अत्यंत आवश्यक आहे.

(Image :google)

ही पाहा यादी..

१. थंडीच्या दिवसात मुलांची पचनशक्ती चांगली असते, त्यावेळी मुलांना पचायला जड असलेले पदार्थ दिले तरी चालतात.२. ज्या पदार्थांमध्ये प्रथिने (proteins) जास्त असतात, ते पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते..उदा उन्हाळ्यात वरण किंवा डाळ लवकर खराब होते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त प्रथिने असलेले पदार्थ देणे टाळावे.३. डब्यात पदार्थ कोरडे असावेत. कारण, पाणी जास्त असलेले पदार्थ लवकर खराब होतात.४. डब्यात तळलेले पदार्थ नसावेत. कारण, मधल्या सुटीनंतर मुलांना परत अभ्यास असतो त्यात त्यांना सुस्ती येऊ शकते.५. मुलांना गोड पदार्थ डब्यात देणे प्रकर्षाने टाळावे. एकतर गोड पदार्थांची सवय होऊ शकते आणि मुलांना शाळेत झोप येऊ शकते.६. डब्यात जो पदार्थ आहेत तो समतोल असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यात योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, तंतू युक्त (फायबर) पदार्थ योग्य प्रमाणात असायला हवेत.याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाज्यांचे पराठे. त्यामध्ये तुम्ही चिरून किंवा मिक्सरमध्ये पेस्ट करून पिठात घाला. त्याचबरोबर कुठलीही एक शिजवलेली डाळ त्यात घालू शकता आणि घरी बनवलेल्या तुपाबरोबर जर हे पराठे भाजले तर हा संपूर्ण आहार होऊ शकतो.७. मुलांना स्टेनलेस स्टीलचाच डब्बा वापरावा. कितीही चांगल्या क्वालिटीचे असले तरी प्लास्टिक अजिबात वापरू नये.८. मुलांना डब्यात ब्रेड, बेकरीचे पदार्थ देऊ नयेत९. प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की टोमॅटो सॉस, मेयो, पाकिटातील चटण्या अजिबात देऊ नये, त्यापेक्षा घरी केलेली लोणची, चटण्या, मुरंबा केव्हाही चांगला.१०. फळे कापून देऊ नयेत, व्यवस्थित धुवून संपूर्ण द्यावीत.११. सॅलेड डब्यात देऊ नये.१२. पदार्थ पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरावा.१३. ॲल्युमिनिअम फॉइलमध्ये पदार्थ देऊ नये.१४. भाज्यांमध्ये भिजवलेल्या डाळी घालून भाज्यांची पौष्टिक तत्त्वे वाढवा.१५. मधल्या वेळेच्या छोट्या डब्यात पोहे, उपमा, उसळी देत असाल तर त्यात भाज्या, जसे की किसलेले गाजर, हिरवे वाटाणे घालून द्यावे.त्याचप्रमाणे साखर न घालता गूळ घालून केलेला शेंगदाण्याचा लाडू किंवा चिक्की पण चालेल.१६. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज डब्यात जे दिले आहे त्याने तुला काय-काय मिळणार आहे, याबद्दल मुलांशी संवाद साधावा.

(लेखिका पोषणतज्ज्ञ आहेत.)durvamanjiri@gmail.com

टॅग्स :अन्नशाळालहान मुलं