प्रियंका चोप्रा भलेही परदेशात असेल पण असा एकही दिवस नाही की भारतीय प्रसारमाध्यमांमधे तिच्याबद्दल चर्चा होत नाही. तसेच सोशल मीडियावरुनही ती आपल्या फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत संवाद साधत असते. तिच्या आयुष्यातील आठवणीतले प्रसंग, तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबातील व्यक्तींबरोबरचे आनंदी क्षण, त्याबाबतचे फोटो टाकत असते.
सध्या इन्स्टाग्रामवर ’आस्क मी एनिथिंग’ नावाचा ट्रेण्ड सुरु आहे. त्यात आपल्याबद्दल कोणताही प्रश्न फॉलोर्सला विचारण्याची संधी असते. स्वत:बद्दल इतरांना सांगणार्या या ट्रेण्डमधे प्रियंका चोप्राही सहभागी झाली. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी तिने ‘आस्क मी एनिथिंग’द्वारे साधली. सध्या हॉलिवूडमधे प्रियंका गाजलेल्या ‘मॅक्ट्रिस’ सीक्वलमधे भूमिका करते आहे. या चित्रपटाच्या एका प्रेस टूरवर प्रियंका होती. त्यादरम्यान वेळ काढून ती इन्स्टाच्या या ट्रेण्डमधे सहभागी झाली. इथे तिने फॉलोअर्सच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. आवडत्या पुस्तकापासून नवीन वर्षाच्या संकल्पापर्यंत तिला अनेक प्रश्न विचारले गेले. त्यात खाण्यापिण्याशी निगडित प्रश्न विचारले गेले. या उत्तरातून तिच्या खाण्यापिण्याच्या आवडी भारताशी , इथल्या खास चवींशी कशा निगडित आहे हे पाहून जगभरातल्या भारतीय फॉलरेअर्सना आनंद झाला. प्रियंकानं कसा आपल्या मनातला पदार्थ सांगितला हे त्या आनंदा मागचं मुख्य कारण आहे.
Image: Google
‘आस्क मी एनीथिंग’ मध्ये फूडवर तिला पहिला प्रश्न विचारला गेला, ‘ तुला रुम सर्व्हिस आवडते की बाहेर जाऊन जेवण करणं आवडतं? यावर तिने अर्थात कधीही रुम सर्व्हिस हे उत्तर दिलं. रुममधे आरामात बसून टीव्हीवर आपला आवडता कार्यक्रम/ चित्रपट बघत आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेणं हे प्रियंकाला खूप आवडतं. या प्रश्न उत्तरांच्या संवादात आपण ‘डेझर्ट गर्ल’ नाही हे सांगत आपल्याला जास्त गोड पदार्थ खायला आवडत नाही हे सांगितलं. प्रियंकाने विविध देशातील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. पण तिला आशियाई देशातील पदार्थ खूप आवडतात. बाहेरच्या देशातील हॉटेलच्या मेन्यूमधे जर थाई, इंडियन, चायनीज, व्हिएतनामी, कोरियन यापैकी कोणतंही फूड असलं की मला खूप सुरक्षित वाटतं असं ती म्हणते.
Image: Google
नंतर तुझा जगभरातला आवडता पदार्थ कोणता असा प्रश्न विचारल्यावर तिने जराही विचार न करता ‘इंडियन बिर्याणी’ हे उत्तर दिलं. तिच्या या उत्तरानं तिच्या भारतीय चाहत्यांची मनं जिंकली. 90 टक्के भारतीय लोकांच्या मनातलं उत्तर दिल्यानं प्रियंकावर भारतीय फॉलोअर्स जाम खूष आहेत. भारतीय चवीची स्वादिष्ट बिर्याणी जगभरातल्या खवय्यांचं मन मोहून टाकते. भारतीय चवीची आणि मसाल्यांच्या थाटाची बिर्याणी ज्यांनी चाखली ते जगात कुठेही गेले तरी बिर्याणीची चव विसरत नाही.
हे सर्व वाचताना आपल्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. बिर्याणी खाण्याची इच्छा नक्कीच झाली असेल. पण कुठे बाहेर जाऊन खायचं असा प्रश्न पडून इच्छा दाबून टाकणार असाल तर जरा थांबा. प्रियंकाला इंडियन बिर्याणी आवडते हे सांगून आम्ही थांबणार नाही तर अशी स्वादिष्ट बिर्याणी घरच्या घरी कशी करायची याची पाककृतीही देत आहोत. ती वाचा आणि आपल्या हातानं चविष्ट बिर्याणी करुन तिचा आनंद घ्या.
Image: Google
कशी करणार बिर्याणी?
बिर्याणी करण्यासाठी 1 कप बासमती तांदूळ ( भिजवलेला), 1 बारीक कापलेलं गाजर, 1 कप मटार दाणे, 6 बारीक चिरलेला घेवडा, 4 मोठे चमचे फेटलेलं दही, 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 तेजपान, अर्धा चमचा जिरे, 1 कांदा उभा चिरलेला, 2 बारीक कापलेल्या मिरच्या, 1 मोठी वेलची, 1 दालचिनी तुकडा, 5-7 काजू, 10-12 बेदाणे, चवीनुसार मीठ , 2 मोठे चमचे साजूक तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
Image: Google
बिर्याणी करताना आधी तयारी करणं महत्त्वाचं. गाजर, घेवड्याच्या शेंगा , गाजर, कांदा हे कापून घ्यावं. मटार सोलून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करावं. तूप गरम झालं की त्यात जिरे, दालचिनी, वेलची, तेजपान घालावं. मंद वास सुटेपर्यंत ते परतून घ्यावेत. मसाले परतले गेले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. नंतर आलं लसूण पेस्ट घालावी. हिरवी मिरची, हळद आणि मीठ घालावं. मध्यम आचेवर हे सर्व सतत परतत राहावं.
Image: Google
मसाला चांगला भाजला गेला की त्यात गाजर, घेवडा, मटार घालून हे सर्व 2-3 मिनीटं परतून घ्यावं. परतताना ते फार कोरडे वाटले तर त्यात थोडं पाणी घालावं. भाज्या परतल्या की त्यात भिजवून निथळून घेतलेले तांदूळ घालावेत.तांदूळ घातल्यावर गॅस मंद करावा. तांदूळ चांगले मिसळून घ्यावेत. तांदूळ हलक्या हातानं थोडावेळ परतले की त्यात फेटलेलं दही घालावं. दही घातल्यानंतर काजू आणि बेदाणे घालावेत. मग भातात 2 कप पाणी घालावं. पाण्याला उकळी आली की पुन्हा गॅसची आच मंद करावी. भांड्यावर झाकण ठेवून बिर्याणी शिजू द्यावी.
10 मिनिटांनी झाकण उघडून तांदूळ चेपून पाहावा. थोडा कच्चा वाटला तर पुन्हा झाकण ठेवून बिर्याणीला वाफ काढावी. 5 मिनिटानंतर गॅस बंद करावा. झाकण लगेच उघडू नये. वाफ पूर्ण बिर्याणीत जिरु द्यावी. खायला घेताना चिरलेली बारीक कोथिंबीर बिर्याणीवर भुरभुरावी. अशा प्रकारे बिर्याणी केल्यास बाहेर जाऊन बिर्याणी खाण्याची काय गरज. बिर्याणी खाल्ल्यानंतर आपणही प्रियंकाला हो मलाही बिर्याणीच आवडते असं आनंदानं म्हणू शकू!