कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे टेन्शन असले तरी सरत्या वर्षाला आपल्या प्रियजनांबरोबर निरोप तर द्यायचाय. येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करताना संपणाऱ्या वर्षाची शेवटची रात्र सर्वांनी मिळून साजरी तर व्हायलाच हवी. ३१ डिसेंबरसाठी तुम्हीही मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्यासोबत काही प्लॅन केला असेल. एकीकडे थंडीचा कडाका वाढत चाललाय आणि या कुडकुडत्या थंडीत आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना वेलकम म्हणून किंवा गप्पा गोष्टी करताना काय खायला द्यावे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आम्ही काही खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तेच ते पदार्थ करुन आणि खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे पदार्थ तुमचा ३१ डिसेंबर नक्कीच खास करतील. हेल्दी असणारे हे पदार्थ तुम्ही कमीत कमी वेळात घरी करु शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच यामुळे खूश तर होतीलच पण हे पदार्थ घरी करुन गरमागरम दिल्यामुळे तुमचे सगळ्यांमध्ये कौतुक होईल ते वेगळेच. पाहूयात अशाच काही सोप्या रेसिपी....
व्हेज पॉप
साहित्य -
कांदा - १ बारीक चिरलेला
शिमला मिरची - २ चिरलेल्या
गाजर - १ बारीक चिरलेले
मटार - १ वाटी सोललेले
फरसबी - १ वाटी बारीक चिरलेली
बटाटा - ३ मध्यम आकाराचे उकडून स्मॅश केलेले
लसूण पेस्ट - १ चमचा
मिरपूड - अर्धा चमचा
मिक्स्ड हर्बज - अर्धा चमचा
चिली फ्लेक्स - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
जाड पोहे - १ वाटी
कॉर्न फ्लोअर - अर्धी वाटी
मैदा - अर्धी वाटी
ब्रेडचा बारीक चुरा - २ वाट्या
तेल - १ वाटी
कृती
१. जाड पोहे पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून आपण पोहे करण्यासाठी भिजवतो तसे भिजवा.
२. पॅनमध्ये तेल घाला. मध्यम आचेवर असताना त्यामध्ये चिरलेला कांदा आणि सगळ्या चिरलेल्या भाज्या घाला.
३. त्यामध्ये लसूण पेस्ट घालून मिक्स्ड हर्ब, चिली फ्लेक्स आणि थोडी मिरपूड आणि मीठ घाला. हे मिश्रण एकजीव करुन चांगले परतून जास्त न शिजवता ३ ते ४ मिनीटे शिजवा.
४. गॅस बंद केल्यावर यामध्ये स्मॅश केलेला बटाटा आणि पोहे घालून मिश्रण एकत्र करा.
५. मिश्रण गार झाल्यावर त्याचे एकसारखे गोळे करा.
६. एका भांड्यात कॉर्न फ्लोअर, मैदा, मीठ आणि मिरपूड एकत्र घ्या. त्यामध्ये पाणी घालून त्याचे भजीसाठी करतो तसे मिश्रण करा. यामध्ये पीठाचे गठ्ठे राहणार नाहीत याची काळजी घ्या. मैद्याऐवजी तुम्ही कणकेचाही वापर करु शकता.
७. भाज्या एकत्र करुन केलेले गोळे कॉर्न फ्लोअरच्या पिठात घाला, त्यातून काढल्यावर ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळून घ्या. हीच क्रिया तुम्ही दोन वेळाही करु शकता, त्यामुळे कोटींग थोडे जाडसर होण्यास मदत होईल.
८. सगळे गोळे अशापद्धतीने दोन्ही मिश्रणांमध्ये घोळवून झाले की ते तेलात तळून घ्या.
९. जास्त लोक येणार असतील आणि ऐनवेळी गडबड होईल असे वाटत असले तर तुम्ही ही सगळी प्रक्रिया आधी करुन ठेऊ शकता, शेवटी फक्त तळण्याचे काम बाकी ठेवले तरी चालते.
पनीर पकोडा
साहित्य
आलं लसूण पेस्ट - १ चमचा
तिखट - १ चमचा
चाट मसाला - अर्धा चमचा
कसूरी मेथी - पाव चमचा
मीठ - अर्धा चमचा
डाळीचे पीठ - अर्धी वाटी
तांदूळ पीठ - पाव वाटी
हळद - पाव चमचा
हिंग - पाव चमचा
पनीर - १ वाटी चौकोनी तुकडे केलेले
तेल - एक वाटी
कृती
१. आलं लसूण पेस्ट, तिखट, चाट मसाला आणि मीठ हे एकत्र करुन या मिश्रणाने पनीर मॅरीनेट करुन ठेवावे.
२. डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, हिंग, हळद, मीठ आणि तिखट एकत्र करुन अर्धी वाटी पाण्यात हे सगळे एकत्र करुन त्याचे बॅटर तयार करावे.
३. मॅरीनेट केलेले पनीर या बॅटरमध्ये घालून तेलात तळावे. गरमागरम पनीर पकोडे खायला द्यावेत
कॉर्न चीज बॉल
साहित्य
स्वीट कॉर्न - १ वाटी
कांदा - बारीक चिरलेला अर्धी वाटी
बटाटा - उकडून स्मॅश केलेला २ वाट्या
शिमला मिर्ची - बारीक चिरलेली अर्धी वाटी
आलं लसूण पेस्ट - १ चमचा
कोथिंबीर - बारीक चिरलेली - अर्धी वाटी
चिली फ्लेक्स - १ चमचा
मिरपूड - अर्धा चमचा
धने-जीरे पावडर - अर्धा चमचा
मोझोरीला चीज - १ वाटी
ब्रेड क्रम्स - अर्धी वाटी
मीठ - चवीनुसार
कॉर्न फ्लोअर - अर्धी वाटी
मैदा - पाव वाटी
तेल - १ वाटी
कृती
१. स्वीट कॉर्न, कांदा, बटाटा, शिमला मिर्ची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, मिरपूड, धने-जीरे पावडर मोझोरीला चीज, ब्रेड क्रम्स, मीठ सगळे एकत्र करुन घ्यावे.
२. कॉर्न फ्लोअर, मैदा, चिली फ्लेक्स आणि मीठ एकत्र करुन त्यात पाणी बॅटर तयार करावे.
३. ब्रेडचा मिक्सरमध्ये चुरा करुन घ्यावा.
४. वरील मिश्रणाचा गोळा करुन त्याच्या आत मोझोरोला चीजचा छोटा गोळा ठेऊन गोल गोळे करावेत.
५. बॅटरमध्ये गोळे घोळवून वरुन ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत.
६. तेलात तळून काढावेत.