सकाळी उठल्यावर घाईच्या वेळी काय करायचे म्हणून अनेकदा नाश्त्याला तयार असलेली पोळी भाजी किंवा चहा पोळी असा नाश्ता अनेकांकडे केला जातो. दुपारच्या डब्यातही आपण पोळी भाजीच नेतो, घरी आल्यावर संध्याकाळीही चहासोबत अनेकजण पोळी खातात. रात्रीही खिचडी किंवा भात असला तरी सोबत पोळी-भाजी असतेच. असे तीन त्रिकाळ पोळीभाजी खाऊन खरंच शरीराचे पोषण होते का तर नाही. बाहेरचे जंक फूड खाण्यापेक्षा पोळी-भाजी खाल्लेली केव्हाही चांगली हे आपल्याला माहित असेल तरी सतत पोळी-भाजी खाल्ल्याने आरोग्याचे पुरेसे पोषण होत नाही हे लक्षात घ्यायला हवे. आता तर मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून मुलं दिवसातून ४ वेळा काहीतरी वेगळं खायला दे म्हणून आपल्या मागे लागलेली असतात. अशावेळी त्यांना सतत वेगळं आणि तरीही झटपट होणारं काय खायला द्यायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी शरीराचे पोषण होणारे काय खायला देता येईल ते पाहूया...
१. भरपूर भाज्या घालून सँडविच
सँडविच हा साधारणपणे बाहेर मिळणारा पदार्थ आहे. पण आपण हाच पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने घरी केला तर मुलांना बाहेरचा पदार्थ घरात मिळाल्याचा आनंद तर होईलच आणि नकळत सगळ्या भाज्या पोटात जायला मदत होईल. दोन किंवा फारतर चार ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यामध्ये एक उकडलेला बटाटा, एक लहान आकाराचे उकडलेले किंवा कच्चे बीट आणि काकड, टोमॅटो, सॅलेडची पाने, कोबी, शिमला मिरची असे घालून हे सँडविच करावे. तसेच यासोबत भरपूर कोथिंबीर आणि पुदिना असलेली चटणी द्यावी. सँडविचवर चीजही घालावे म्हणजे मुलांना प्रोटीन्स मिळण्यास मदत होते आणि चीजमुळे मुले अतिशय आनंदाने हा पदार्थ खातात. हे ब्रेड भाजताना घरातील तूपाचा वापर केल्यास उत्तम.
२. डाळींचे डोसे
हिरवे मूग, उडीद आणि हरभरा डाळ किंवा तांदूळ आणि मूग, मसूर डाळ अशा कोणत्याही डाळी भिजत घालाव्यात. त्यामध्ये आलं-मिरची-लसूण मीठ आणि कोथिंबीर घालून ते मिक्सर करावे. यामध्ये मीठ घालून याचे तव्यावर गरमागरम डोसे करावेत. डोसे हा मुलांच्या आवडीचा पदार्थ असतो. डाळींमुळे शरीराला प्रोटीन्स मिळतात, त्यामुळे डाळी जास्त प्रमाणात पोटात जायला हव्यात. त्यासोबत दही दिल्यास याची पौष्टीकता आणखी वाढते.
३. पालेभाज्यांची भजी किंवा पुऱ्या
मुलं अनेकदा पालेभाज्या खायला नाक मुरडतात. मात्र तळलेले आणि चमचमीत काही असेल तर मुलं अगदी आवडीने तो पदार्थ खातात. पालक, मेथी, कोथिंबीर या आपण सामान्यपणे वापरत असलेल्या पालेभाज्या. आपण ज्याप्रमाणे कांदा भजींसाठी डाळीचे पीठ भिजवतो तसेच पीठ भिजवून त्यामध्ये कांद्याऐवजी पालक, मेथी, कोथिंबीर बरपूर प्रमाणात घातली तर त्याची अतिशय चविष्ट भजी होतात. यामध्ये तिखट, मीठ आणि ओवा घालावा त्यामुळे स्वाद वाढण्यास मदत होते. भजी तळलेली असल्याने गरमागरम सॉससोबत किंवा नुसतीही खायला छान लागतात. इतकेच नाही तर या भाज्या गव्हाचे पीठात घातल्या आणि त्यात आलं-मिरची लसूण पेस्ट, धने-जीरे पावडर घालून मळले. तर त्याच्या पुऱ्याही खूप छान होतात.
४. मिसळ
कडधान्ये भिजवून ठेवणे कोणत्याही वेळेला आपल्या उपयोगी येते. एखादवेळी घरातल्या भाज्या संपल्या किंवा नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न असेल तर झटपट मिसळ हा उत्तम पर्याय असतो. मोड आलेल्या कडधान्याला फोडणी देऊन वाफ घ्यायची. त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घालायचा. त्यावर डाळीच्या पिठापासून केलेले फरसाण घालायचे. कडधान्य आणि डाळीचे फरसाण, कांदा टोमॅटो हे सगळेच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने याचा शरीराला कोणताही त्रास होत नाही आणि तरी वेगळे किंवा चमचमीतही खायला मिळते.