-सायली जवळकोटे
खाण्यापिण्याची प्रादेशिक संस्कृती जशी रोजच्या आहारात डोकावते तशी ती सणवार, श्राध्द-पित्रं नैवेद्यातही डोकावते. पश्चिम महाराष्ट्रात पित्राला जो स्वयंपाक केला जातो तो वैशिष्टपूर्ण असतो. यात महाराष्ट्रातील इतर प्र्देशातल्या पदार्थांसारखे पदार्थही आहेत आणि काही वेगळे पदार्थही आहेत. यामागे परंपरा, भौगोलिक विशेष यांचा प्रभाव आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने खीर,पूरी,वडे, अळूच्या वड्या,भाज्या,भात, चटण्या,कोशिंबिरी, उडीद वडे, साधी पोळी, पुरण पोळी, लाडू, बूंदी आदि पदार्थ प्रामुख्यानं बनवले जातात,तसेच वेलवर्गीय भाज्या जसे दोडका, घोसावळ,पडवळ यांचा समावेश पित्रांच्या भाज्यांमधे केला जातो. येथील पित्रांच्या स्वयंपाकात आलं,तीळ ,जवस,उडीद याचा वापर केला जातो.मात्र कांदा ,लसूण,बटाटा, बिट,मुळा आदि कंद भाज्या, कोहळा,भोपळा,वांगी,छोले, हरभरा,मसूर मात्र वापरले जात नाहीत.
Image : Google
पित्रामधील येथील प्रमुख पदार्थ म्हणजे गव्हाची खीर . पश्चिम महाराष्ट्राच्या जवळ कर्नाटक सीमा आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव म्हणून येथे तांदळाच्या खीरी ऐवजी गव्हाची खीर केली जाते. फार कमी घरांमधे तांदळाची खीर करतात. तांदळाची खीर बनवतांना आंबेमोहर,इंदायणी किंवा बासमती तांदूळ घेवून तो अर्धा तास पाण्यात भिजत ठेवतात.नंतर मिक्सरला जाडसर वाटून घेतात.पातेल्यात दूध उकळत आलं की वाटलेले तांदूळ दुधात घालून शिजत ठेवतात.साधारण तांदूळ शिजत आले की दुधाला दाटपणा येतो.त्यामध्ये साखर घालून पुन्हा थोडेसे शिजवून घेतले जाते.शेवटी खिरीत तुपावर परतलेला सुकामेवा आणि वेलची पावडर घातली जाते.ही खीर भोजनासाठी तयार .
पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात गव्हाची खीर केली जाते. येथे बाजारात ख़िरीचे गहू मिळतात.आज काल शक्यतो हेच वापरले जातात.हे गहू किमान तासभर पाण्यात भिजत ठेवतात. नंतर कुकरमध्ये तीन ते चार शिट्टी होईपर्यंत शिजवून घेतले जातात.एका भांडयात आधण आलेले पाणी घेवून त्यात आवडीनुसार गूळ टाकला जातो. गूळ विरघळला की त्यामध्ये शिजलेला गहू घालून एकजीव केला जातो.त्यानंतर त्यामध्ये तुपात परतलेला सुकामेवा, सुंठ बडिशेप, खोबर वाटून बनवलेली जाडसर पावडर घालून मिसळली जाते ही पारंपरिक पद्धत आजही लोकप्रिय आहे.
Image: Google
पश्चिम महाराष्ट्रात श्राद्धातला महत्वपूर्ण दुसरा पदार्थ म्हणजे उडीद वडे.आदल्या रात्री उडीद डाळ भिजत घातली जाते.दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून निथळून डाळ मिक्सरमधून वाटून घेतली जाते.त्यात हिरवी मिरची,कोथींबीर,थोडंसं आलं घालून बारीक वाटून घेतल्यानंतर मीठ आणि चिमूटभर बेकिंग पावडर घालून वडे तळून घेतात.या वडयांशिवाय श्राद्धाचं जेवण अपूर्ण समजल जातं. येथे काहीजण या वडयाच्या पीठामध्ये तीळ घालतात.तीळाला खूप महत्वाच स्थान आहे.
इतर भाज्या ,कोशिंबिरी,चटण्या आवडीनुसार बनवल्या जातात. श्राद्ध-पित्रं भोजनामध्ये लिंबू ,मीठ पानात वाढलं जात नाही. मात्र पूर्ण पान वाढल्यानंतर पानामध्ये आल्याचा इंचभर तुकडा ठेवला जातो.आलं पानात वाढण्याचा हेतू चुकून एखादा पदार्थ बनवायचा राहून गेला तर आलं गेलं चूक भूल माफ असावी हा असतो.
sayalijavalkote@gmail.com