आहार ही आपल्या आरोग्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आपल्या आरोग्याच्या बहुतांश तक्रारी या आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवतात. मात्र आहार चांगला असेल तर आरोग्य उत्तम राहण्यास हातभार लागतो हेही तितकेच खरे. यासाठी कोणत्या वेळेला कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा. जेवताना कोणते पदार्थ कोणत्या क्रमाने खायला हवेत यांसारख्या आहाराशी निगडीत काही गोष्टींची माहिती असायला हवी. रक्तातील साखरेची पातळी चांगली राहावी यासाठी नेमके काय करायला हवे याविषयी बायोकेमिस्ट आणि लेखिका असलेल्या जेसी आहाराच्या काही टिप्स देतात. पाहूयात त्या आहाराबाबत काय सांगतात.
१. जेवताना सगळ्यात आधी सलाड खायला हवे. त्यानंतर जेवणातील प्रोटीनचा भाग म्हणजेच भाजी, आमटी किंवा चटणी, पनीर, दही यांसारखे पदार्थ आणि सगळ्यात शेवटी कार्बोहायड्रेटस म्हणजेच पोळी, भाकरी असे धान्याचे पदार्थ खायला हवेत. त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण चांगले राहण्यास मदत होते.
२. आपण कार्बोहायड्रेटचे सेवन करतो त्यानंतर ३० ते ६० मिनीटांनी आपल्या रक्तातील साखर वाढते. पण कार्बोहायड्रेटसोबत किंवा त्याच्या आधी तुम्ही काय खाता त्यावर तुमची शगर वाढणार की नाही हे ठरते. तसेच तुम्ही घेत असलेल्या कार्बोहायड्रेटमध्ये फायबरचे प्रमाण किती आणि तुमचे शरीर फायबरची निर्मिती किती प्रमाणात करते यावर रक्तातील साखरेची पातळी ठरते.
३. रक्तातील साखरेची पातळी दिर्घकाळ जास्त राहीली तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हार्मोन्स आणि प्रोटीन्सच्या पातळीवर शुगरचा परिणाम होतो आणि मग शरीराचा दाह होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पुन्हा हृदयाच्या तक्रारी आणि मधुमेहाच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे शुगर नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
४. सलाड म्हणजेच फायबरच्या ऐवजी जेवणात सुरुवातीला प्रोटीन किंवा स्निग्ध पदार्थ घेतले तर काही हार्मोन्सचे प्रमाण कमी-अधिक होते आणि त्याचा रक्तातील साखरेवर परिणाम होऊन आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. आधी सलाड खाल्ले तर पोट भरलेले राहते आणि नकळत आपण कमी जेवतो. जास्त अन्न खाल्ले गेले तर शरीराला जास्त प्रमाणात काम करावे लागते आणि त्यामुळे साखरेची जास्त प्रमाणात निर्मिती होते. त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला सलाड खाणे केव्हाही फायदेशीर ठरते.