चहा म्हटलं का तो मस्त आलं टाकलेलाच असावा हा नियमच आहे जणू. पावसाळ्यात आल्याची गरज खूपच लागते. पण एरवीही आलं हे हाताशी लागतंच. हिवाळ्यात आलेपाकाच्या वड्यांना महत्त्वं असतं. उन्हाळा आहे म्हणून गरम गूणाचं आलं कमी लागतं असं नाही. भाजी-आमटीच्या मसाल्यांचा स्वाद वाढवण्यासाठी आलं हे लागतंच. पाचक गुणाचं हे आलं पावसाळ्याच्या ॠतूत हमखास होणाऱ्या अपचन आणि मळमळीवर परिणामकारक ठरतं. कोरोना संसर्गात तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आलं हे परिणामकारक सिध्द झालं आहे. एरवीही आल्याला असलेली मागणी या कोरोनामुळे तर खूपच वाढली . त्याचाचा परिणाम म्हणजे आल्याचा वापर वाढला. मागणी जास्त झाली की त्याचा परिणाम पुरवठ्यावर होणारच. जगभरात विशेषत: भारत, चीन आणि युरोपात आल्याची मागणी वाढली आहे. मागणी -पुरवठ्याचं हे गणित जमवताना अस्सल मालाची जागा नकली माल कधी घेतो ते कळतंही नाही. सध्या आल्याच्या बाबतीत तेच होत आहे . बाजारात मोठ्या प्रमाणावर नकली आलं विकण्यास आलं आहे. नकली आलं हे अस्सल आल्याच्या रुपाशी मिळतं जुळतं असल्यानं त्याची पारख करताना ग्राहकांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी नकली आलं ओळखायला शिकणं हाच त्यावरील उपाय आहे.
आल्यात फसवणूक करताना जंगली झाडाची मुळं ही आलं म्हणून विकली जात आहे. या नकली आल्यात ना आल्याचे गुण असतात ना त्याचा तिखट स्वाद. पण केवळ रुप पाहून वस्तू घेण्याची सवय असलेल्या ग्राहकांची येथेच फसवणूक होते. आल्यातील ही फसवणूक टाळण्यासाठी नकली आलं ओळखायला शिकायला हवं.
आल्यातील फसवणूक कशी ओळखाल?आलं हे सामान्यपणे महाग असतं. आणि म्हणूनच स्वस्त दरातलं नकली आलं आणून ते अस्सल आल्याच्या भावात विकून फायदा कमावला जातो. पण नकली आलं डोळ्यांनी ओळखता येत नसलं तरी ते ओळखण्याचे इतर पर्यायही आहेत.
- आलं जर अस्सल असेल तर त्याचं सालं हेल पातळ असतं. ते नखानं लगेच खरवडलं जातं. आल्याची साल खरवडून किंवा थोडा आल्याचा तुकडा तोडून त्याचा वास घ्यावा. अस्सल आल्याचा वास हा उग्र असतो. तिखट असतो. आल्याचा तुकडा नाकाजवळ धरला तरी तो वास लक्षात येतो. अस्सल आल्याची चवही तिखट असते. जीभेवर ठेवता क्षणीच आलं तिखट लागतं. याउलट नकली आल्याची साल ही कडक असते. आणि त्या आल्याचा वास आणि स्वादही तीव्र नसतो.
- नकली आल्याची चमक ही जास्त असते. पावसाळ्याच्या दिवसात चिखल माती लागलेली नको म्हणून स्वच्छ आल्याच्या आपण शोधात असतो आणि हे नकली आलं त्याच्या चकचकीतपणाने लक्ष वेधतो. त्यामुळे अशा अति स्वच्छ आल्याच्या मोहात न पडलेलंच बर. थोडं माती लागलेलं आलं हे अस्सलतेची खूण आहे.
- सध्या आलं स्वच्छ करताना कमी पाण्यात ते स्वच्छ व्हावं म्हणून एक प्रकारच्या अॅसिडचा उपयोग केला जातो. असं आलं दिसायला स्वच्छ असलं तरी प्रकृतीस मात्र अपायकारक ठरतं. तेव्हा स्वच्छ अद्रकाचा अट्टाहास न धरता थोडं माती लागलेलं आलं आणून ते घरी पाण्यानं स्वच्छ करावा हा उत्तम उपाय!