मेघना सामंत
बिस्किट खुसखुशीत तर आपणही खुशीत. पण मध्ययुगीन बिस्किटं पाहिली तर हसावं की रडावं असा प्रश्न पडेल. इतकी कडक की त्यांना स्टोन ब्रेडच म्हटलं जाई. बिस्किट (मूळ लॅटिन- पानिस बिस्कोटस) या शब्दाचा अर्थ आहे-- दोनदा भाजलेला ब्रेड. आधी भट्टीत भाजून, नंतर कडकडीत उन्हात वाळवून, साठवून ठेवलेले ब्रेडचे तुकडे. त्यांत फारसा गोडवा नसे. कित्येकदा फक्त मीठच घातलेलं असायचं. टिकाऊपणा हा एकमेव गुण. टोस्टशी नातं सांगणारे काही अश्मयुगीन अवशेष इंग्लंडमध्ये सापडलेत पण ते ब्रेडचे आहेत की पॅनकेकचे हे आज ठरवणं मुश्किल. चौदाव्या ते सोळाव्या शतकांतल्या युरोपियन दस्तावेजांमध्ये बिस्किटांचे उल्लेख आढळलेत. समुद्रसफरींवर चाललेल्या खलाशांसाठी किंवा सैनिकांसाठी साठवणीचा खुराक म्हणून बिस्किटं भाजली जात. ती गरम पाण्यात, दुधात, अगदी रश्श्यातसुद्धा बुडवून खाल्ली जात. पुढे युरोपातल्या उच्चभ्रूंमध्ये बिस्किटाचा बऱ्यापैकी प्रसार झाला. जेवणानंतरचं गोड म्हणून, मध आणि फळांसोबत. गंमत म्हणजे ती पाचक मानली जात. (डायजेस्टिव्ह बिस्किट्स कुठून आली ते कळलं ना?)
अभ्यासकाच्या नजरेतून पाहिलं तर युरोपीय वसाहतवादाचा इतिहास-भूगोल बिस्किटावर वाचायला मिळेल. सतराव्या शतकाच्या आसपास, ब्रिटिशांनी वेस्ट इंडियन बेटांवर ताबा मिळवला. तिथे साखरेचं प्रचंड उत्पादन घ्यायला सुरुवात केली, ती युरोपात स्वस्तात मिळायला लागली, तिथूनच बिस्किटांचं भाग्य फळफळलं. साखर घातलेली गोड बिस्किटं कोणाला आवडणार नाहीत हो? मग औद्योगिक क्रांती झाली. घरगुती ओव्हन्स सुटसुटीत झाली, व्यावसायिक भट्ट्यांमध्ये बनणारी बिस्किटं घराघरांत भाजली जाऊ लागली. एकीकडे ब्रेडपासून टोस्ट, रस्क बनत होतेच, केकचं प्रस्थही वाढत होतं. तेव्हाच बिस्किटांचा पोत आमूलाग्र बदलणारी-- लोणी, मलई घालून खुसखुशीतपणा आणण्याची--युक्ती गृहिणींच्या हाती लागली.
त्याच सुमारास, चहा, कॉफी, कोको, हॉट चॉकोलेट अशी निरनिराळ्या देशांतून आलेली पेयंही युरोपात लोकप्रिय व्हायला लागलेली. चहाने तर उमरावांपासून ते सामान्यांपर्यंत सगळ्यांच्या खाद्यजीवनात क्रांती घडवली. ब्रिटनमध्ये दुपारचं चहापान, त्यासोबत बिस्किटं देणं अनिवार्य झालं. मग ब्रिटिशांच्या सगळ्या वसाहतींमध्ये आपसूक चाय-बिस्कुटाची पद्धत रुळली ती रुळलीच.
सकाळसंध्याकाळ चहाबरोबर, मुलांच्या डब्यात, नुसतंच तोंडात टाकायला, मधल्या वेळचं खाणं म्हणून, कधी आजारी माणसासाठी खुराक म्हणून तर कधी सणासुदीची भेटवस्तू म्हणून, बिस्किट हे हवेच. कुरकुरीत क्रॅकर्स, वेफरबिस्किटं असोत नाहीतर दोन बिस्किटांत चॉकोलेट क्रीमचा थर असलेली बर्बन,ओरिओसारखी असोत, भरपूर टिकणारा आणि सर्वांना आवडणारा खाऊ ही बिस्किटांची सर्वात जुनी ओळख आजदेखील चांगलीच टिकून आहे.
( लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)