Lokmat Sakhi >Food >  साड्या, दागिने, पर्सेस, घड्याळं या रुपांतले फाँडण्ट केक नक्की आले कुठून? शोधले कुणी?

 साड्या, दागिने, पर्सेस, घड्याळं या रुपांतले फाँडण्ट केक नक्की आले कुठून? शोधले कुणी?

केकचे व्हायरल फोटो आपण पाहतो, फाँडण्ट केक तर भारीच लोकप्रिय झालेत, पण हे हे कल्पक केक आले कुठून? (Fondant cake)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 04:10 PM2021-12-21T16:10:47+5:302021-12-21T16:14:09+5:30

केकचे व्हायरल फोटो आपण पाहतो, फाँडण्ट केक तर भारीच लोकप्रिय झालेत, पण हे हे कल्पक केक आले कुठून? (Fondant cake)

Where exactly did the fondant cake come from? Who discovered? |  साड्या, दागिने, पर्सेस, घड्याळं या रुपांतले फाँडण्ट केक नक्की आले कुठून? शोधले कुणी?

 साड्या, दागिने, पर्सेस, घड्याळं या रुपांतले फाँडण्ट केक नक्की आले कुठून? शोधले कुणी?

Highlightsचवीला नुसतेच गोडमिट्ट असल्यामुळे फॉंडण्ट केक्स खायला कुणालाच फारसे आवडत नाहीत.

मेघना सामंत

फसगत करणारे केक आजकाल सॉलिड व्हायरल झालेत ना? हॉटेल्समध्ये, समारंभात टेबलावर ठेवलेली फुलंफळं, प्राणी, पक्षी, अगदी साड्या, दागिने, पर्सेस, घड्याळंसुद्धा काहीकाही म्हणून उचलून बघायची सोय नाही. हुबेहूब भासणारे केकच असणार ते.... फॉंडण्ट केक्स! (Fondant cake)
पण हे मुळात केकचं सुशोभन म्हणून नव्हतं जन्माला आलेलं. ते होतं एक संरक्षक कवच. मोठमोठ्या पार्ट्यांसाठी तितकेच अवाढव्य केक बनायचे. ते खराब होऊ नयेत म्हणून साखरेच्या पाकाचं आवरण त्याला चढवलं जायचं. बाहेरच्या हवामानाशी संपर्क तोडल्यामुळे आतला केक अधिक दिवस टिकून राहायचा. हे चिलखत अगदी साधं. कलाकुसर काही नाही. पण कल्पक बेकर्सनी त्यातूनच फुलंबिलं बनवून केक सजवणं सुरू केलं.
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात रॉयल आयसिंगने केक सजावटीच्या क्षेत्रात राज्य केलं. नंतर आली गम पेस्ट. यातून अप्रतिम कलाकुसर करता येते. पण रॉयल आयसिंग आणि गम पेस्ट दोन्ही सुकल्यावर इतके कडक बनतात की चावतासुद्धा येत नाहीत. मग आधुनिक फॉंडण्ट जन्माला आलं. तसं ते सोळाव्या शतकापासून युरोपात अस्तित्वात होतं पण १९५० च्या आसपास रसायनशास्त्राचा उपयोग करून त्याची सुधारित आवृत्ती काढण्यात आली.

(Image : Google)

फॉंडण्ट म्हणजे थोडक्यात सांगायचं तर साखरपाणी. पूर्वी त्यात लिंबूरस, गुलाबपाणी असायचं, आता जिलेटीन, ग्लिसरीनसारखे घटकही मिसळले जातात. त्यामुळे हे छान मऊसर होतं आणि वळवून, लाटून मनासारखा आकार देता येतो. झालं. केक सजावटकारांना एक लवचीक पर्याय सापडला. पुढे खाद्यरंग, सिरप्स वगैरे वापरून जिवंत वाटणारी साखरशिल्पं घडवली जाऊ लागली. अलीकडे कुकरी शोज, समाजमाध्यमं यातून फॉंडण्ट अतोनात लोकप्रिय होत चाललंय. म्हणजे आतल्या वस्तूपेक्षा बाह्यकवच भावखाऊ. साखर कलाकार तयार करायच्या शाळा असतात. म्हणजे केक करणारे वेगळे. हे फक्त डेकोरेशनवाले. यांच्यासाठी स्काय इज द लिमिट. पाहिजे ते घडवा ! अर्थात गेल्या चाळीसपन्नास वर्षांत जगभरात साखरेचं उत्पादन प्रमाणाबाहेर झाल्याने हे साध्य झालंय.

(Image : Google)

चवीला नुसतेच गोडमिट्ट असल्यामुळे फॉंडण्ट केक्स खायला कुणालाच फारसे आवडत नाहीत. पण चकित करणारं सुशोभन हवं असेल तर फॉंडण्टला पर्याय नाही. त्याची चवसुद्धा बहारदार करण्यासाठी सध्या पुष्कळ प्रयत्न चालू आहेत. दॅट्स द नेक्स्ट बिग थिंग!

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Where exactly did the fondant cake come from? Who discovered?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.