Join us  

पाक चुकतो आणि रव्याचा लाडू फसतो; ही घ्या परफेक्ट पाकाची कृती! लाडू उत्तमच होतील. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 6:19 PM

रव्याचे लाडू एकदम फकफकीत तर कधी मिश्रण इतकं ओलसर होतं की लाडू वळणंच शक्य होत नाही. हे असं का होतं. परफेक्ट रव्याचा लाडू कसा जमेल?

ठळक मुद्दे जर तुपाचं आणि नारळाचं प्रमाण बेताचं असेल तर अशा लाडूंना एकतारी पाक लागतो. दोनतारी पाकात पाण्याचं प्रमाण कमी असतं. बेताचं तूप आणि नारळ असलेलं मिश्रण अशा पाकात घातलं की आद्रता सर्व कणांना पुरेशी होत नाही आणि असं मिश्रण फळफळीत होतं. लाडू वळताना थोडा दुधाचा हात लावावा आणि लाडू वळावेत.

गौरी गणपतीत रव्याचे पाकातले लाडू महिला हौशीनं करतात.पण अनेकींचा हिरमोड होतो. सोपे वाटणारे लाडू बिघडतात. पाक चुकला की लाडू बिघडतो. तूप, ओलं नारळ  आणि पाक यांच्यातला तोल सांभाळता आला तर हे रव्याचे लाडू छान होतात.

छायाचित्र- गुगल

रव्याच्या लाडूतलं पाकशास्त्र

साधारणपणे रव्याचा लाडू करताना रवा तुपावर भाजला जातो. रवा भाजत आला की, त्यामध्ये ओला नारळ घालून आणखी भाजतात. गरम पाक करून त्यामधे हे मिश्रण घालून खूप वेळ तसंच ठेवतात. रवा व नारळाचं मिश्रण पाकातील आद्रता शोषून घेतं आणि साखरेचं स्फटिकीभवन होऊन मिश्रण घट्ट होवून लाडू वळता येतात. जर तुपाचं आणि नारळाचं प्रमाण बेताचं असेल तर अशा लाडूंना एकतारी पाक लागतो. मिश्रण बर्‍यापैकी कोरडं असतं आणि ते आद्रता बर्‍यापैकी शोषून घेतं. पण रवा भाजतांना जर भरपूर तूप घातलं तर स्निग्ध पदार्थाचे रेणू रव्याच्या कणांमध्ये जास्त प्रमाणात जाऊन बसतात. नारळ जास्त झाला तरी त्यातील अंगीभूत स्निग्धांशामुळे रव्याच्या कणांमध्ये स्निग्ध पदार्थाचे रेणू जास्त प्रमाणात जातात. हे रेणू पाकामधली आद्र्ता संपूर्णपणे शोषून घेऊ शकत नाहीत. अशा वेळी पाक जास्त चिकट करावा लागतो. दोनतारी पाकात पाण्याचं प्रमाण कमी असतं. बेताचं तूप आणि नारळ असलेलं मिश्रण अशा पाकात घातलं की आद्रता सर्व कणांना पुरेशी होत नाही आणि असं मिश्रण फळफळीत होतं. त्याचे लाडू भराभर वळले तरी कोरडे होतात. 

छायाचित्र- गुगल

सर्व घटकांचं प्रमाण बरोबर असणं आणि त्याप्रमाणे पाक एकतारी, दीड तारी किंवा दोन तारी असा बरोबर करणं अतिशय आवश्यक असतं. मिश्रणात खव्यासारखा पदार्थ असेल, ते मऊ असेल तर साहजिकच आद्रता कमी पुरते आणि त्यामुळे पाक चांगला चिकट करावा लागतो. रव्याच्या लाडूतील घटकांचं हे प्रमाण समजून घेतल तर पाक बिघडत नाही आणि पाक जमला की लाडू बिघडत नाही.

छायाचित्र- गुगल

रव्याचा लाडू

दोन वाट्या बारीक रवा, पाऊण वाटी तूप, 2 वाट्या खोवलेलं ओलं नारळ, दीड वाटी साखर, वेलची पावडर आवडत असल्यास थोडा खवा एवढं जिन्नस घ्यावं.रव्याचे लाडू करताना आधी रवा तुपावर चांगला भाजून घ्यावा.  रवा भाजत आला की लगेच खोवलेलं नारळ घालून तेही  रव्यासोबत चांगलं परतून घ्यावं. रवा खमंग भाजला गेला की गॅस बंद करावा. पाक करताना साखर बुडेल इतकंच पाणी घ्यावं. सर्व साहित्य बेताचं असलं तर दोन तारी पाक करावा. पाक झाला की तो भाजलेल्या रव्यात घालावा. मिश्रण एकदा हलवून् घ्यावं. ते थोडं थंड होवू द्यावं.  लाडू वळताना थोडा दुधाचा हात लावावा आणि लाडू वळावेत.