रोजच्या आहारात पोळीपेक्षा भाकरी जास्त चांगली, पूर्वीचे लोक भाकरी खात होते म्हणून त्यांची तब्येत चांगली होती अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीस असल्यामुळे तुम्ही आहारात भाकरीचा समावेश करत असाल तर आधी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्वारी थंड असल्याने ती उन्हाळ्यात किंवा वर्षभर खावी तर बाजरी उष्ण असल्याने ती थंडीच्या दिवसांत खायला हवी हेही आपण नेहमी ऐकतो. ज्वारी, बाजरी याशिवाय नाचणी, मका, तांदूळ यांसारख्या धान्यांच्या भाकरी देशातील विविध भागांमध्ये आवर्जून केल्या जातात. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, डायबिटीस यांसारख्या जीवनशैलीविषयक समस्यांसाठी नियमित आहारात भाकरीचा समावेश करणे उपयुक्त असते असे आपल्याला वाटत असते. आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी भाकरी खाणे फायदेशीर असले तरी ती कशी, किती खायला हवी याचे काही नियम आहेत. नाहीतर भाकरी खाऊनही तुमच्या आरोग्याला त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही. पाहूयात याबाबत आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर याबद्दल काय सांगतात....
१. भाकरीमुळे वजन कमी होते असे आपल्याला वाटते पण पोळीपेक्षा भाकरीचा आकार मोठा असतो. पोळीसाठी २५ ते ३० ग्रॅम पीठ लागत असेल तर भाकरीसाठी ४० ते ५० ग्रॅम पीठ लागते. भाकरीचा आकार पोळीपेक्षा मोठा असल्याने आपण प्रत्यक्षात जास्त खातो, त्यामुळे वजन कमी होत नाही. पोळीच्या आकाराची भाकरी असेल तर भाकरी खाल्लेली केव्हाही चांगली.
२. भाकरी पचायला पोळीपेक्षा हलकी असते असे आपल्याला वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे भाकरीमध्ये तेल नसते. पोळीच्या पीठात मळताना, घडी घालताना आणि पोळी झाल्यावरही आपण वरुन तेल लावतो. भाकरीसाठी तेल लागत नसल्याने ती आपल्याला हलकी वाटते. पण त्यामध्ये धान्याचा फारसा वाटा नसतो. सगळी धान्ये पचायला सारखीच असतात.
३. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका या प्रत्येक पीठाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यामुळे प्रत्येक पीठाचा शरीराला वेगवेगळा फायदा होतो. हे लक्षात घ्यायला हवे. ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. तर गव्हामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. बाजरीत कॅल्शियम जास्त असते तर नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. ज्वारीमध्ये बी कॉम्प्लेक्स जास्त प्रमाणात असते.
४. कोणतीही भाकरी करताना एकाच पीठाची न करता दोन धान्ये एकत्रित दळून त्याची भाकरी करणे केव्हाही जास्त फायद्याचे असते. त्यामुळे भाकरीचे पोषण अधिक वाढते. दोन धान्ये एकत्र केल्याने त्याचा ग्लाायसेमिक इंडेक्स कमी होतो. डायबिटीस किंवा प्री डायबिटीक असणाऱ्यांसाठी किंवा घरात डायबिटीसचा इतिहास असणाऱ्यांसाठी ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रणात राहणे महत्त्वाचे असते.
५. एका जेवणात पोळी आणि एका जेवणात भाकरी असे खाल्ल्यास जास्त चांगले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गव्हामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते जे ज्वारी, बाजरीमध्ये कमी असते. त्यामुळे दोन्ही जेवणात भाकरी खाल्ल्यास शरीराला प्रोटीन मिळत नाही. त्यामुळे तुमच्या इतर आहारात प्रोटीन असल्यास दोन्ही जेवणांमध्ये भाकरी खाल्ली तरी चालते.
६. गव्हात ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते, ते काहींना पचत नाही, ते वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्यावरच समजते. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी या भाकरीच्या इतर धान्यांमध्ये ग्लुटेन नसते. ग्लुटेनमुळे काहींचे वजन वाढते तर काहींचे कमी होते. पण वैद्यकीय सल्ल्याने याबाबत निर्णय घेतलेला केव्हाही चांगला. तसेच गहू आणि भाकरीसाठी वापरली जाणारी इतर धान्ये यांमध्ये जवळपास कॅलरीज सारख्याच असतात.