मेघना सामंत
कोणत्या मिष्टान्नाच्या नावात फूलही आहे आणि फळही?---हाहाहा-- गुलाबजामुन. नावात गोडवा ओतप्रोत, ऐकूनच विरघळत असतो आपण, मग विचार येतो, हा कुठल्या गावचा? याला फुलाफळाचं जोडनाव पडलं कसं? जरा सुरुवातीपासून शोध घेऊ.
सतराव्या शतकात दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या शाहजहान बादशहाच्या खानसाम्यानं काही नवीन मिष्टान्न बनवावं म्हणून बरेच प्रयोग केले. त्यातून गुलाबजामुनची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे. त्याने दुधाच्या दाणेदार खव्याचे गोलाकार वळून तुपात तळले आणि दिले साखरेच्या पाकात सोडून. वर गुलाबपाण्याचा शिडकावा करून पाक सुगंधितही केला. टपोऱ्या जांभळाएवढा (नाहीतर प्लमएवढा म्हणा) आकार आणि गुलाबांचा सुवास… म्हणून हा गुलाब-जामुन. दोन्ही शब्द पर्शियनमधून आलेले. बादशहाला ही मिठाई कितपत आवडली कुणास ठाऊक, पण तिनं पुढल्या दोन शतकांत अख्ख्या भारतीय उपखंडाला वेड लावलं की.
परंतु अभ्यासकांच्या मते गुलाबजामुन स्फुरला असावा ‘बामिये’ वरून. आता हा ‘बामिये’ कोण?
मध्यपूर्वेतल्या पुरातन संस्कृतीतल्या मानवाने स्वतः रांधलेल्या पहिल्यावहिल्या कृतींपैकी एक म्हणजे ‘बामिये’. पिठाचे गोळे तळून किंवा भट्टीत भाजून, भरपूर मधात बुडवून काढलेले असं ‘बामिये’चं सरळसाधं रूप. हे हजारो वर्षांपूर्वीचं मिष्टान्न. तर, प्राचीन आशिया आणि युरोपमध्ये या आद्य मिष्टान्नाची फार वाहवा झाली. मध्यपूर्वेत त्याला कितीतरी नावांनी ओळखलं जाऊ लागलं. या सोप्याशा कृतीतून अनंत प्रकार जन्मले. समस्त खाद्यविश्वात अतीच सुप्रसिद्ध असलेल्या फ्रेंच शू पेस्ट्री (choux pastry) आणि स्पॅनिश चुरॉस या पदार्थांचे मूळही ‘बामिये’ मध्ये आढळतं. निव्वळ पिठापासून बनलेल्या ‘बामिये’;नी भारतात येऊन दुग्धजन्य रूप धारण केलं. याला कारण गंगा यमुनेच्या दुआबातली दुधाची अमर्याद उपलब्धता. त्यामुळे गुलाबजामुनला एक खास भारतीयता लाभली. मूळ ‘बामिये’ सारखे चविष्ट गुलगुले उत्तर भारतात सगळीकडे बनतात म्हणा, पण मिष्टान्नांच्या स्पर्धेत, शाहजहानच्या रसोईखान्यातल्या खव्याच्या गोड गोलकांनी ‘बामिये’ आणि गुलगुल्यांना मात दिली.
महाराष्ट्रात गुलाबजामने लोकप्रियतेत श्रीखंड- बासुंदीला केव्हाच मागे टाकलंय. तेव्हा मूळ कृती आणि नावसुद्धा पर्शियातून आलं असलं तरी गुलाबजामुनला अस्सल भारतीय मिष्टान्नांचा सम्राट म्हणायला हरकत नसावी.
आणि हो, शाहजहानचं ऋण आपण ताजमहालसाठी मानतोच. ते गुलाबजामुनसाठीही आवर्जून मानायला हवं.
जाता जाता: हजारो वर्षांपूर्वीच्या बामियेची अजून चलती आहे बरं.
इस्लामिक देशांत, खास करून रमजानच्या सणाला यांचं मोठं प्रस्थ. लंबगोल, शंखाच्या, कवडीच्या आकाराचे, चौकटीची नक्षी काढलेले, आयसिंगच्या नॉझलमधून पाडलेले कंगोरेदार, आणि मधापेक्षाही चक्रफूल, बडीशेप, दालचिनी, व्हॅनिला, केशर, वेलची, केवडा अशा निरनिराळ्या स्वादांच्या साखरपाकात निथळणारे- तुलुम्बा, लुकाइमात-अल-काझी;बालाह- एल- शाम, झैनब देशोदेशीची खासियत म्हणून मिरवत आहेत.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)