अमिताभ बच्चन हे आजही आपल्या कामात पूर्णत: बुडालेले असतात. पण आजूबाजूच्या घटनांवर अभिव्यक्त होणं, कोणाला दाद देणं, स्वत:ची काही अनुभव शेअर करणं हे ते सतत करत असतात. त्यांना कसलं दुखं/ खेद वाटत असेल तर ते लपवून ठेवत नाही आणि आनंद झाला तर तो इतरांना सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नाही. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. टी.व्हीवर प्रिमियर लिग फुटबॉलची मॅच पाहात असताना एका बाजूला जेवणाचा आनंद घेणारे अमिताभ. अमिताभ यांच्या समोरच्या टेबलवर भरपूर पदार्थ मांडलेले दिसतात. ‘‘.. आफ्टर अ लॉंग वर्क ब्रेक. प्रिमियर लिग फुटबॉल, पास्ता, फ्रेंच फ्राइज, गार्लिक ब्रेड.. और. नागिन सॉस..!!! आहाहाहा. तडप गये इसके लिये!’ आपल्या मनातला आनंद व्यक्त करणारी ही कॅप्शन अमिताभ यांनी फोटोला दिली.
Image: Google
वडिलांनी पोस्ट केलेल्या फोटोवर अभिषेक बच्चन यांनी ‘फादर- सन सेम सेम’ म्हणत प्रतिक्रिया दिली. ही पोस्ट अमिताभ यांनी शेअर केल्यानंतर ज्या अनेक प्रतिक्रिया आल्या त्या त्यांच्या टेबलावर दिसणार्या ‘नागिन’’ सॉसच्या बाटलीवर. अनेकांसाठी सॉसचं हे नावच नवखं असल्यामुळे हे काय आहे, कसं लागतं, कुठे मिळतं अशा असे अनेक प्रश्न फॅन्सने विचारलेत. यातील काही प्रश्नांना उत्तरं देताना अमिताभ यांनी फक्त दोन शब्दात उत्तर दिलं. ते म्हणजे ‘सुपर सॉस’ . बॉलिवूडमधला सुपर स्टार एका सॉसची माहिती देताना केवळ सुपर हा शब्द वापरतो तेव्हा तो सॉस खरंच कसा लागत असेल याची उत्सुकता वाटणं साहजिकच आहे. या उत्सुकतेपोटीच नागिन सॉसची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु आहे.
Image: Google
नागिन सॉस काय आहे?
सॉसचं नाव नागिन आहे म्हटल्यावर सॉस जाम हॉट म्हणजे तिखट असणार ही अटकळ सगळ्यांनीच मनोमन बांधली असेल. पण नक्की हा नागिन सॉस आहे काय? - तर नागिन हा भारतीय ब्रॅण्डचा सॉस आहे. भारतीयांना रुचेल, आवडेल अशा हेतूने नागिन सॉस तयार केलं आहे. तिखट, पण मज्जा आणणारा, चवदार असा हॉट सॉसचा अस्सल आणि एकमेव भारतीय ब्रॅण्ड अशी याची ओळख या ब्रॅण्डचे संस्थपक सदस्य असलेले मिखेल रजनी सांगतात. या सॉससाठी वापरल्या जाणार्या मिरच्या , भाज्या हे सर्व घटक भारतीय असून त्यात रंगासाठी कृत्रिम कलर , चवीसाठी कृत्रिम स्वाद आणि प्रिझव्र्हेटिव्ह अँड केलेले नाहीत हे याचं विशेष आहे. आपलं भारतीय खानपान हे प्रामुख्याने मसालेदार आणि तिखट चवीचं असतं. आपल्या भारतीयांना असलेली मसाल्यांची ओढ कायम राहावी, ती आणखी वाढावी या उद्देशाने हा नागिन सॉस तयार केला आहे.
Image: Google
मिखेल रजनी, क्षितिज नीलकांतन आणि अर्जून रस्तोगी या तिघांनी मिळून हा ब्रॅण्ड सुरु केला. 2021च्या सुरुवातीला नागिन सॉसचं उत्पादन सुरु झालं, या ब्रॅण्डची स्थापना झाली. पण या पाठीमागची स्टोरी ही काही महिन्यांपूर्वीची नाही. रजनी हे खाण्याचे जेवढे शौकिन तितकीच त्यांना स्वयंपाक करण्याचीही हौस. पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरिंगमधे काम केलं. वर्षभरानंतर त्यांना जाणवलं की मरेपर्यंत हाच व्यवसाय करणं अवघड आहे. म्हणून त्यांनी ते काम सोडून नंतर एक वर्ष मॅनेजमेंट कंपनीत काम केलं. तिथे बोअर झाल्यानंतर त्यांना स्वत:ला जे आवडतं ते करावंसं वाटलं. त्यांनी हॉंगकॉंगमधे जाऊन एक हॉटेलमधे सहा महिने नोकरी केली. 2012 मधे परत भारतात आले आणि मग त्यांना मुंबईत ‘फ्रान्सेस्को पिझ्झेरिया’ नावाचं पिझ्झा ब्रॅण्ड सुरु केला. असंच एकदा टी.व्ही पाहात असताना ते खात होते आणि त्यांच्या मित्राने त्यासोबत त्यांना केचअप खायला दिलं. तेव्हा त्यांचा डोक्यात सॉस बनवण्याची आयडिया आली आणि मग ते त्याच्या मागे लागले.
भारत हा सर्वात मोठा मिरच्यांच्या उत्पादक आणि निर्यातदार देश असूनही भारतात हॉट सॉसची भूक ही अमेरिकन सॉसेस भागवतात, जे मेक्सिकन मिरच्यांचे बनलेले असतात. हे काही ठिक नाही. आपल्या भारतात मिरच्यांचे किती प्रकार आहेत त्यांचा उपयोग हॉट सॉस तयार करण्यासाठी होऊ शकतो असं म्हणून त्यांनी प्रयोग सुरु केले. या प्रयोगातून रजनी यांनी भारतातला पहिला हॉट सॉस तयार केला. हा सॉस तीन वर्षांपूृवी मुंबईमधील ‘बिअर फेस्टिव्हल’मधे सादर करण्यात आला. लोकांना तो आवडला. मस्त वाटतोय असं म्हणत त्यांना दाद दिली. 2021 च्या सुरुवातीला नागिन सॉसचं उत्पादन करायला सुरुवात झाली. नागिन डान्स हा भारतीयांचा फेव्हरिट तसाच रजनी यांचाही. आपल्या सॉसला असं नाव हवं जे हटके असेल, मनोरंजक असेल आणि त्यातून आतल्या पदार्थाच्या स्वभावाची सहज जाणीवही होईल. या हेतूने नागिन सॉस हे नाव पडलं. आज भारतात हे उपलब्ध आहेच शिवाय अमेरिका, दुबई, हॉंगकॉंग, सिंगापूर येथेही या नागिन सॉसच्या बाटल्या निर्यात होत आहेत.
Image: Google
नागिनची विविधता
हा नागिन सॉस वेगवेगळ्या फ्लेवरमधे उपलब्ध आहे असं अमिताभ यांनी एका फॅनच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतंच. हा नागिन सॉस द ओरिजनल, कंथा बॉम्ब ( अमिताभ यांच्या टेबलावर असलेला सॉस हा नागिनचा कंथा बॉम्ब आहे.) , नागिन ऑर नथिंग बंडल, ओरिजनल कंथा बंडल, द ओरिजनल भूत बंडल या स्वादांमधे उपलब्ध आहे.
नागिनचं पहिलं उत्पादन हे द ओरिजनल हॉट सॉस हे होतं. टमाटे, कांदा, लसूण, संकेश्वरी, भावनगरी मिरची आणि नागिनची खास सामग्री वापरुन हा नागिनचा ओरिजनल हॉट सॉस तयार झाला होता. त्यानंतर त्यांनी स्मोकी भूत नावाचा फ्लेवर आणला. यात ईशान्य भारतातील भूत जलोकिया नावाच्या अत्यंत तिखट मिरचीचा वापर करण्यात आला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना आवडलेला कंथारी बॉम्ब हा फ्लेवर आला. हा सॉस ग्रीन सॉस आहे. हा सॉस बनवताना पश्चिम बंगाल आणि दक्षिण आशियात वापरली जाणारी कंथारी मिरचीचा वापर करण्यात आला आहे. ही मिरची बर्ड आय चिली म्हणूनही ओळखली जाते. कंथारी बॉम्ब स्वादाचा सॉस तयार करताना कंथारी मिरची, सेलरी, हळद, लसूण, आलं यांचा वापर करण्यात आला असून ताज्या स्वादाचा सॉस असं या सॉसचं वैशिष्ट्य आहे. ओरिजनल आणि स्मोकी भूत यांचा सुवर्णमध्य साधणारा स्वाद या कंथारी बॉम्ब सॉसला असून खाताना तो थोडा गोड थोडा तिखट लागतो. भूत सॉस हा प्रामुख्यानं तिखट स्वादाचा तर ओरिजनल सॉसचा स्वाद हा कोणालाही सहज आवडेल असा आहे.
हा सॉस बाजारात तर आहेच शिवाय अँमेझॉनवरुनही तो ऑर्डर करता येतो. 230 ग्रॅमच्या छोट्या बाटलीत उपलब्ध असणार्या सॉसची किंमत ही 222.75 पैसे आहे. हा सॉस पदार्थांवर वरुन किंवा त्यासोबत खाण्याबरोबरच पदार्थ तयार करताना मॅरिनेशनसाठीही या सॉसचा ( यातील कुठल्याही स्वादाचा) उपयोग होतो.
आता कळलं असेल एका सुपरनं दुसर्याला सुपर म्हणण्याचं रहस्य!