Join us  

दुपारी जेवणात भात खाल्ल्याने झोप का येते? भात खाऊनही झोप उडवण्यासाठी 5 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2022 7:42 PM

भात खाल्ला की झोप येते. झोप येते म्हणून आवडत असला तरी दुपारच्या जेवणतला भात सोडण्याची गरज नाही. भात खाऊनही झोप येऊ नये यासाठी काही उपाय नक्की करता येतात. 

ठळक मुद्देभात कुकरच्याऐवजी बाहेर भांड्यात शिजवावा.दुपारच्या जेवणात भात खाल्ला तर जेवणानंतर ग्रीन टी अवश्य प्यावा.भात खाताना सोबत भाजी जास्त प्रमाणात खायला हवी.

दुपारच्या जेवणानंतर अनेकांना झोप येते. विशेषत: दुपारच्या जेवणात जर भात असला की सुस्त वाटतं. भात आणि झोप यात जवळचा संबंध असतो. यामागे शास्त्रीय कारण आहे. भातात कर्बोदकं अधिक असतात. भात खाल्ला की भातातील कर्बोदकांचं रुपांतर ग्लुकोजमधे होतं. ग्लुकोजचं पचन होण्यासाठी इन्शुलिनची गरज असते. इन्शुलिन वाढलं की मेंदूतील ट्रिप्टोफेनचं रुपातंर फॅटी ॲसिडमधे होण्यास उत्तेजन मिळतं. या प्रक्रियेमुळे मेलाटोनिन आणि सेरोटोनिन वाढण्याचं कारण होतं.   याच कारणामुळे भात खाल्ला की झोप येते. झोप येते म्हणून आवडत असला तरी दुपारच्या जेवणतला भात सोडण्याची गरज नाही. भात खाऊनही झोप येऊ नये यासाठी काही उपाय नक्की करता येतात. 

Image: Google

भात खाऊन येणारी झोप घालवण्यासाठी..

1. ब्राउन राइस खावा

दुपारच्या जेवणात भात खायचा असल्यास ब्राऊन राइस खावा. कारण ब्राउन राइसमधे कर्बोदकं आणि स्टार्चचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ब्राउन राइस खाल्ल्यानं शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण पांढऱ्या भाताच्या तुलनेत फार वाढत नाही. शिवाय ब्राउन राइस पचायलाही हलका असतो. पांढरा भात मात्र पचायला जड जातो आणि जास्त वेळ घेतो.  दुपारच्या जेवणाला ब्राउन राइस  खायचा नसेल आणि पांढरा भातच करायचा असल्यास तर हा भात कुकरच्याऐवजी बाहेर  भांड्यात शिजवावा. अशा प्रकारे शिजवलेल्या भातात स्टार्चचं प्रमाण कमी असतं. स्टार्चचं प्रमाण कमी असल्यास झोप येत नाही. 

Image: Google

2. भात कमी खावा

दुपारच्या जेवणात भात खायचा असेल आणि झोप येणंही टाळायची असेल तर भाताचं प्रमाण कमी करावं. भातासोबत डाळ/ आमटी जास्त खावी. भात खाताना सोबत भाजी जास्त प्रमाणात खायला हवी.  दुपारच्या जेवणात 50 टक्के भाज्यांचं प्रमाण, 25 टक्के प्रथिनांच्ं प्रमाण आणि 25 टक्के कर्बोदकांचं प्रमाण असावं.  तसेच दुपारच्या जेवणात भातासोबत गहू/ बाजरी/ ज्वारी/ नागली यासारखं धान्यं असावं.

3. भात खाल्ल्यानंतर प्यावा ग्रीन टी

दुपारच्या जेवणात भात खाल्ला तर जेवणानंतर ग्रीन टी अवश्य प्यावा. ग्रीन टीमुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे खाल्लेला भात पटकन पचतो. शिवाय ग्रीन टीमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. या प्रक्रियेमुळे  मेलाटोनिन आणि सेराटोनिन हे संप्रेरकं बनण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दुपारच्या जेवणात भात खाल्ल्याने झोप येणार नाही.  

4.  बडिशेप खावी चावून चावून

भात खाल्ल्यानंतर थोड्या वेळानं बडिशेप चावून चावून खावी. बडिशेप खाल्ल्याने पचन लवकर होतं. मूड फ्रेश होतो. बडिशेप चावण्याच्या प्रक्रियेमुळे तोंडाची जी हालचाल  होते त्यामुळे झोप येत नाही. 

5.  भाताऐवजी खावा तांदळाचा दुसरा एखादा पदार्थ

दुपारीच नाहीतर एरवी कधीही जेवणात भात खाल्ला की झोप येत असेल तर तांदळाचा भात करण्याऐवजी तांदळाचा डोसा, इडली, खिचडी किंवा तांदळाच्या रव्याचा उपमा करावा. हे पदार्थ करताना तांदळावर वेगळी प्रक्रिया होते, त्यामुळे त्यातील गुणधर्म बदलतात आणि भात खाऊन झोप येण्याची समस्या दूर होते. 

टॅग्स :अन्नआरोग्यआहार योजनालाइफस्टाइल