सुदृढ आरोग्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते. पौष्टिक पदार्थांच्या यादीत बऱ्याच गोष्टी येतात त्यात मखान्यांचाही (nutritious makhana) समावेश आहे. मखान्यातून शरीराला पोषक मुल्यांचा खजिना मिळतो. निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात मखाना (healthy makhana in diet) हवाच असं आहार तज्ज्ञ म्हणतात. मखाना खाल्ल्याने शरीरास कॅल्शियम, मॅग्नेशियम, कर्बोदकं, लोह आणि प्रथिनं मिळतात. मखाना ग्लुटेन फ्री असल्यानं वजन कमी करण्यासही फायदेशीर असतात.
Image: Google
शरीरातील कोलेस्टेराॅल, फॅटस आणि सोडियम हे घटक मखाना सेवन केल्यानं नियंत्रित राहातात. मखान्यांमुळे हाडं मजबूत होतात. ग्लुटेन फ्री मखाना फायबरयुक्त असल्यानं वजन कमी करण्यास ते फायदेशीर असतात. सकाळी नाश्त्याला मखाना/ मखान्याचे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर कमी भूक लागते. शरीरास आवश्यक पोषक तत्वं मिळतात आणि त्यामुळे उत्साह राहातो. मखान्यात ॲण्टिऑक्सिडण्टस आणि जिवाणुरोधक गुणधर्म असतात. त्याचा फायदा त्वचा निरोगी होण्यास होतो. मखाने नुसते तुपावर भाजून खाता येतात किंवा सकाळी नाश्त्याला ओटस मखाना दलिया करता येतो किंवा रात्रीच्या जेवणात चविष्ट मखाना रायता करता येतो. दोन्हींच्या पाककृती सोप्या आहेत.
Image: Google
ओट्स मखाना दलिया
ओट्स मखाना दलिया करण्यासाठी कढईत आधी ओट्स कोरडे भाजावेत. मग मखानेही कोरडे भाजून घ्यावेत. भाजलेले मखाने खलबत्त्यानं ओबडधोबड करुन घ्यावेत. ओट्सही ओबड धोबड कुटून घ्याबेत. हे दोन्ही एकत्र करुन त्यात आपल्याला आवडत असलेला सुका मेवा बारीक तुकडे करुन घालावा. या मिश्रणात थोडा वेलची पूड घालावी. हे मिश्रण एका हवाबंद डब्यात भरुन ठेवावं. सकाळी नाश्त्याला ओट्स मखाना दलिया खायचा असेल तर एका काचेच्या भांड्यात ओट्स मखाना दलियाचं मिश्रण घालावं. त्यात दूध घालावं. रात्रभर हे भांडं झाकून फ्रिजमध्ये ठेवावं. दुसऱ्या दिवशी सकाळी यात आपल्या आवडीचं फळ तुकडे करुन घालावं आणि एखादा चमचा मध घालावं. हा ओट्स मखाना दलिया चवीला उत्तम आणि आरोग्यास पौष्टिक असतो.
Image: Google
मखाना रायता
बुंदी आणि भाज्या घालून केलेला रायता खाण्याचा कंटाळा आला असेल तर मखान्याचा रायता खावा. मखाना रायता जेवणात साइड डिश म्हणूनही खाता येते. मखाना रायता करण्यासाठी मखाने कोरडे भाजून घ्यावेत. दही फेटून घ्यावं. फेटलेल्या दह्यात भाजलेले मखाने घालावेत. मखाने दह्यात एकत्र केल्यानंतर त्यात भाजलेल्या जिऱ्यांची पूड, लाल तिखट आणि मीठ घालावं. वरुन थोडा चिरलेला कांदा , टमाटा आणि कोथिंबीर घालावी. असा मखाना रायता खाण्यास चविष्ट लागतो.