आपल्या किराणा यादीत मसाल्यांची यादी करताना आपण कसूरी मेथी लिहितो का? स्वयंपाक करताना भाजी आमट्यांमधे आवर्जून कसूरी मेथी टाकावी असं वाटतं का? या प्रश्नांची उत्तरं अनेकजणांकडून नाही असंच येईल. कसूरी मेथी हा हर्ब मसाल्यातला एक महत्त्वाचा प्रकार असूनही त्याकडे सर्वसामान्यपणे दुर्लक्षच होतं. आणि जे कोणी कसुरी मेथी वापरतात ती क्वचित एखाद्या आमटी वरणात घालतात आणि तीही फक्त स्वादासाठी. कसुरी मेथी स्वयंपाकात वापरायलाच हवी यासाठीची कारणं फक्त तिच्या स्वादापुरती निगडित नाही. आहारतज्ज्ञ कसुरी मेथी रोजच्या स्वयंपाकात वापरण्याची याशिवायची अनेक कारणं सांगतात. स्वयंपाकात एखादा चमचा कसुरी मेथी वापरली तरी त्याचे आरोग्याशी निगडित अनेक फायदे होतात. विशेषत: महिलांच्या आरोग्यासाठी तर कसुरी मेथी खूपच फायद्याची आहे. हे फायदे समजून घेतले तर रोजच्या स्वयंपाकात कसुरी मेथी आवर्जून वापरली जाईल.
Image: Google
स्वयंपाकात कसुरी मेथी का महत्त्वाची?
ताजी मेथी उन्हात सुकवून कसुरी मेथी तयार करतात. आज ती प्रत्येक दुकानात मिळते. पण ती घरी तयार करणंही अगदीच सोपं आहे. मेथी वाळवून चुर्या स्वरुपातली ही कसुरी मेथी भरपूर टिकते. कसुरी मेथीचा कडवा विशिष्ट स्वाद हे त्याचं वैशिष्ट्य आणि त्यासाठीच ती स्वयंपाकात वापरली जाते. पण कसुरी मेथीचा उपयोग चवीपलिकडे असून अनेक आरोग्यदायी फायदे कसुरी मेथीचा उपयोग स्वयंपाकात केल्याने होतात.
1. आहारतज्ज्ञ महिलांच्या एकूणच आरोग्यासाठी कसुरी मेथीचं महत्त्व सांगतात. ही कसुरी मेथी स्तनपान करणार्या आयांसाठी खूप महत्त्वाची असते. ज्यांना दूध कमी येतं त्यांनी कसुरी मेथी स्वयंपाकात वापरल्यास किंवा नुसती चावून खाल्ल्यास त्याचा परिणाम दूध वाढण्यावर होतो.
2. आरोग्य नीट राहाण्यात पचन क्रियेची भूमिका खूप महत्त्वाची असते. पचन क्रियेचं काम नीट होण्यासाठी फायबरची गरज असते. कसुरी मेथीमधे फायबरचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे कसुरी मेथी रोजच्या स्वयंपाकात असल्यास बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही. तसेच कसुरी मेथीमुळे पचन क्रिया सुधारते आणि सुधारलेल्या पचनक्रियेचा परिणाम वजन कमी होणे, नियंत्रित राहाणे यावर होतो.
3. कसुरी मेथीचा उपयोग मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतो. कसुरी मेथीतले गुणधर्म रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित आणि संतुलित ठेवतात तसेच इन्शुलिनची संवेदनशीलता कमी करतात. कसुरी मेथी स्वयंपाकासोबतच नुसती खाल्ल्यास टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका कमी होतो. भविष्यातला मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी आपल्या रोजच्य्या जेवणात कसुरी मेथीचा समावेश करणं गरजेचं आहे असं आहारतज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
4. मेनोपॉजच्या टप्प्यातल्या महिलांना शारीरिक आणि मानसिक अनेक त्रासातून जावं लागतं. खूप थकवा येणं, स्तन सैल पडणं, पाळी अनियमित होणं, योनीमार्गात कोरडेपणा जाणवणं यासारखे त्रास छळतात. कसुरी मेथीच्या सेवनामुळे मेनोपॉजदरम्यान होणार्या त्रासांची तीव्रता कमी होण्यास मदत होते.
5. एक चमचा कसुरी मेथीचा स्वयंपाकातला उपयोग महत्त्वपूर्ण असतो. कारण कसुरी मेथीत सूक्ष्म पोषण तत्वं असतात. यात लोह, कॅल्शिअम, जीवनसत्त्वं असतात. हे गुणधर्म हाडं मजबूत करतात, रक्तातील हिमोग्लोबीन वाढवतात तसेच आहारात कसुरी मेथी असल्यास शरीर आणि मन उत्साही राहातं.
6. कसुरी मेथी रोजच्या स्वयंपाकात वापरली तर त्याचा उपयोग त्वचा आणि केस यांचा पोत सुधारण्यासाठी होतो. कसुरी मेथीमुळे त्वचेखाली नवीन पेशींची निर्मिती होते. यामुळे त्वचा ताजीतवानी आणि तरुण दिसते. हल्ली अकाली केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप आहे. पण कसुरी मेथीच्या नियमित उपयोगानं केस अकाली पांढरे होण्याची शक्यता कमी होते. कसुरी मेथीत असलेले जीवनसत्त्वं, खनिजं यामुळे केसांचं पोषण योग्य तर्हेने होतं.
आपल्या आरोग्यासाठी कसुरी मेथीचे एवढे उपयोग असतील तर कोणतीही स्त्री आपल्या रोजच्या स्वयंपाकात कसुरी मेथी न वापरण्याची चूक करणार नाहीत हे नक्की!
Image: Google
कसुरी मेथी कशी वापराल?
कसुरी मेथी ही एखाद्याच वरण आमटीत न वापरता रोजच्या स्वयंपाकात वापरण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सर्व प्रकारच्या डाळी, आमट्या, रश्याच्या भाज्या यात कसुरी मेथीचा उपयोग करावा. तसेच सुक्या भाज्यांमधे कसुरी मेथी घातल्यास भाज्यांना चव येते आणि त्यातले पोषक गुणधर्मही वाढतात. पोळ्या आणि पराठ्यांचं पीठ मळताना त्यात कसुरी मेथी घालावी. यामुळे स्वाद तर उत्तम येतोच शिवाय त्यांची गुणवत्ताही वाढते. कसुरी मेथी स्वयंपाकात वापरताना ती हातावर चोळून घालावी. यामुळे तिच्यातला स्वाद एकदम खुलतो.