श्रावण महिना जवळ आला की शाकाहार करणाऱ्यांकडे कांदेनवमी आवर्जून केली जाते. पुढील महिनाभर किंवा काहीवेळा चार्तुर्मास म्हणजे पुढील ४ महिने कांदे खाता येणार नसल्यामुळे या दिवशी खास कांद्याचे पदार्थ खाल्ले जातात. आता श्रावणात कांदा, लसूण खाऊ नये याला आपल्याकडे धार्मिकतेची जोड दिली जाते. प्रत्यक्षात आरोग्यासाठी ऋतूबदलानुसार आहारात केलेले ते बदल आहेत हे लक्षात घ्यायला हवे. याविषयी आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देतात.
१. वातावरणाशी काय संबंध?
श्रावणात कांदा, लसूण खाऊ नका असं सांगितलं जातं यामागील मुख्य कारण म्हणजे या काळात साधारपणे पाऊस जास्त प्रमाणात असतो. आयुर्वेदानुसार या काळात शरीरात वातदोष वाढण्याची शक्यता असते. या काळात शरीरात शुष्कता येऊन पचनशक्ती क्षीण होते आणि पित्त साचून राहते. म्हणून या काळात हलका आणि सहज पचेल असा आहार घ्यावा असे सांगितले जाते.
२. लसूण, कांदा कोणी टाळायला हवे...
पावसाळ्याच्या काळात लसूण, वांगी यांमुळे गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता असते. या दोन्ही गोष्टींमुळे वाताचे प्रमाणही वाढत असल्याने ज्यांना वात किंवा गॅसेसचा त्रास आहे त्यांनी कांदा, लसूण कमी प्रमाणात खाणे किंवा न खाणे केव्हाही चांगले. मात्र सरसकट सगळ्यांनीच कांदा, लसूण, वांगं खाणे बंद करावे असं काही आपण म्हणू शकत नाही.
३. स्वत:वर नियंत्रण येण्यासाठी उपयुक्त
आहारातली बंधने पाळणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही बंधने पाळण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ही उत्तम गोष्ट असते. भविष्यात आपल्याला काही कारणाने अशी बंधने पाळावी लागली तर ते स्वीकारता यावे यासाठी या बंधनांचा अतिशय चांगला उपयोग होतो. आहारावर आपण स्वत:हून एरवी कोणती बंधन लावत नाही पण या निमित्ताने आपला स्वत:वर थोडे नियंत्रण राहू शकते.
४. लसूण, कांद्याचे फायदे...
लसूण आणि कांदा यांमध्ये कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणारे काही घटक असतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही लसूण अतिशय उपयुक्त असतो. कांदा लसूण हे उत्तम प्रिबायोटिक आहेत म्हणजे, प्रोबायोटिक्सच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. त्यांच्यामुळे आतड्यांतील मित्र जिवाणूंचं प्रमाण चांगलं राहतं आणि एकूणच स्वास्थ्य उत्तम राहतं. आहारातून शरीरात जाणारे टॉक्सिन्स, इस्ट्रोजन निष्प्रभ व्हायला या दोन्हीची चांगली मदत होते. त्यामुळे आलं, लसूण, कांदा हे पदार्थ पूर्णपणे बंद करायला हवेत असं आपण आताच्या काळात म्हणू शकत नाही. टायफॉइड, कॉलरा, अतिसार यांसारख्या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळायला या दोन्हीचा अतिशय चांगला उपयोग होतो.