Join us  

उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याचे ५ फायदे, स्वस्तात मस्त एनर्जी ड्रिंक- उन्हाचा त्रास होणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 1:15 PM

Why Lemon Water Should Be Your Best Friend During Summer Season : उन्हाळ्यात आपण बरीच कोल्ड्रिंक पितो, त्याऐवजी पारंपरिक लिंबू सरबत प्या, त्याचे फायदे अनेक

जवळपास मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपल्याकडे उन्हाळा सुरु होतो. उन्हाळ्यात घराबाहेर पडायचे म्हणजे जीव कासावीस होतो. किमान दहा मिनिटे जरी उन्हांत फिरलो तरी उष्णतेने घामाघूम व्हायला सुरुवात होते. अशावेळी आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, फळांचा रस, कोल्ड्रिंक्स पिणे पसंत करतो. वारंवार कोल्ड्रिंक्स पिणे आरोग्याला घातक ठरु शकते. त्यामुळे आपल्याकडे काही अशी पारंपरिक शीतपेय आहेत जी आपण उन्हाळ्यात आवर्जून पितोच. उसाचा रस, लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे, कोकमचे सरबत, ताक, जांभळाचे व कलिंगडाचे सरबत, बेलफळाचे सरबत यांसारख्या शीतपेयांचे आपण उन्हाळ्यात सेवन करतो. अशी शीतपेये साखरेची गोडी व पाण्याचा गारवा यामुळे थकलेल्या शरीराला परत रिफ्रेश करण्यास मदत करतात. आजकालच्या नाना रंगाच्या व चवींच्या कृत्रिम सरबतांच्या जमान्यात ही नैसर्गिक सरबते आरोग्यासाठी कधीही फायदेशीर ठरतील.

उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण लिंबूपाणी पितो. लिंबूपाणी पिण्याचे आरोग्यसाठी काही फायदे देखील आहेत. सर्वसाधारणपणे लिंबूपाणी हे प्रत्येकाला प्यायला आवडते. उन्हाळ्यात शरीराला झटपट ताकद मिळवून देण्यासाठी आपण लिंबू पाण्याचा वापर करतो. लिंबू सरबताचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तसेच लिंबू पाण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहे(Why Lemon Water Should Be Your Best Friend During Summer Season).   

लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे :- 

१. प्रतिकारशक्ती वाढवते :- लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणांत असते. व्हिटॅमिन 'सी' मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म भरपूर प्रमाणांत असतात. हे पेय दररोज प्यायल्याने श्वसन विकारांपासून संरक्षण मिळू शकते. आपल्या आरोग्यासाठी व तंदुरुस्त राहण्यासाठी आपण लिंबू पाण्याचे सेवन करु शकतात.   

२. चक्कर आल्यास :- उन्हाळ्यांत उकाड्यामुळे अनेकांना चक्कर आल्यासारखे वाटते. अशावेळी त्या व्यक्तीस लिंबूपाणी प्यायला दिल्यास त्या व्यक्तीला बरे वाटेल. उन्हाळ्यांत वारंवार लिंबू-पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे ऊन्हाळ्यांत लिंबूपाणी पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि हितवर्धक असते.

३. पचन करण्यास मदत करते :- काही लोकांना बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करण्यासाठी दररोज सकाळी लिंबू पाणी प्यावे. जेव्हा आपण झोपेतून उठता तेव्हा उबदार किंवा कोमट लिंबू पाणी पिल्याने आपली पाचक प्रणाली चालू राहते.

४. त्वचेची गुणवत्ता सुधारते :- लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन 'सी' त्वचेच्या सुरकुत्या, वृद्धत्वामुळे कोरडी त्वचा आणि सूर्य किरणांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. जर आपली त्वचा ओलावा गमावत असेल किंवा वारंवार कोरडी पडत असल्यास, सुरकुत्या होण्याचा धोका असतो. यासाठी त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऊन्हाळ्यांत लिंबू पाणी प्यावे.  

५. मुतखड्याच्या आजारामध्ये लिंबूपाणी फायदेशीर ठरते :- लिंबामध्ये असलेले सायट्रिक अ‍ॅसिड मुतखड्याचा धोका कमी करू शकते. खरं तर, सायट्रिक अ‍ॅसिडमध्ये सायट्रेट नावाचे संयुग असते, जे लहान-लहान मुतखड्याचे स्टोन्स फोडण्यास मदत करते. लिंबूसरबतामुळे शरीर हायट्रेड होण्यास मदत होते. त्यामुळे युरिन ब्लॉक होण्याचा त्रास कमी होतो.

टॅग्स :अन्न