उन्हाळा म्हटला की डोक्यावर तापत्या उन्हाचा सामना करण्यासाठी आहारात आणि विहारात बदल गरजेचेच. बदलत्या तापमानाशी जुळवून घ्यायचे तर हे बदल गरजेचे असतात नाहीतर आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असल्याने आपल्याला सतत गार पाणी किंवा गारेगार काहीतरी पेय प्यावेसे वाटते. अशावेळी सरबत, उसाचा रस, फळांचा ज्यूस किंवा ताक हे पर्याय उत्तम ठरतात. घरच्या घरी रोजच्या जेवणात आपण ताक अगदी सहज पिऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत ताक पिण्याचे फायदे याबद्दल आपण अनेकदा वाटतो किंवा ऐकतो. ताकामुळे पित्तशमन होते, अपचनाच्या तक्रारी दूर होतात. तसेच ताकात विटामिन B 12, कैल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखे गुणधर्म असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ताकामुळे उन्हामुळे येणारी मरगळ, थकवा निघून जाण्यास मदत होते, इतकेच नाही तर ताक प्यायल्याने उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या लघवीशी निगडित तक्रारी दूर होण्यास मदत होते. पण सतत ताक पिऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ताकापासून तयार केला जाणारा मठ्ठा नक्कीच ट्राय करु शकता.
मठ्ठा पिण्याचे फायदे
१. ताकापासून मिळणारे सगळे फायदे मठ्ठा पिल्याने मिळतातच, त्याशिवायही मठ्ठा पिण्याचे अनेक फायदे होतात.
२. मठ्ठा प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
३. आलं आणि लसूण यांमुळे ज्याप्रमाणे पदार्थाला चांगला वास येतो त्याचप्रमाणे पचनशक्तीसाठीही या दोन्ही गोष्टी अतिशय उपयुक्त असतात.
४. कोथिंबीर ही कॅल्शियमयुक्त असल्याने आहारात कोथिंबीरीचा समावेश जास्तीत जास्त असणे केव्हाही चांगले.
५. त्यामुळे प्लेन ताकापेक्षा त्याचा मठ्ठा केला तर तो चवीला चांगला तर लागतोच पण त्याचे आरोग्यासाठी जास्त चांगले फायदे होतात.
साहित्य
१. ताक - ४ वाटी
२. साखर - १ चमचा
३. हिरवी मिरची - १
४. आलं - १ इंचाचा तुकडा
५. लसूण - ५ पाकळ्या
६. काळं मीठ - अर्धा चमचा
७. जीरे - १ चमचा
८. कोथिंबीर - चिरलेली अर्धी वाटी
कृती
१. आलं, मिरची, लसूण आणि जीरे एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्यावी.
२. ही पेस्ट मठ्ठ्यामध्ये घालावी.
३. त्यामध्ये मीठ, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करावे.
४. गारेगार चविष्ट मठ्ठा भर दुपारच्या उन्हात प्यायला अतिशय चांगला लागतो.
५. आवडत असेल तर तुम्ही या मठ्ठ्यामध्ये खारी बुंदीही घालू शकता.