बटाट्याची भाजी उकडूनही केली जाते आणि त्याचे काप करूनही केली जाते. भाजी जेव्हा उकडून करतो तेव्हा आपण बटाटे धुवून सरळ कुकरमध्ये लावून टाकतो. पण काप करून जेव्हा भाजी करायची असते तेव्हा मात्र आपण बटाट्याच्या फोडी करून त्या पाण्यात भिजत घालतो. बटाट्याचे चिप्स, बटाट्याचा उपवासाला करतात तो किस किंवा बटाट्याची भजी करायची असतील, तेव्हाही बटाटा आपण पाण्यात भिजत घालतो. असं नेमकं का केलं जातं? (Why soaking potatoes in water is important before cooking?)
बऱ्याचदा स्वयंपाक करताना आपण त्यामागचं विज्ञान समजून घेत नाही. फक्त आपल्या आजी-आई करत आल्या म्हणून तेच आपणही सुरू ठेवतो.
बटाटे जर पाण्यात घातले नाहीत तर ते लालसर पडतात म्हणून ते पाण्यात भिजत घालायचे एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्या मागचं खरं कारण काय आहे हे आता पाहूया...
United States Department of Agriculture यांनी केलेल्या अभ्यासानुसार कच्च्या बटाट्यांमध्ये ७९ टक्के पाणी तर १६ टक्के स्टार्च असतं. एवढ्या जास्त प्रमाणात स्टार्च असतील तर तो पदार्थ पचायला कठीण जातो.
शिवाय बटाट्याचा कोणताही पदार्थ करताना स्टार्चची रिॲक्शन अन्य पदार्थांसोबत होते आणि बटाटा अधिक चिकट होतो. असं होऊ नये आणि स्टार्चचं प्रमाण कमी होऊन बटाटा पचायला सोपा व्हावा, म्हणून बटाट्याचे काप आपण पाण्यात भिजत टाकतो. बटाट्याची भाजी, किस किंवा भजी करायची असतील तर बटाट्याचे काप १० ते १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावेत. कच्चे बटाटे तळून तुम्ही फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स करणार असाल तर मात्र ३० मिनिटे तरी बटाट्याचे काप पाण्यात भिजू द्यावेत.