Lokmat Sakhi >Food > बायको आजारी पडली आणि नवऱ्याला स्वयंपाक येत नाही? 4 पदार्थ सहज जमतील, बायकोही खुश!

बायको आजारी पडली आणि नवऱ्याला स्वयंपाक येत नाही? 4 पदार्थ सहज जमतील, बायकोही खुश!

झटपट होतील असे पोटभरीचे सोपे पदार्थ करा, तुम्ही खा आणि बायकोलाही खाऊ घाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 02:15 PM2022-01-17T14:15:51+5:302022-01-17T14:19:23+5:30

झटपट होतील असे पोटभरीचे सोपे पदार्थ करा, तुम्ही खा आणि बायकोलाही खाऊ घाला...

Wife gets sick and husband can't cook? 4 Foods will you can make easily, wife is happy! | बायको आजारी पडली आणि नवऱ्याला स्वयंपाक येत नाही? 4 पदार्थ सहज जमतील, बायकोही खुश!

बायको आजारी पडली आणि नवऱ्याला स्वयंपाक येत नाही? 4 पदार्थ सहज जमतील, बायकोही खुश!

Highlightsतुम्हीही नक्की ट्राय करु शकता या सोप्या रेसिपीरोज रोज बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी करुन पाहूया की

कोविडमुळे सध्या एकूण बऱ्याच कुटुंबांमध्ये आजारपणाचे वातावरण आहे. इतकेच नाही तर व्हायरल फ्लूचीही साथ वाढली आहे. याशिवाय महिलांना येणारी मासिक पाळी आणि इतर त्रास यांमुळे त्यांना काही वेळा जागेवरुन उठणेही शक्य नसते. अशावेळी त्यांना आरामाची आणि योग्य औषधोपचारांची गरज असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. घरातली बाई आजारी पडली की संपूर्ण कुटुंबाचीच तारांबळ उडते म्हणतात ते काही खोटे नाही. कारण सकाळी उठल्यापासून सगळ्यांसाठी धावाधाव करुन प्रत्येकाला काय हवं, नको ते ती पाहत असते. आता तिच आजारी पडल्यावर आपल्याला आपल्या, तिच्या आणि मुलांच्या पोटाची तर काळजी घ्यायला हवी ना. एखादवेळी बाहेरुन जेवण आणलेले ठिक आहे. पण सतत बाहेरुन किती आणणार, अशावेळी नवरा म्हणून आपण आजारी असलेल्या बायकोसाठी आणि आपल्यासाठी काही सोपे पदार्थ करु शकलो तर? बायकोच्या थोडाशा मदतीने हे करणे शक्य आहे, त्यासाठी फक्त आपली तयारी असायला हवी. पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत जे पोटाला हलके होतील आणि आपण झटपट करु शकतो. 

१. मूगाच्या डाळीची मऊ खिचडी

आजारपणात मूगाच्या डाळीची खिचडी हा सर्वोत्तम आहार मानला जातो. गरमागरम आणि तोंडाला चव आणणारी ही खिचडी करायलाही तितकीच सोपी असते. बायकोच्या मदतीने डाळ आणि तांदूळ यांचा डबा कुठे आहे हे समजून घ्या. एक वाटी तांदळाला अर्धी वाटीहून थोडी कमी डाळ या प्रमाणात दोन्ही एकत्र करुन धुवून घ्या. कढईत फोडणी करुन त्यात हे धुतलेले मिश्रण घाला आणि चांगले परतून त्यामध्ये पाणी घाला. त्यानंतर यात गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ हे घटक घालून एकसारखे हलवा. उकळी आली की त्यावर झाकण ठेऊन गॅस बारीक करा. सहज सापडण्याजोगे असेल तर खिचडीच्या फोडणीमध्ये कडीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, ओले खोबरे हेही घालू शकता. कोथिंबीर चिरुन ठेवा, म्हणजे वरुन घ्यायला चांगली लागेल. दर पाच ते ७ मिनीटांनी खिचडीवरचे झाकण उघडून खिचडी डावाने हलवून बघा. शिजत आली की तुम्हाला अंदाज येईल, त्याप्रमाणे गॅस बंद करा. गरमागरम खिचडीवर तूप घालून आधी बायकोला द्या आणि नंतर घरातील इतरांना देऊन तुम्हालाही घ्या. तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही त्यासोबत लोणचे, ताक, भाजलेला पापड असेही घेऊ शकता. 


 

२. रव्याचा उपमा 

करायला अतिशय सोपा आणि पोटभरीचा हा पदार्थ बायको आजारी असताना तुम्ही नक्की करु शकता. रवा भाजलेला असेल तर ठिक नाहीतर बारीक गॅसवर कढईत रवा भाजून घ्या. खाली लागणार नाही याची काळजी घ्या. दुसरीकडे एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. रवा भाजून झाला की तो एका ताटलीत काढून घ्या. कांदा चिरण्याचे यंत्र हल्ली बऱ्याच घरांमध्ये असते, त्यात कांदा चिरा. नसेल तर सुरीने कांदा चिरण्याचा प्रयत्न करा. कडीपत्ता, मिरची, दाणे, थोडं किसलेलं आलं एका ताटात काढून घ्या. घरात मटार असतील तर त्याचे थोडे दाणे घ्या. कढईत फोडणी घातल्यावर त्यामध्ये मिरची, कडीपत्ता, आले, दाणे, कांदा घालून एकत्र परतून घ्या. चांगले परतल्यावर त्यामध्ये अंदाजे पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ, साखर आणि मटारचे दाणे घाला. त्यानंतर भाजलेला रवा सगळीकडे पसरुन घाला. लगेचच कढई चिमट्याने पकडून हे मिश्रण व्यवस्थित हलवा. नाहीतर रव्याच्या गुठूळ्या राहण्याची शक्यता असते. सगळे हलवल्यानंतर त्यावर ५ मिनीटे झाकण ठेवा. रवा फुगेल असे वाटल्यास वरुन थोडे पाणी घातले तरी चालते. रवा फुगलेला दिसतो, याचा अंदाज घेऊन गॅस बंद करा. 


 

३. व्हेज सँडविच 

करायला सोपे असलेले सँडविच हा नाश्ता आणि वेळप्रसंगी जेवण म्हणूनही चांगला पर्याय ठरु शकतो. ओले खोबरे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ एकत्र करुन मिक्सर करावे. अंदाजे पाणी घालून चटणीची कसिस्टन्सी सँडविचला योग्य होईल असे पाहावे. काकडी, कांदा, उकडलेला बटाटा आवडत असेल आणि घरात उपलब्ध असेल तर बीट, गाजर यांसारखे सॅलेडही यामध्ये घेऊ शकता. ब्रेडला चटणी लावून त्यावर आवडीनुसार भाज्या घालाव्यात, त्यावर टोमॅटो सॉस घालून वर आणखी एक ब्रेड ठेवावा. आवडत असेल तर वरुन चीज किसून घेतले तरी चालेल. ब्रेड भाजून आवडत असेल तर तूपावर भाजलेला ब्रेड घेऊ शकता. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सँडविच चालू शकते, त्यामुळे बायको आजारी असताना हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. 

४. इडली सांबार

हल्ली बाजारात इडलीचे पीठ अगदी सहज मिळते. हे पीठ आणून इडली पात्रामध्ये याच्या इडल्या लावल्या तर हा एक पोटभरीचा आणि चांगला पर्याय ठरु शकतो. यासोबत तुम्ही सांबार किंवा चटणी करु शकता. तुरीची डाळ कुकरला लावायची. कांदा, टोमॅटो उभा चिरुन घ्यायचा, सांबार मसाला साधारणपणे घरात असतो. कढईत फोडणी करुन त्यामध्ये कांदा, टोमॅटो, सांबार मसाला, मीठ, गूळ घालायचे, त्यामध्ये शिजलेली डाळ आणि अंदाजे पाणी घालून उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. त्यानंतर गॅस बारीक करुन थोडा वेळ शिजू घ्यायचे. आजारी व्यक्तीबरोबरच घरातील इतरही लोक आवडीने इडली सांबार खाऊ शकतात.  

Web Title: Wife gets sick and husband can't cook? 4 Foods will you can make easily, wife is happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.