Lokmat Sakhi >Food > सुकामेव्याचे पौष्टिक लाडू हिवाळ्यात दणकून खाल्ल्यानं तुम्हाला फायदा होईल की तोटा? हे वाचा आणि ठरवा..

सुकामेव्याचे पौष्टिक लाडू हिवाळ्यात दणकून खाल्ल्यानं तुम्हाला फायदा होईल की तोटा? हे वाचा आणि ठरवा..

Winter food : थंडी वाढताच दणकून पौष्टिक लाडूंचा, सुक्यामेव्याचा मारा सुरू केलाय? जरा सांभाळून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 06:29 PM2024-11-27T18:29:19+5:302024-11-27T19:05:22+5:30

Winter food : थंडी वाढताच दणकून पौष्टिक लाडूंचा, सुक्यामेव्याचा मारा सुरू केलाय? जरा सांभाळून..

Winter Food : Eating nutritious laddu of dry fruits in winter will benefit or harm you? Read this and decide.. | सुकामेव्याचे पौष्टिक लाडू हिवाळ्यात दणकून खाल्ल्यानं तुम्हाला फायदा होईल की तोटा? हे वाचा आणि ठरवा..

सुकामेव्याचे पौष्टिक लाडू हिवाळ्यात दणकून खाल्ल्यानं तुम्हाला फायदा होईल की तोटा? हे वाचा आणि ठरवा..

Highlightsजी ताजा आहार, भरपूर हिरव्या पालेभाज्या, भरपूर फळे यांचा समावेश जर आहारामध्ये केला तर त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि तुमचे आरोग्य निश्चितच चांगले राहील.

मंजिरी कुलकर्णी (आहारतज्ज्ञ)

भारतामध्ये ऋतूप्रमाणे आहार बदलण्याची प्रथा आहे. याचे महत्त्वाचे कारण हेच की, भारतामध्ये ऋतूंची वैविधता खूप जास्त दिसून येते. ऋतू बदलताना तापमानामध्ये बदल होतो आणि त्याप्रमाणे शरीराच्या गरजा बदलतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये आपण द्रव पदार्थांचे सेवन जास्त करतो याचे कारण वाढत्या तापमानामुळे शरीराची पाण्याची गरज वाढते. तसेच हिवाळ्यामध्ये तापमान कमी झाल्यामुळे शरीरामध्ये काही बदल होतात. यातील सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे शरीराला तापमान मेंटेन ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत. आपल्याला घाम येतो किंवा थंडी वाजते म्हणजे काय होते तर शरीर ३७ डिग्री तापमान मेंटेन ठेवण्यासाठी हे बदल शरीरामध्ये घडवून आणते.


हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने बाहेरील तापमान हे शरीरापेक्षा बऱ्यापैकी कमी असल्यामुळे तापमान मेंटेन ठेवण्यासाठी शरीर ऊर्जा तयार करते आणि ही ऊर्जा तयार करण्यासाठी शरीराला बऱ्यापैकी कॅलरी खर्च कराव्या लागतात. मग यामुळे काय होते तर हिवाळ्यामध्ये भूक लागण्याचे प्रमाण जास्त वाढते आणि आपण जड पदार्थ म्हणजेच जास्त कॅलरी असणारे पदार्थ सहजरीत्या पचवू शकतो.

पूर्वीच्या काळामध्ये शारीरिक मेहनत जास्त असल्यामुळे जड पदार्थ खाण्यात आले तरीही शरीरावर विशेष परिणाम होत नसत; परंतु आजच्या काळामध्ये शारीरिक मेहनत खूप कमी असल्यामुळे हे पदार्थ खाताना नक्कीच विचार करावा. पचायला जड पदार्थ खाण्यापूर्वी आधी आपल्याला कुठल्या प्रकारच्या व्याधी आहेत, हा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

हिवाळ्यात पौष्टिक खाणं ठरवताना..

१. शरीरासाठी पौष्टिक म्हणून खाण्यात येणारे पदार्थ आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत का, योग्य आहेत का, हा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
या पदार्थांमध्ये प्रामुख्याने ड्रायफ्रूट्स, तूप, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ यांचा समावेश होतो.
२. तुम्हाला हे माहिती आहे का, की हिवाळ्यामध्ये हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण हे सर्वांत जास्त असते. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये सांधे दुखण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते. मग जर तुम्हाला हृदयाचा त्रास असेल तर निश्चितच चरबीयुक्त पदार्थांचा समावेश आहारामध्ये करणे चुकीचे आहे.
जनरली ज्यांना हृदयविकाराचा त्रास असतो त्यांना चरबी कमी ठेवणारे औषधे सुरू असतात आणि ती औषधे सुरू असताना जर तुम्ही ड्रायफ्रूट्स, तूप, दूध असे पदार्थ हिवाळ्यात पौष्टिक म्हणून खाल्ले तर त्याचे उलट परिणाम शरीरावरती होऊ शकतात.

 

३. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा या गोष्टी असणाऱ्या पदार्थांचा समावेश जसे की, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू जर तुम्ही खाल्ले, विशेषतः पौष्टिक म्हणून खाल्ले तर ते पचवण्यासाठी शरीरावर अतिरिक्त तणाव निर्माण होतो.
४. त्याच पद्धतीने हे पदार्थ खाताना आपण शारीरिक हालचाल किती करतोय, आपण व्यायाम किती प्रमाणामध्ये करतोय हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे आणि जरी तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल तरीसुद्धा हे पदार्थ प्रमाणात खाल्लेलेच योग्य आहेत. याचे कारण असे आहे की जरी तुम्ही पहाटे एक-दीड तास व्यायाम करत असाल तरीसुद्धा दिवसभर तुम्ही एका जागी बसून राहत असाल तर हे पदार्थ जसे की, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू आणि याव्यतिरिक्त नियमित आहार जर तुम्ही घेतलात तर हे शरीरासाठी योग्य ठरू शकत नाही.

५. मग हे पदार्थ खाऊच नयेत का, तर असे नाही जर तुम्ही पहाटे उठून व्यायाम करत असाल तर नाश्त्याच्या ऐवजी एखादा छोटासा लाडू खायला काहीच हरकत नाही; परंतु हे पदार्थ खाण्याच्या आधी तुमच्या शरीरातील व्याधींचा विचार करण्यावरती सांगितल्याप्रमाणे आवश्यक आहे.
६. हे लाडू बनवताना सगळ्यात महत्त्वाचा आणि घातक असा घटक म्हणजे साखर. साखरेचा फक्त मधुमेहांशी संबंध नसून चयापचयात्मक आजारांशी खूप जवळचा संबंध आहे. जवळपास ९०% चयापचयात्मक आजार हे साखरेच्या अतिरिक्त सेवनाने होतात हे आता सिद्ध झालेले आहे. विशेषतः ड्रायफ्रूट्सला स्वतःचा गोडवा असतो. त्यामुळे असे पदार्थ करताना त्यामध्ये साखर किंवा गूळ घालण्याची मुळीच आवश्यकता नसते.


पौष्टिक लाडू/पदार्थ कुणी खावे?

१. लहान मुले जी भरपूर खेळतात.
२. कृष आणि कुपोषित व्यक्ती.
३. एखाद्या मोठ्या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती ज्यांचा खूप मोठा शारीरिक लॉस झालेला आहे आणि तो भरून काढण्याची आवश्यकता आहे.
४. खेळाडू जे दिवसातून कमीत कमी चार तास कुठलाही खेळ खेळतात. व्यायाम करतात.


हिवाळ्यात आहार कसा असावा?

१. मुळात ड्रायफ्रूट्समध्ये स्टोअर एनर्जी असते. म्हणजेच अशा प्रकारचे फॅट्स जे तुम्हाला खाण्यासाठी अन्न मिळाले नाही तर तुम्हाला ऊर्जा मिळवून देऊ शकतात. आताच्या जगामध्ये कुणीही उपाशी राहणे किंवा खायला अन्न न मिळणे हा प्रकार बघायला मिळत नाही. त्यामुळे पूर्वी ड्रायफ्रूट्स हे लोक प्रवासामध्ये वापरत असत. कारण की, त्यांना दररोज खाण्यासाठी अन्न मिळत नसेल. त्यामुळे त्या काळामध्ये ड्रायफ्रूट्स, तूप, गूळ असे कॉम्पोझिशन असणाऱ्या लाडूंचा उगम झाला.
२. त्याचप्रमाणे मेथी आणि डिंक हेसुद्धा शरीरासाठी बळकटी देण्याचे काम करत असतात; परंतु त्यामध्ये तुम्ही जर ड्रायफ्रूट्स, तूप आणि साखर टाकली तर त्यामध्ये कॅलरी अकाउंट खूप जास्त होऊन हे नक्कीच तुमचे वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

३. आधी सांगितल्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये सांधेदुखी आणि त्वचाविकारांचे प्रमाणसुद्धा वाढते. त्यामुळे पचायला जड असे पदार्थ जर अशा व्यक्तींना खायला दिले तर त्यांना वजन वाढवून सांधेदुखी अजून वाढण्याची शक्यता असते.
४. त्याऐवजी ताजा आहार, भरपूर हिरव्या पालेभाज्या, भरपूर फळे यांचा समावेश जर आहारामध्ये केला तर त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि तुमचे आरोग्य निश्चितच चांगले राहील.

themindfuldiet365@gmail.com

Web Title: Winter Food : Eating nutritious laddu of dry fruits in winter will benefit or harm you? Read this and decide..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.