Lokmat Sakhi >Food > जळगावी वांग्याचं भरीत रेसिपी, झणझणीत भरतासाठी वांग्याची निवड कशी करावी, वाचा खास टिप्स!

जळगावी वांग्याचं भरीत रेसिपी, झणझणीत भरतासाठी वांग्याची निवड कशी करावी, वाचा खास टिप्स!

Winter Food: हिवाळ्यात भरीत, भाकरी, खर्डा हा बेत रंगणार नाही, असं मराठी घर सापडणार नाही; त्यासाठी परफेक्ट रेसेपी आणि वांगी निवडण्याच्या खास टिप्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 16:30 IST2024-12-19T10:05:52+5:302024-12-19T16:30:59+5:30

Winter Food: हिवाळ्यात भरीत, भाकरी, खर्डा हा बेत रंगणार नाही, असं मराठी घर सापडणार नाही; त्यासाठी परफेक्ट रेसेपी आणि वांगी निवडण्याच्या खास टिप्स!

Winter Food: Jalgavi stuffed eggplant recipe, along with special tips on how to choose eggplant! | जळगावी वांग्याचं भरीत रेसिपी, झणझणीत भरतासाठी वांग्याची निवड कशी करावी, वाचा खास टिप्स!

जळगावी वांग्याचं भरीत रेसिपी, झणझणीत भरतासाठी वांग्याची निवड कशी करावी, वाचा खास टिप्स!

संजय वैद्य 

छान थंडी पडलीये.  सुदैव म्हणजे अति पाऊस होऊन सुद्धा या वेळी भरताची वांगी चांगली मिळत आहेत. साहजिकच घरी भरीत वरचे वर होत असते. त्यातच जळगावी वांग्याचे भरीत अनेकांना आवडते, म्हणून त्याची रेसिपी देत आहे. पण त्याआधी भरीत बनवण्यासाठी वांगी कशी निवडावी यासाठी खास टिप्स देत आहे, त्या वाचा, वांगी आणा आणि मस्त चटकदार वांग्याचे भरीत, भाकरी आणि लाल मिरचीचा खर्डा असा बेत जमवा!

भरीत करण्यासाठी वांगी निवडताना पुढील टिप्स फॉलो करा-

१)  वांगी खरेदी करतांना हाताला ती मऊ ( आत कापूस असावा अशी ) लागली पाहीजेत. 

२) वांगं लांबट असो किंवा फुगीर त्याचा आकार समतोल असावा, म्हणजे मध्येच कडकपणा असेल, मध्येच उंचवटा, फुगवटा असेल तर ते वांगं घेऊ नये आत आळी असायची शक्यता असते. 

३) वांग्याला कुठेही भोक . छिद्र असेल, एखादा काळा / काळसर डाग आतून पोकळ आहे असं नख लावल्यावर कळत असेल तर असंही वांगं घेऊ नका आत १००% आळी निघेल. 

४) वांगं भाजण्याआधी त्याला काही ठीकाणी टोचा. किंचीत तेलाचा हात लावा मग भाजा.  गॅस वर भाजत असाल तर मध्यम फ्लेम वर भाजा नाहीतर बाहेरुन करपेल आणि आतून पुर्ण शिजलेलं नसेल. 

५) भाजलेलं वांगं शक्यतो लगेच सोलायला घ्या थंड झाल्यावर साल आतला गरही काढेल.  ओल्या हाताने वांगं छान सोललं जातं.  पाचही बोटांना पसरवून ती अकुंचीत करावी ( म्हणजे जवळ आणावी ) करपलेल्या सालीचा मोठा भाग हाती येतो.  वरच्यावर हात ओला करतच वांगी सोलावी सोपं जातं. 

६) सोललेली वांगी वेगळ्या ताटात ठेवावी याला एक प्रकारचं तेल सुटतं त्यासकटच वांगी मॅश करावीत. 

७) उपलब्ध असेल तर लसूणची पातही वापरा छान लागते. 

८) स्प्रींग ओनियनला अर्थात कांद्याच्या पातीला पुरेसे कांदे ( वाढलेले ) नसतातही अशा वेळी एक दोन कांदे बारीक चिरुन वापरावेत.  पातीसोबतच कांद्याचा कंदही अत्यावश्यक असतो. 

९) मी आधीच मिरची + लसूण यांचा ठेचा करुन घेतो.  तुम्ही फोडणीत ठेचचेला लसूण वापरुन मिरच्यांचे तुकडेही वापरु शकता. 

१०) शेंगदाणे वापरत असाल तर गरम तेलात आधी दाणे टाका, नंतर कांदा आणि पात टाका लास्टली ठेचा किंवा मिरचीचे तुकडे टाका.  दाणे नंतर टाकाल तर कच्चे राहतील. खमंग दाणे भरताबरोबर अप्रतिम चव देतात. 

११) अति महत्वाचं :  भरीत करायला मुबलक तेल लागतं. कमी तेलात भरीत करण्यापेक्षा ते न केलेलं केव्हाही उत्तम.  आमच्याकडे अक्षरश: भरीत तळणं असंही म्हणतात. अगदी तेवढंच नाही पण भरीताला गॅस बंद केल्यावर आजुबाजूने तेल सुटलेलं असलंच पाहीजे. 

१२) खानदेशी भरीत असंच असतं. यात कोथींबीर, पुदीना, कढीपत्ता असे स्वाद मिक्स केले जात नाहीत आणि हो भरीत करायला कोणताही रेडिमेड मसाला लागत नाही. 

आता पाहूया जळगावी भरीत रेसेपी : 

>> भारताची ताजी वांगी आणावी.  
>> चूल, गॅस, गवऱ्या, तुरफाटे यांच्या आचेवर भाजायची. 
>> वांगी खरपूस भाजून घ्यावीत. 
>> भाजलेली वांगी सोलून गर काढून घ्यावा. 
>> चिरलेली कांद्याची पात, कच्चे शेंगदाणे, मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घ्यावा. 
>> मुबलक तेलावर कांद्याच्या पातीची फोडणी करून त्यात ठेचा झकास तळून घ्यावा. 
>> भाजलेल्या वांग्याचा गर या फोडणीत टाकून घ्यावा. चवीपुरते मीठ घालावे. 
>> एक दणदणीत वाफ काढावी. 
>> जळगावी वांग्याचे भरीत खाण्यासाठी तयार!
>> सोबत कळण्याची भाकरी असेल तर उत्तम बेत रंगेल...

तर या हिवाळ्यात कधी करताय जळगावी भरीत, भाकरी आणि ठेच्याचा अस्सल गावराण बेत?

Web Title: Winter Food: Jalgavi stuffed eggplant recipe, along with special tips on how to choose eggplant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.