विद्या कुलकर्णी
हिवाळा म्हणजे खाण्यापिण्याचं सुख. भाज्यांची रेलचेल. पचनशक्तीही उत्तम. खावे मस्त आणि पचवावे. व्यायामाची जोड दिली तर तब्येत अधिक दणकट होते. मात्र याऱ्यात आपण आपले स्थानिक पारंपरिक पदार्थ विसरलो असेही व्हायला नको. त्यातला पिढ्यांपिढ्या चालत आलेलं शहाणपण, त्यातलं पोषण हे सारंच आपल्यासह आपल्या पुढच्या पिढ्यांनाही मिळायला हवं.
आता आपल्याकडची पारंपरिक गूळ पोळीच पाहा. भरपूर उष्मांक देणारा पदार्थ. त्यात पूर्वी अनेकघरी धुंधुर मास असायचा. सकाळी न्याहारी दणकून केली जायची. भल्या पहाटे घरात अथवा शेतात जाऊन मुगाची खिचडी, हुरडा, गूळ पोळी,ओले पावटे,वांगी,गाजर यांची मिश्र भाजी, बाजरीची तीळ लाऊन भाकरी, घरचे पांढरे लोणी, तूप, गूळ, भरली वांगी, भरीत असे पदार्थ करुन खाल्ले जात.
एरव्हीही हिवाळ्यात हे सगळे पदार्थ म्हणजे चमचमीत चव आणि भरपूर पोषण. उत्तम दर्जाचं पोषण देणारं अन्न बेचवच असायला हवं असं आपल्याकडे नाही. आपण चवीचं आणि पौष्टिक, करायला सोपं, स्वस्तही असं खाऊच शकतो.
पूर्वी बाळाचे तिळवण/बोरन्हण केले जायचे,उसाच्या गंडेऱ्या,छोटी बोअर,रेवड्या, तीळ लाडू अश्या पदार्थाचा बाळावर वर्षाव व्हायचा.
विविध प्रकारचे पौष्टिक लाडू तर थंडीत घरोघर होतात.
आणि ते लाडूही सुक्यामेव्याचेच असावे असे नाही. तर उडीद डाळ आणि कणकेचे उत्तम पौष्टिक लाडू केले जातात.
लाह्या आणि खोबऱ्यांचे विविध लाडू बनतात.
आणि कळणीच्या लाह्या ते बाजरीचा खिचडा हे सारं तर अत्यंत पौष्टिक.
जे जे स्थानिक ते ते पौष्टिक आणि ते खिशाला परवडणारे आणि लहानमोठे साऱ्यांनाच पचणारेही.
पोषण स्थानिक गोष्टीतूनही मिळते. फक्त आपल्याघरात असलेलं पारंपरिक शहाणपण जरुर स्वीकारुन त्याप्रमाणे आवश्यक ते बदल करुन पदार्थ करायला हवे.
पोषण आणि तब्येत या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. त्यातून तर आपलं जगणं सुकर आणि सुरळीत राहणार आहे.
म्हणून आनंदाने खावे आणि खिलवावे. त्यात स्नेह आणि स्निग्धता असेल तर पोेषणाचे प्रश्न नक्की सुटू शकतात. उत्तम स्वास्थ्य आपली सर्वांचीच गरज आहे.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)