एकीकडे उन्हाळाची चाहूल लागायला सुरू झाली असताना थंडी काही कमी व्हायचे नाव घेत नाहीये. अशातच ऋतूबदल आणि थंड हवामानाचा सामना करण्यासाठी आपली तब्येत ठणठणीत हवी. थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता टिकून राहावी यासाठी आपण आहारात बदल करतो. बाजरी, तीळ यांसारखे उष्णता देणारे पदार्थ आपण जास्त प्रमाणात खातो. त्याचप्रमाणे हवेतील गारठा आणि हवामानात होणाऱ्या बदलाशी जमवून घ्यायचे असेल तर आहारात एक पदार्थ आवर्जून खायला हवा. हा पदार्थ म्हणजे आलं. सर्दी, घसा खवखवणे, कफ यांसारख्या तक्रारींना दूर ठेवायचे असल्यास आहारात आल्याचा समावेश जरुर करायला हवा. आलं म्हणजे थंडीच्या दिवसांतील सूपरफूड. भारतीय आहारात वेगवेगळ्या मसाल्यांसाठी वापरले जाणारे आले तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त असते. काहीसे उग्र असले तरी आल्यामुळे पदार्थाला एक वेगळा स्वाद येतो. विविध औषधांमध्येही सुंठीचा वापर केला जातो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी आताच्या सीझनमध्ये आलं खाण्याचे फायदे सांगितले आहेत, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी याविषयीची पोस्ट केली आहे....पाहूयात काय आहेत हे फायदे
१. पचनासाठी उपयुक्त
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आलं अतिशय उपयुक्त ठरतं, यामुळे गॅसेसची तक्रारही कमी होते. तुम्हाला मळमळ किंवा उलटी यांसारखी काही समस्या असेल तर त्यावरही आलं अतिशय गुणकारी ठरते. आलं खाल्ल्याने पचनाशी निगडित सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
२. सर्दी, ताप आणि कफाचा सामना करण्यासाठी उपयुक्त
आलं हे सर्दी, ताप आणि कफ यांसारख्या तक्रारींवर अतिशय उपयुक्त असते. सूज कमी होण्यासाठी तसेच खवखवणाऱ्या घशासाठी आल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आलं अँटीबॅक्टेरीयल असल्याने थंडीच्या दिवसांत होणाऱ्या इन्फेक्शन्सपासून सुटका करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो.
३. बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होतो उपयोग
कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की हृदयरोग आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे पदार्थांमध्ये आल्याचा वापर करुन, पाण्यात आलं घालून ते उकळून किंवा आल्याचा रस आणि आवळा एकत्र खायला हवे.
४. सांधेदुखी कमी करण्यास उपयुक्त
आल्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीकॅन्सर प्रॉपर्टीज असतात. या तिन्हीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ज्यांना अर्थ्रायटीस किंवा सांध्यांशी निगडीत इतर तक्रारी भेडसावतात अशांनी आहारात आल्याचा अवश्य समावेश करायला हवा.