हिवाळ्यात अनेक लोकांना चविष्ट आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते. चमचमीत आणि गरमागरम खाण्यासाठी अनेक लोकं विविध पदार्थ घरात बनवून पाहतात. काही पदार्थ चवीला उत्तम मात्र, आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. तर काही पदार्थ चवीलाही उत्तम आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही चविष्ट आणि आरोग्यदायी स्नॅक्स बनवण्याचा विचार करत असाल तर एकदा मखाना कटलेट करून पहा. हिवाळ्यात चहासह भजी अथवा कटलेट चविष्ट लागतात. आपल्याला देखील चविष्ट आणि शरीरासाठी फायदेशीर असा पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. लो फॅटसह चवीलाही उत्तम हा पदार्थ लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
मखाना कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य
एक कप मखाना
उकडून घेतलेला बटाटा
बारीक चिरून घेतलेली मिरची
शेंगदाणे
बडीशेप
कोथिंबीर
चाट मसाला
गरम मसाला
लाल तिखट
मीठ
तूप
तेल
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात तूप गरम करून घ्या त्यात मखाना चांगले भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर मखानाला चांगले मिक्सरमधून वाटून घ्या. आता एका बाऊलमध्ये उकडून घेतलेला बटाटा चांगले कुस्कुरून घ्या. त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मखाना टाका. हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या. त्यात हिरवी मिरची, बडीशेप, भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर हाताला तेल लावून चांगले कटलेट तयार करा. एकीकडे गॅसवर कढई गरम करा. त्यात तूप अथवा तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हे कटलेट टाका. मध्यम आचेवर हे कटलेट सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे आपले मखानाचे क्रिस्पी कटलेट तयार. हे कटलेट आपण चटणी अथवा सॉससह खाऊ शकता.