Join us

Winter Recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाट -चविष्ट टोमॅटो सूप बनवा घरच्याघरी, तेही कॉर्न फ्लोअर न वापरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2025 11:22 IST

Winter Recipe: हिवाळ्यात विकतचे सूप पिण्यापेक्षा घरचे ताजे, स्वच्छ आणि प्रिझर्व्हेटिव्ह, फूड कलर न वापरता केलेले पौष्टिक टोमॅटो सूप बनवणे अगदीच सोपे!

हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत चहाचा रतीब तरी किती करणार? शुगर वाढते तो भाग वेगळा आणि समाधानही होत नाही. पोटात काहीतरी उष्ण पदार्थ जावेत असे वाटते आणि पर्याय म्हणून रेडिमेड सूपचे पाकीट विकत आणले जाते. चवीला ते चटपटीत असले तरी त्यात प्रिझर्व्हेटिव्हचा मारा केलेला असतो तसेच रंग रूपासाठी फूड कलर देखील वापरला जातो. गुणवत्तेच्या बाबतीत खात्री देता येत नाही. त्यामुळे आरोग्याची हेळसांड होऊ न देता घरच्या साहित्यातून  बनवा रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप, तेही कॉर्न फ्लोअर वापर न करता; जाणून घ्या साहित्य!

साहित्य :

८ मध्यम आकाराचे टोमॅटो, एक कांदा, एक गाजर, अर्धे बीट, छोटा बटाटा, चार लसूण पाकळ्या, तमाल पत्र, मिरी, दालचिनी, मीठ, तेल, पाणी आणि दोन ब्रेड स्लाईज

कृती : 

>> सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्या. टोमॅटोचे छोटे काप करा. >> एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्या. >> अर्ध्या बीटाचे तुकडे करून घ्या. >> एक गाजर आणि मध्यम आकाराचा बटाटा सोलून त्याचेही काप करून घ्या. >> लसूण पाकळ्या सोलून घ्या. >> कुकरमध्ये २ चमचे तेल घेऊन त्यात तमाल पत्र, मिरी आणि दालचिनी टाकून घ्या. >> कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या, त्यात लसूण पाकळ्या टाका. >> त्यानंतर गाजराचे, बटाट्याचे, बीटाचे तुकडे आणि टोमॅटो टाकून थोडेसे मीठ टाकून परतून घ्या. >> टोमॅटो मऊ होऊ लागला की कुकरचे झाकण लावून चार शिट्या काढून घ्या. >> कुकरची वाफ मोडली की झाकण उघडून मॅशरने सगळे मिश्रण एकजीव करा किंवा गार झाल्यावर एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. >> एकजीव झालेले मिश्रण गाळून पुन्हा ५-७ मिनिटे उकळू द्या. चवीनुसार मीठ घाला. >> एका सॉस पॅनमध्ये २ चमचे तुपावर किंवा तेलावर ब्रेड स्लाईजचे चौकोनी तुकडे सोनेरी रंग होईपर्यंत खरपूस परतून घ्या. >> दाटसर, लाल चुटुक आणि चविष्ट सूप गरमागरम सर्व्ह करा आणि त्यात ब्रेडचे सोनेरी तुकडे घालायला विसरू नका. 

हिवाळ्याची रंगत अशा चविष्ट पदार्थांनी वाढते, त्यामुळे शक्य तेवढे नैसर्गिक पदार्थांचे सेवन करा आणि स्वस्थ खा, मस्त राहा.  

टॅग्स :हिवाळ्यातला आहारअन्न