थंडीच्या दिवसांत बाहेर गारठा असल्याने आपल्याला सतत गरम काहीतरी हवं असतं. जेवणात तर आपल्याला पातळ, गरम आणि चविष्ट काहीतरी खावंसं वाटतं. पण रोज असं असेलच असं नाही. अशावेळी कोरडी भाजी-पोळी नको होते. नेहमी कढी, आमटी असेलच असं नाही. मग झटपट गरम काय करणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आमसूलाचे सार हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. तोंडाला चव आणणारे आणि पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे सार थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब देणारे आणि घशाला आराम देणारे ठरते. चहा -कॉफी घेण्यापेक्षा आंबटगोड चवीचे हे सार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने पितात. आमसूल आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असल्याने काळाच्या ओघात थोडी मागे पडलेली ही रेसिपी अवश्य करायला हवी (Winter special Amsul kokam Sar recipe and benefits).
थंडीत अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. आमसूलात असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसमुळे त्याचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी आमसूल अतिशय उपयुक्त ठरते. एरवी आपल्या आहारात आमसूला आमटी सोडून फार वापर होत नाही. मात्र असे सार केल्यास ते प्यायला सगळ्यांनाच आवडते. घरात कोणाला बरे नसेल किंवा तोंडाची चव गेल्यासारखे झाले असेल तर हे सार आवर्जून प्यावे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी, मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव झाल्यास हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून आमसूल अतिशय उपयुक्त ठरते.
साहित्य -
१. आमसूल - ७ ते ८
२.ओलं खोबरं अर्धी वाटी
३. गूळ - ३ ते ४ चमचे
४.लसूण - ६ ते ७ पाकळ्या
५.कोथिंबीर - पाव वाटी चिरलेली
६.तिखट - चवीनुसार
७.मीठ - चवीनुसार
८. फोडणीचे साहित्य - जीरं, हिंग, हळद
९. तूप - २ चमचे
कृती -
१. आमसूलाच्या बिया काढून ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.
२. तूपाची फोडणी करुन त्यात जीरे, हिंग, हळद घाला.
३. फोडणी तडतडली की त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि ओलं खोबरं घालायचं आणि सगळं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे लसूण आणि खोबऱ्याचा फ्लेवर उतरतो.
४. यात अंदाजे पाणी घालून त्यामध्ये आमसूल, गूळ, मीठ आणि तिखट घालायचे.आमसूलाच्या आंबटपणानुसार गुळाचे प्रमाण ठरवायचे.
५. आमसूलाचा रंग उतरेपर्यंत आणि सगळे चांगले छान एकजीव होईपर्यंत चांगली उकळी येऊ द्यायची.
६. उकळी आली की गॅस बारीक करा आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
आमसूलाचे फायदे...
१. शरीरातील उष्णता कमी करणे, मानसिक ताण आणि थकवा घालविण्यासाठीही अमसूल उपयुक्त ठरते.
२. आजारी व्यक्तीसाठीही शारीरिक झीज भरून येण्यासाठी अमसूलाचा सार उपयुक्त ठरतो.
३. सर्दी, कफ झाला असेल तर घशाला आराम मिळण्यासाठी आणि कफ बाहेर पडण्यासाठी गरम सार पिण्याचा फायदा होतो.
४. आमसूलात असलेले व्हीटॅमिन ए आणि इ हे घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
५. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी आमसूल अतिशय उपयुक्त ठरते.
६. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी आमसूल उपयुक्त असते. मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव झाल्यास हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून आमसूल अतिशय उपयुक्त ठरते.