Join us  

गाजराच्या सिझनमध्ये हलवा नेहमीच करतो, यंदा ट्राय करा गाजराच्या लालचुटूक वड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 9:46 AM

Winter Special Carrot Barfi Gajar Wadi Recipe : भरपूर ऊर्जा देणारी आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वडी कशी करायची पाहूया...

थंडीत बाजारात लालचुटूक गाजर दिसतात. आपणही आवर्जून ही गाजरं घेतो आणि त्याची कोशिंबीर, थालिपीठ, हलवा, लोणचं असं काही ना काही करतो. गाजर मूळातच गोड असेल तर त्यात फारशी साखर घालावीच लागत नाही. थंडीच्या दिवसांत बाजारात येणारी गाजरं चवीला अतिशय छान असतात. थंडीत आपल्याला नेहमीपेक्षा जास्त भूक लागत असल्याने ४ घास जास्तच खाल्ले जातात. तसेच खाल्लेले चांगले पचत असल्याने या काळात थोडे गोड किंवा तळकट खाल्ले तरी चालते. गाजरापासून नेहमीचे तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा या गाजराच्या छान वड्या केल्या तर? मुलांना डब्यात देण्यासाठी, जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाल्यावर आणि जाता येता कधीही खाता येतील अशा या पौष्टीक आणि चविष्ट वड्या कशा करायच्या पाहूया.  भरपूर ऊर्जा देणारी आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही वडी करण्यासाठी लागणारे जिन्नस आणि कृती समजून घेऊया (Winter Special Carrot Barfi Gajar Wadi Recipe)..

साहित्य - 

१. तूप - १ चमचा 

२. किसलेले गाजर - ३ वाट्या

(Image : Google)

३. खवा किंवा मिल्क पावडर - १ वाटी 

४. साखर - १ वाटी

५. खोबऱ्याचा किस - १ वाटी

६. बदाम, काजू, पिस्ते - प्रत्येकी ७ ते ८ 

७. वेलची पूड - अर्धा चमचा 

कृती -

१. गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे.

२. कढईत तूप घालून त्यामध्ये किसलेले गाजर घालून ते ५ मिनीटे चांगले परतून घ्यायचे.

३. गाजर परतून त्याचा रंग बदलला की त्यामध्ये साखर आणि खवा किंवा मिल्क पावडर घालायचे.

४. यामध्ये बदाम आणि काजूचे काप घालून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले ८ ते १० मिनीटे परतून घ्यायचे.

५. मिश्रण घट्टसर व्हायला लागले की त्यामध्ये बारीक किसलेले खोबरे घाला.यामुळे ओलसरपणा कमी होऊन घट्टपणा येण्यास मदत होते आणि वड्यांना छान फ्लेवर येतो. खोबरं आवडत नसेल तर नाही घातले तरी चालते. 

६. मिश्रण घट्टसर होईपर्यंत चांगले परतून घ्यावे.खोबरं नाही घातलं तर दाटसरपणा यायला थोडा वेळ लागेल. 

७. यामध्ये वेलची पूड घालून सगळे छान एकजीव करायचे.

८. एका ताटाला तूप लावून हे मिश्रण घालावे. त्यावर सुकामेवा घालून ३ ते ४ तास हे ताट गार होण्यासाठी ठेवावे आणि नंतर वड्या कापून त्या खायला घ्याव्यात.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.