थंडीच्या दिवसांत आपल्याला दणकून भूक लागते. हवा मोकळी आणि गार असल्याने शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते आणि खाल्लेले अन्न लवकर पचते. म्हणूनच हा काळ तब्येत सुधारण्यासाठी सगळ्यात चांगला काळ मानला जातो. म्हणून थंडीचे ४ महिने आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य यांकडे नीट लक्ष दिल्यास वर्षभर तब्येत चांगली राहण्यास मदत होते. थंडीच्या काळात बाजारात भरपूर भाज्या, फळं मुबलक प्रमाणात आणि चांगल्या दर्जाची उपलब्ध असतात. या दिवसांत आपल्याला चमचमीत काही खाण्याचीही इच्छा होते. अशावेळी पोळी भाजी न करता वन डीश मील म्हणून पौष्टीक आणि तरीही चविष्ट असा मटार-पनीर पराठा करता येऊ शकतो. झटपट होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पराठा नाश्ता, जेवण, डबा असा सगळ्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. हा पराठा परफेक्ट पंजाबी स्टाईल किंवा ढाबा स्टाईल व्हावा यासाठी सोपी अशी रेसिपी पाहूया...
साहित्य -
१. मटार - २ वाटी (सोललेले)
२. पनीर - १ वाटी (बारीक किसलेले)
३. आलं-लसूण-मिरची पेस्ट - १ ते १.५ चमचा
४. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा
५. मीठ - चवीनुसार
६. आमचूर पावडर किंवा चाट मसाला - आवडीनुसार
७. गव्हाचे पीठ किंवा मैदा - २ ते २.५ वाटी
८. तेल - पाव वाटी
९. कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून एका बाजूला मळून ठेवायचा
२. मटार वाफवून, स्मॅशरने किंवा मिक्सरमध्ये स्मॅश करुन घ्यायचे.
३. मटारमध्ये किसलेले पनीर, मीठ, आलं-मिरची-लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि कोथिंबीर घालावी.
४. हे मिश्रण चांगले एकजीव करुन एका बाजूला त्याचे गोळे करुन ठेवावेत.
५. आलू पराठा किंवा पुरणपोळीमध्ये ज्याप्रमाणे आपण सारण भरुन पोळी लाटतो त्याचप्रमाणे पोळीच्या आवरणात सारण भरुन पराठा लाटावा.
६. तव्यावर तेल घालून हा पराठा दोन्ही बाजुने खरपूस भाजावा.
७. गरमागरम पराठा बटर, दही, सॉस किंवा लोणचे कशासोबतही अतिशय छान लागतो.