Join us  

घरातल्यांची ताकद वाढावी म्हणून डिंकाचे लाडू केले? पण आई स्वत: मात्र खात नाही, असे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2023 2:00 PM

हिवाळा सुरू झाला की घरोघर महिला डिंकाचे लाडू करतात, सुकामेवा आणतात पण स्वत: खातात का? (Why is it important to eat healthy in the winter?)

-मंजिरी कुलकर्णीहिवाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता कमी झालेली असते आणि त्यामुळेच शरीरातील तापमानसुद्धा कमी झालेले असते आणि तापमान कमी झाल्यामुळे अन्नपचन करण्याची क्षमता वाढते. म्हणूनच हिवाळ्यामध्ये भरपूर भूक लागते आणि जड अन्नसुद्धा सहजरीत्या पचवल्या जाते. त्यामुळे पचनाला जड; परंतु पौष्टिक असे पदार्थ हिवाळ्यात खाण्याचा सल्ला दिला जातो. कित्येक घरांमध्ये हिवाळ्यामध्ये महिला उत्साहाने डिंकाचे लाडू, मेथ्याचे लाडू, भरपूर सुकामेवा असलेल्या पदार्थांचा दैनंदिन आहारामध्ये समावेश करतात. मुख्य प्रश्न आहे, स्वत: खातात का? पण होते काय की भारतीय महिला घरच्यांची खूप काळजी घेतात. घरातील लहान मुले आणि पुरुष यांच्या आरोग्यासाठी महिला कष्ट करतात; पण स्वतःचे आरोग्य मात्र दुर्लक्षित राहते.

(Image : google)खरे पाहिले तर महिलेने स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक असते. दर महिन्याला येणारी पाळी, तसेच गरोदरपणा, बाळंतपण, पाळी जाणे या विविध टप्प्यांवर महिलांच्या शरीरातील लोह, हिमोग्लोबिन, कॅल्शिअम, विटामिन्ससुद्धा कमी होत असतात. या सगळ्या कमतरता भरून काढण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू आहे, कारण हिवाळ्यामध्ये वाढलेली पचनक्षमता. आपण खाल्लेल्या पदार्थांचे सहज पचन होते, त्यातून उत्तम उत्तम न्यूट्रियन्स घेण्यासाठी पचसंस्था मदत करते.

महिलांनी हिवाळ्यामध्ये काय आहार घ्यावा?१. शेंगदाणे- रात्री एक मूठ शेंगदाणे भिजवून ठेवून सकाळी जर ते खाल्ले तर शरीराला मोठ्या प्रमाणात उष्णता आणि प्रथिने मिळतात. शेंगादाण्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करणारे लोह बरेच असते आणि ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यांनी हिवाळ्यामध्ये भिजवलेल्या शेंगादाणे खायला हरकत नाही.२. बदाम आणि अक्रोड- शेंगदाण्याप्रमाणेच रात्री भिजवलेले बदाम आणि अक्रोड सकाळी चावून खाल्ल्यामुळे शरीराला स्निग्धता मिळते आणि त्यामुळे स्नायू आणि हाडे बळकट होतात.३. रताळी- रताळ्यामध्ये असणारी कार्बोदके शरीराला खूप लवकर एनर्जी देतात. त्याच बरोबर रताळ्यामध्ये असणारे फायबर आणि मिनरल्स पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. अ आणि क जीवनसत्त्वे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.४. पालक- बऱ्याच जणांना पालक पचत नाही; पण हिवाळ्यामध्ये ते पचू शकते. पालकामध्ये असणारे कॅल्शिअम हाडे आणि दात बळकट बनवतात. पालकामध्ये असणारे लोह हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते आणि रक्ताची कमतरता दूर होते. मात्र, ज्या महिलांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी पालक खाऊ नये.

(Image : google)५. ऊन- हिवाळ्यामध्ये दुपारपर्यंत अल्हाददायक ऊन असते आणि आपले पूर्वज हिवाळ्यामध्ये ऊन खावे, असे सांगत असत याचे कारण असे आहे की त्वचेवर ऊन पडल्यामुळे शरीरात असणारे विटामिन डी ॲक्टिव्हेट होते आणि आपण आहारातून जे काही कॅल्शिअम घेत आहोत ते कॅल्शिअम हाडांपर्यंत आणि दातांपर्यंत पोहोचवते म्हणून प्रत्येक महिलेने हिवाळ्यामध्ये कमीत कमी एक तास ऊन खावे.६. तीळ - तिळामध्ये भरपूर उष्णता असते आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात. त्यामुळे चांगल्या फॅट्समुळे शरीरातील स्नेह वाढतो. त्याचबरोबर तिळामध्ये मॅग्निज कॉपर आयर्नसारखे मिनरल्स असतात जे शरीरातील छोट्या- छोट्या कार्यांसाठी अत्यंत आवश्यक असतात.७. रंगीत फळे- हिवाळ्यामध्ये भरपूर रंगीत फळे आणि भाजीपाला खूप ताजा मिळतो. डाळिंब, बीट, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या यासह रंगीत फळे खाल्ल्यामुळे कॅन्सरविरुद्ध लढणाऱ्या पेशींची क्षमता वाढते आणि कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर ज्या महिलांना कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी रंगीत फळांचा आहारामध्ये अवश्य समावेश करावा.

(Image : google)

८. खोबऱ्याचे तेल- हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते कारण कमी झालेले तापमान आणि थंड हवामानामुळे शरीरातील स्नेह कमी होतो म्हणून हिवाळ्यामध्ये दररोज एक चमचा खोबऱ्याचे तेल पोटातून घ्यावे. त्यामुळे शरीरातील स्नेह वाढवून चांगले फॅट्स जे हृदयाचे प्रोटेक्शन करतात. त्वचा आणि केस यांचेसुद्धा आरोग्य सुधारते.९. मेथी, डिंक आणि उडीद लाडू- पूर्वीच्या काळी महिलांना अंग मेहनत खूप जास्त असायची. त्यामुळे महिला हिवाळ्यामध्ये अशा पौष्टिक लाडूच सेवन करत असत; परंतु आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे महिलांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि वजनसुद्धा वाढत चाललेले आहे. त्यामुळे ज्या महिलांचे वजन जास्त आहे, ज्यांना हृदयविकारांचे त्रास आहेत, त्याचबरोबर ज्यांचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्या महिलांनी या लाडूचे सेवन करू नये.ज्या महिला अशक्त आहेत ज्यांच्या शरीरात स्नेह तसेच मेद कमी असून ज्यांची शारीरिक क्षमता कमी आहे, नुकतेच बाळंतपण झालेले आहे किंवा अशा महिला ज्या खूप मोठ्या आजारातून रिकव्हर होत आहेत आणि त्यांच्या शरीरामध्ये अशक्तपणा आहे त्यांनी या लाडूचे सेवन निश्चितच करावे.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)durvamanjiri@gmail.com

टॅग्स :अन्नथंडीत त्वचेची काळजीमहिलापरिवार