Join us  

मुगाची खिचडी जास्त पौष्टिक करण्यासाठी ३ उपाय, हिवाळ्यात तब्येत कमवायची तर खा प्रोटीनफुल खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 3:33 PM

Winter Special Healthy Dal khichadi recipe : थंडीच्या दिवसांत मिळेल जास्त ऊर्जा आणि पोषण...

डाळ खिचडी हे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. भाताचा प्रकार असला तरी चविष्ट, पौष्टीक आणि करायला सोपा असल्याने अनेकांकडे आठवड्यातून एकदा तरी रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा बेत ठरलेलाच असतो. लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांनाच खिचडी आवडत असल्याने आवडीने खाल्ली जाते. रात्रीच्या जेवणात हलका आहार घेतलेला चांगला असल्याने आहारतज्ज्ञही मूगाच्या डाळीची खिचडी खाण्याचा सल्ला देतात (Winter Special Healthy Dal khichadi recipe). 

यासोबत पापड, लोणचं, कढी किंवा ताक असेल तर जेवणाची रंगत आणखीनच वाढते. हे सगळे जरी खरे असले तरी थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला जास्त पोषण मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या काळात आपण खात असलेल्या अन्नातून नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा मिळायला हवी. यासाठी नेहमीच्याच पदार्थांमध्ये थोडे बदल केल्यास त्याचे पोषण वाढण्यास मदत होते. पाहूयात हिवाळ्यात नेहमीचीच खिचडी जास्त पौष्टीक करण्यासाठी नेमकं काय करायला हवं...

(Image : Google)

१. दाणे, तीळ खोबरं

शेंगादाणे आणि तीळ यांमध्ये प्रोटीन तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड, लोह, स्निग्धता चांगल्या प्रमाणात असते. एरवी आपण खिचडी करताना दाणे किंवा तीळ घालत नाही पण थंडीत खिचडीमध्ये हे दोन्ही घटक घातल्यास चव तर चांगली लागतेच पण वरील घटकांमुळे खिचडीतून जास्त ऊर्जा मिळण्यास मदत होते. खोबऱ्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्याने खिचडी करताना त्यामध्ये फोडणीमध्ये किंवा वरुन घेण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा जरुर वापर करायला हवा. 

२. डाळींच्या बाबतीत हे लक्षात ठेवा

आपण खिचडी करताना त्यामध्ये साधारणपणे मूगाचीच डाळ घालतो. ही मूगाची डाळ साधारणपणे पिवळी असते. त्यापेक्षा हिरवी सालं असणारी मूगाची डाळ वापरावी ती अधिक पोषण देणारी ठरते. इतकंच नाही तर फक्त मूगाची डाळ वापरण्यापेक्षा तूर, मसूर थोडीशी उडीद आणि अगदी थोडी हरभऱ्याची डाळही तुम्ही वापरु शकता. यासाठी डाळी स्वच्छ धुवून भिजवून मग खिचडी केली तर त्या छान मऊ शिजतात आणि खिचडीत एकजीव होतात.

(Image : Google)

३. भाज्या आवर्जून घालायला हव्या

खिचडी म्हटल्यावर डाळ आणि तांदूळ इतकेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. पण सिझननुसार किंवा घरात उपलब्ध असलेल्या भाज्या लक्षात घेऊन आपण या खिचडीत भाज्या घालायला हव्यात. यामुळे मुलांच्या पोटात भाज्या जाण्यास मदत होते. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या, फ्लॉवर, कोबी, गाजर, लाल भोपळा, दुधी भोपळा, बीट, मटार, फरसबी अशा उपलब्ध असतील त्या भाज्या बारीक चिरुन घालायला हव्या. त्यामुळे खिचडीसोबतच भाज्याही पोटात जातात आणि पोषण वाढण्यास मदत होते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.