थंडीच्या दिवसांत शरीराला नेहमीपेक्षा जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. अशावेळी शरीराला पोषण देणारे पदार्थ खाण्यावर आपला भर असतो. थंडीत हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराची ताकद टिकून राहण्यासाठी शरीराला प्रोटीनही जास्त मिळणे गरजेचे असते. प्रोटीन म्हटले की शाकाहारात एकतर दुधाचे पदार्थ किंवा डाळी हे आपल्याला माहित असते. पण हे दोन्ही आपण एका मर्यादेपर्यंतच खातो. अशावेळी जास्त प्रोटीन मिळण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन बार खातो, पण यांची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे हे प्रोटीन बार विकत घेण्यापेक्षा घरीच प्रोटीन बार केले तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते खाता येतात. यामध्ये सुकामेवा आणि सगळे नैसर्गिक घटक असल्याने ते खाणे आरोग्यासाठीही अतिशय चांगले असते. पाहूयात थंडीच्या दिवसांत हाडे बळकट राहण्यासाठी आणि शरीराचे पोषण होण्यासाठी घरच्या घरी प्रोटीन बार कसा तयार करायचा (Winter Special Home made Protein Bar Recipe) .
साहित्य -
१. ओटस - १ वाटी
२. खजूर - १ वाटी
३. काजू - १ वाटी
४. बदाम - १ वाटी
५. पिस्ते - पाव वाटी
६. आक्रोड - अर्धी वाटी
७. तीळ - पाव वाटी
८. खोबऱ्याचा कीस - अर्धी वाटी
९. मध - अर्धी वाटी
१०. वेलची पावडर - अर्धा चमचा
११. तूप - १ चमचा
कृती -
१. कढईत बदाम, काजू, पिस्ते, आक्रोड चांगले भाजून घ्या.
२. गार झाल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवा पण थोडे ओबडधोबड ठेवा.
३. तीळ आणि खोबरे मंद आचेवर परतून घ्या.
४. त्याच कढईत तूप घालून त्यात बिया काढलेला खजूर चांगला परतून घ्या.
५. यामध्ये सुकामेवा पूड आणि तीळ व खोबरे घालून चांगले एकजूव करा.
६. मध आणि आणखी थोडे तूप घालून वेलची पावडर घाला.
७. ओटस भाजून त्याची मिक्सरवर बारीक पूड करुन ती या मिश्रणात घाला.
८. मिश्रण एकजीव झाल्यावर एका ताटात पसरुन घ्या आणि मग त्याच्या एकसारख्या वड्या पाडा.