थंडीच्या काळात बाजारात भरपूर भाज्या येतात. मुळा ही या काळात आवर्जून मिळणारी एक अतिशय उपयुक्त भाजी. पण मुळ्याला उग्र वास असल्याने अनेक जण ही भाजी पाहून नाक मुरडतात. मात्र मुळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने तो खायलाच हवा. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दीच्या तसेच पचनाच्या समस्यांवर मूळा अतिशय फायदेशीर ठरतो. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी मुळा खाणे अतिशय चांगले असते (winter special Radish muli paratha recipe).
मुळ्यात भरपूर प्रमाणांत जीवनसत्वे असतात, मुळा शरीरासाठी उपयुक्त असतो. मुळ्याची आपण कधी भाजी करतो तर कधी कोशिंबीर किंवा चटका. याशिवाय मुळ्याचा आणखी एक पदार्थ अतिशय चविष्ट लागतो तो म्हणजे मुळ्याचे गरमागरम पराठे. हे पराठे नाश्ता, जेवण अशा कोणत्याही वेळी मस्त लागतात.विशेष म्हणजे मुलं मुळा खात नसतील तर पराठा केल्याने त्यामध्ये कोणती भाजी घातलीये हे अनेकदा त्यांना लक्षात येत नाही.
साहित्य -
१. मुळा - २ वाटी (किसलेला)
२. गव्हाचे पीठ - २ ते ३ वाट्या
३. ओवा - अर्धा चमचा
४. तीळ - अर्धा चमचा
५. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा
६. मीठ - चवीनुसार
७. आलं-मिरची लसूण पेस्ट - १ चमचा
८. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी
९. हिंग - पाव चमचा
१०. हळद - अर्धा चमचा
११. तेल - २ चमचे
कृती -
१. स्वच्छ धुवून, सालं काढून किसून घ्यायचा.
२. यामध्ये बसेल तेवढी कणीक घालायची.
३. आलं-मिरची लसूण यांची बारीक पेस्ट करुन यामध्ये घालायची.
४. या पीठात मीठ, हिंग, हळद, धणे-जीरे पावडर, तीळ, ओवा घालायचे.
५. २ चमचे तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे पीठ आधी हाताने एकजीव मळून घ्यायचे.
६. मीठ घातल्यानंतर मुळ्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे गरज वाटल्यास अंदाज घेऊनच पाणी घालायचे.
७. पीठ चांगले घट्टसर मळून १० मिनीटे झाकून ठेवावे.
८. एकसारखे गोळे करुन पराठे लाटून ते तव्यावर खरपूस भाजावेत.
९. भाजताना आवडीनुसार तेल किंवा तूप घालावे.
१०. दही, चटणी, लोणचं यांच्यासोबत हे पराठे छान लागतात.