बहुतेकजणांना पांढऱ्याशुभ्र मुळ्याची भाजी फारशी आवडत नाही. मुळ्याच्या भाजीला येणारा उग्र वास अनेकांना आवडत नाही, त्यामुळे काहीजण ही भाजी खाणेच टाळतात. जेवणाच्या ताटात मुळ्याची भाजी असेल तर पाहून अनेकजण नाकं मुरडतात. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही न आवडणारी ही मुळ्याची भाजी मात्र पौष्टिक आणि हेल्दी असते. थंडीच्या काळात बाजारात भरपूर भाज्या येतात. मुळा ही या दिवसांत आवर्जून मिळणारी एक अतिशय उपयुक्त भाजी आहे. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दीच्या तसेच पचनाच्या समस्यांवर मूळा अतिशय फायदेशीर ठरतो. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी मुळा खाणे अतिशय चांगले असते(winter special Radish muli paratha recipe).
मुळ्यात भरपूर प्रमाणांत जीवनसत्वे असतात, मुळा शरीरासाठी उपयुक्त असतो. मुळ्याची आपण कधी भाजी करतो तर कधी कोशिंबीर. याशिवाय मुळ्याचा आणखी एक पदार्थ अतिशय चविष्ट लागतो तो म्हणजे मुळ्याचे गरमागरम पराठे. हे पराठे नाश्ता, जेवण अशा कोणत्याही वेळी मस्त लागतात.विशेष म्हणजे मुलं मुळा (Mooli Paratha) खात नसतील तर पराठा केल्याने त्यामध्ये कोणती भाजी घातलीये हे अनेकदा त्यांना लक्षात येत नाही. जर घरात कुणीही मुळा खात नसेल तर आपण मुळ्यापासून झटपट तयार होणारे मुळ्याचे पराठे तयार करु शकतो. मुळ्याचे पराठे तयार करण्याची सोपी रेसीपी पाहूयात(Winter Special Mooli Paratha Quick, Easy & Delicious Recipe.)
साहित्य :-
१. मुळा - ५ ते ६
२. मुळ्याचा पाला - १ कप
३. मीठ - चवीनुसार
४. गव्हाचे पीठ - १ कप
५. ओवा - १ टेबलस्पून
६. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
७. पाणी - गरजेनुसार
८. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
९. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१०. गरम मसाला - १ टेबलस्पून
११. जिरेपूड - १ टेबलस्पून
१२. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
१३. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक किसलेलं)
१४. हळद - १ टेबलस्पून
हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...
कृती :-
१. सगळ्यांतआधी मुळ्याची सालं सोलून आणि त्याचा पाला वेगळा कापून घ्यावा. आता सालं काढून घेतलेला मुळा किसणीवर बारीक किसून घ्यावा, त्यानंतर मुळ्याचा पाला बारीक चिरुन घ्यावा. आता एका बाऊलमध्ये किसलेला मुळा आणि मुळ्याचा पाला घेऊन त्यात थोडेसे मीठ घालून ते कालवून घ्यावे. थोडावेळ हे मिश्रण असेच ठेवावे.
२. आता एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, ओवा, तेल घालून गरजेनुसार पाणी घालत पीठ मळून घ्यावे. मळून घेतलेले पीठ थोड्यावेळासाठी झाकून ठेवावे.
३. मीठ लावून ठेवलेला मुळ्याचा किस आणि पाला एका कॉटनच्या सुती कापडात गुंडाळून त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात हळद, आमचूर पावडर, जिरेपूड, लाल तिखट मसाला, गरम मसाला, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं घालावं. अशाप्रकारे मुळ्याचा पराठा तयार करण्यासाठीचे सारण तयार आहे.
४. आता मळून ठेवलेल्या पिठाचे गोळे करून घ्यावेत. हे कणकेचे गोळे हातांनी दाब देत मधोमध खोलगट करून घ्यावे. मग यात मुळ्याचे तयार सारण भरून असा स्टफिंग करुन घेतलेला कणकेचा गोळा चपातीप्रमाणे लाटून पराठा तयार करुन घ्यावा.
५. तव्यावर थोडेसे तेल किंवा तूप घालून पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
मुळ्याचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. चटणी किंवा सॉससोबत हा गरमागरम पराठा खाण्यासाठी सर्व्ह करावा.