थंडी आणि हलवा यांची घट्ट मैत्री आहे. थंडी पडायला लागली की घरोघरी गाजराचा हलवा, दुधी भोपळ्याचा हलवा केला जातो. थंडीत हलवा खाणं पौष्टिक मानलं जातं. पण गाजर आणि दुधी शिवाय पौष्टिक हलव्याचे चार प्रकार आहेत. खास थंडीत हे प्रकार खायलाच हवेत. हलव्याचे हे प्रकार चवीची मेजवानी तर देतातच शिवाय हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी आवश्यक शरीरास पोषक गुणधर्मही पुरवतात.
Image: Google
बदामाचा हलवा
बदामाचा हलवा हा चविष्ट आणि पौष्टिक मानला जातो. बदामाचा हलवा तयार करण्यासाठी पाव किलो बदाम , 3 मोठे चमचे साजूक तूप, 10 मोठे चमचे साखर आणि 1 कप दूध घ्यावं.
बदामाचा हलवा करताना आधी गरम पाण्यात बदाम थोडे उकळून घ्यावेत. बदाम पाण्यातून काढून सोलून घ्यावेत. सोललेले बदाम मिक्सरमधून गरमरीत वाटून घ्यावेत. एका कढईत साजूक तूप गरम करुन घ्यावं. त्यात बदामाची पेस्ट घालून ती भाजावी. नंतर लगेच त्यात साखर घालावी. मध्यम आचेवर हे मिश्रण लालसर भाजावं. हलवा लालसर भाजला गेला की त्यात दूध घालून ए आटेपर्यंत हलवा परतत राहावा. नंतर गॅस बंद करावा. शेवटी हलव्यावर थोडे बदामाचे तुकडे घालावेत.
Image: Google
गुळाचा हलवा
गुळाचा हलवा हा अतिशय पौष्टिक गोडाचा पदार्थ म्हणून ओळखला जातो. कोणत्याही ऋतूत हा हलवा छानच लागतो. पण हिवाळ्यात हा हलवा शरीरास ऊब आणि पोषण असं दोन्हीही पुरवतो.
गुळाचा हलवा करण्यासाठी अर्धा चमचा साजूक तूप, 1 कप रवा, 50 ग्रॅम गूळ ( पाण्यात विरघळून घेतलेला) अर्धा चमचा वेलची पावडर, एक चिमूटभर केसर, थोडे बदामाचे तुकडे, 4 मोठे चमचे ब्राऊन शुगर हे जिन्नस घ्यावं.
गुळाचा हलवा करताना आधी रवा पाण्यात 20 मिनिटं भिजवावा. नंतर कढईत तूप गरम करुन त्यात पाण्यात भिजवलेला रवा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात गुळाचं पाणी घालावं. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. नंतर वेलची पावडर, बदामाचे तुकडे आणि ब्राऊन शुगर घालून मिश्रण पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यावं. मिश्रण चांगलं दाटसर झालं की गुळाचा हलवा तयार झाला असं समजावं आणि गॅस बंद करावा. गुळाचा हलवा गरम गरमच खावा.
Image: Google
काजूचा हलवा
काजूचा हलवा म्हणजे सुपर रिच मानला जातो. हा हलवा करण्यासाठी 1 कप काजू, 1 कप साखर, अर्धा कप तूप, अर्धा कप गव्हाचं पीठ, गरजेनुसार पाणी, 6 बारीक केलेले बदाम, थोडी वेलची घ्यावी.
काजूचा हलवा करण्यासाठी आधी मिक्सरमधून काजूची पूड करुन घ्यावी. एका कढईत पाणी घेऊन ते उकळावं. पाणी उकळलं की त्यात साखर टाकवी. साखर आणि पाण्याचं हे मिश्रण 5 मिनिटं उकळू द्यावं. नंतर गॅस बंद करावा.
एका नॉन स्टिक कढईत तूप गरम करावं. गरम तुपात गव्हाचं पीठ घालून ते चांगलं भाजून घ्यावं. भाजताना गव्हाच्या पिठात गुठळी राहू नये याची काळजी घ्यावी. गव्हाचं पीठ भाजलं गेलं की त्यात काजूची पूड घालावी. हे मिश्रण रंग बदलेपर्यंत परतत राहावं. तूप सुटायला लागलं की ते भाजलं गेलं असं समजावं. आता या भाजलेल्या मिश्रणात साखरेचं पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर हलवा चांगला हलवून घ्यावं. हलवा पातळ वाटल्यास पाणी आटेपर्यंत हलवत राहावा. नंतर हलव्यात वेलची पूड, बदामाचे तुकडे घालावेत.
Image: Google
पेरुचा हलवा
पेरुचा हलवा होतो हे माहित आहे का? पेरुचा हलवा होतो आणि तो इतका चविष्ट लागतो की सारखा खावासा वाटतो.
पेरुचा हलवा करण्यासाठी अर्धा किलो पेरु, पाव किलो किंवा थोडी कमी साखर, पाव कप साजूक तूप, 2-3 मोठे चमचे कापलेले बदाम, 2-3 मोठे चमचे कापलेले काजू, अर्धा लिटर दूध, अर्धा चमचा वेलची पूड घ्यावी.
पेरुचा हलवा करण्यासाठी आधी खवा करुन घ्यावा. दुधाचा खवा करायचा नसेल तर आत पाव खवा किंवा 100 ग्रॅम मिल्क पावडर घ्यावी. पेरुचे मोठे मोठे तुकडे करुन घ्यावेत. एका भांड्यात हे तुकडे घ्यावे, त्यात एक छोटा तुकडा बिटाचा टाकावा, अर्धा कप पाणी घालून कुकरमधे ठेवून एक शिट्टी घ्यावी. कुकरची वाफ गेल्यानंतर शिजलेले पेरु काढून घ्यावेत. ते थंड होवू द्यावेत. ते थंड झाले की मिक्सरमधून त्याची पेस्ट करुन घ्यावी.
ही पेस्ट गाळणीने गाळून घ्यावी. बियांचा भाग टाकून द्यावा. कढईत तूप घालून ते गरम करावं. त्यात कापलेले बदाम आणि काजू घालावेत आणि ते हलकेसे परतून घ्यावेत. नंतर त्यात पेरुची पेस्ट घालावी. ही पेस्ट किमान चार मिनिटं परतून घ्यावी. नंतर त्यात साखर घालावी. साखर विरघळेपर्यंत मिश्रण परतत राहावं. साखर विरघळली की त्यात खवा घालावा. पुन्हा हे मिश्रण 3-4 मिनिटं परतून घ्यावं. नंतर त्यात वेलची पावडर घालावी. पुन्हा हलवा 3-4 मिनिटं परतावा. नंतर हा हलवा एका भांड्यात काढून घ्यावा. हा हलवा गरम गरम खावा.