सायली जोशी- पटवर्धन
पुरुष म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय करुन पैसे कमावणारा आणि स्त्री म्हणजे घरातील जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करणारी असं गणित सध्या आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. स्वयंपाकघरात पुरुषांचे काय काम, त्यांनी सतत स्वयंपाकात लुडबूड करु नये अशी वाक्ये आपण आजही आजीच्या तोंडून ऐकतो. पण स्त्री ज्याप्रमाणे बाहेर पडली त्याप्रमाणे पुरुष मात्र अजून पूर्णपणे स्वयंपाकघरात आला नाही. याचा परिणाम म्हणजे स्त्रीवर येणारा ताण. घरातील इतर कामे, स्वयंपाक, इतर जबाबदाऱ्या आणि नोकरी करताना तिची होणारी तारांबळ. पण ठरवले तर पुरुषही स्वयंपाक करु शकतात. कधी आवड म्हणून तर कधी गरज म्हणून पुरुष ओट्यापुढे उभा राहिला तर बिघडलं कुठं. पण अजूनही पुरुषांना आणि स्त्रियांनाही हे म्हणावे तसे मान्य होत नाही. जागतिक महिला दिनाच्या (Women’s Day 2022) निमित्ताने १५ वर्षांपासून पुण्यात कुकींग क्लासेस चालवणाऱ्या मेधा गोखले यांच्याशी लोकमतसखीने साधलेला संवाद...
फक्त पुरुषांचे कुकींग क्लासेस असावेत असे का वाटले आणि सुरुवात कुठून झाली?
- नाटक, चित्रपट क्षेत्रात काम करत असताना मला अनेकदा मुंबईचे दौरे करावे लागायचे. त्यावेळी माझ्या २ लहान मुली आणि माझा नवरा हे पुण्यात असायचे. पण त्यावेळी आतासारखे डबे मिळणे, खानावळ अशी म्हणावी तितकी सोय नव्हती. अशावेळी त्यांची अडचण व्हायची. आपल्या कुटुंबाप्रमाणे इतरही अनेकांची स्त्री घरात नसताना जेवणाची अडचण होत असणार हा विचार नेहमी डोक्यात असायचा. याच विचारातून एकदा मी पुरुषांसाठी कुकींग क्लासेस सुरु करुयात असं ठरवलं. विशेष म्हणज गेली १५ वर्ष मी याच क्षेत्रात आता काम करत आहे आणि माझ्या क्लासना उत्तम प्रतिसादही मिळत आहे.
पुरुषांच्या कुकींग क्लासेसचा तुमचा अनुभव कसा आहे?
- मला सुरुवातीपासूनच अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला परदेशात जाणाऱ्या पुरुषांसाठी हा क्लास असेल असा काहींचा समज होता. मात्र माझ्याकडे सुरुवातीपासूनच अगदी १६ ते १७ वर्षे वयाच्या मलुापासून ते ७८ वर्षांच्या हाय कोर्टमधून न्यायाधीश पदावरुन निवृत्त झालेल्या व्यक्तींपर्यंतचे लोक येतात. त्यामुळे ज्यांना पोट आहे आणि ज्यांना खायला लागते त्यांना खायला करता यायलाच हवे. यात स्त्री-पुरुष असा भेदभाव असता कामा नये असे मला वाटते. इतर सगळ्या गोष्टी जर स्त्रीया पुरुषांप्रमाणे करत असतील तर पुरुषांनीही स्वयंपाकाचा भाग असायलाच हवे.
नेमके कोणत्या प्रकारचे पुरुष या क्लासेसना येताहेत? गेल्या १५ वर्षाच हा ट्रेंड कसा बदललाय?
गरज म्हणून शिकणारे पुरुष असतातच. पण स्वयंपाकाची आवड म्हणून अनेकदा आपल्याला अमुक एक गोष्ट येत नाही तर तीही यायला हवी, आपलं काही अडायला नको असा विचार करुन स्वयंपाक शिकण्यासाठी येणारे असंख्य पुरुष आहेत. सुरुवातीला साधारमपणे गरज म्हणून स्वयंपाक शिकणारे जास्त होते. मात्र गेल्या काही वर्षात हा ट्रेंड बदलला आहे. दोघांनाही सगळं आलं पाहिजे या हेतूने स्वयंपाक शिकणारे पुरुष सध्या आहेत.
स्वयंपाक म्हणजे महिला हे गणित अनेक वर्ष अतिशय ढोबळमानाने होते, पण गेल्या काही वर्षात हे काही प्रमाणात बदलत आहे त्याबद्दल काय सांगाल?
- स्वयंपाक म्हणजे स्त्रीचे राज्य किंवा ती स्वयंपाकघराची सम्राज्ञी असे म्हटले जायचे. पण आता हे समीकरण बदलत आहे. पुरुष शेफ असू शकतात पण स्वयंपाकघरात मात्र ते काम करत नाहीत असं पूर्वी असायचं. आता स्त्री आणि पुरुष या दोघांचीही मानसिकता बदलली आहे. आता पुरुष घरात सर्रास चहा करणे, कुकर लावणे, खिचडी करणे, नाश्त्याचा एखादा पदार्थ करणे, भाजी निवडणे, चिरुन देणे अशा सगळ्या गोष्टी स्वखुशीने करतात.
पुरुष स्वयंपाक करणार म्हणजे त्यांना सगळी तयारी करुन द्यायची मग ते फक्त मुख्य पदार्थ करणार आणि नंतरचा पसाराही आपणच आवरा त्यापेक्षा आपण करु असं अनेकदा महिलांचं मत असतं त्याविषयी थोडक्यात सांगा.
- हे बऱ्याच प्रमाणात खरं आहे. याचं कारण म्हणजे पूर्वी घरात आई, बायको, बहिणी, आत्या, काकू अशा बऱ्याच स्त्रिया असल्याने पूर्वी पुरुषाला स्वयंपाकघरात येण्याची गरजच नव्हती आणि महिलांनाही हे आपले अधिराज्य आहे असे वाटायचे. मग पुरुष कधीतरी काहीतरी करणार म्हटल्यावर त्याला सगळी तयारी करुन देणं आले, किंवा शंभर सुचना देणे आले. त्यापेक्षा आपणच पटकन केलेलं बरं असं म्हणून महिलांनी स्वयंपाकघर ही कायम स्वत:ची मक्तेदारी ठेवली. महिलांनीही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. क्लासमध्ये मी पुरुषांना शिकवत असताना नियोजन, स्वयंपाक आणि हातासरशी आवरुन टाकणे अशा सगळ्या गोष्टी शिकवते. तेही तितक्याच आवडीने सगळं करतात आणि शिकतातही.