पूजेत नारळाला महत्त्वाचं स्थान आहे. जे देवासाठी महत्त्वाचं ते माणसाच्या आरोग्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. नारळाचं हे महत्त्वं सर्वांना पटावं यासाठीच 2 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
सन 2009 पासून जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो. हा दिवस आशियाई देश आणि प्रशांत नारळ समूह साजरा करतात.नारळ हे उद्योग निर्मितीस चालना देणारा घटक आहे. त्यामुळे नारळ लागवडीची प्रेरणा देणे, नारळाशी संबंधित उद्योगांना प्रोत्साहन देणे या उद्देशानं जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी जागतिक नारळ दिवसाची एक थीम असते. यंदाची थीम ही कोविड 2019 महामारीच्या पलिकडे एक सुरक्षित , समावेशक,लवचिक आणि स्थिर नारळ समूह निर्माण करणे ही आहे .ओलं नारळ आणि सुकं खोबरं दोन्हीही नारळाची रुपं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे आहारात नारळाचा समावेश अवश्य करायला हवा असं आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ सांगतात. गुणी नारळापासून गोड तिखट चवीचे अनेक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करता येतात.
नारळाचे पोषण गुणधर्म
1. 1 ते 7 सप्टेंबर हा सप्टेंबरमधला पहिला आठवडा हा ‘राष्ट्रीय पोषण आठवडा’ म्हणून साजरा केला जातो. याच आठवड्यात 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो. आरोग्याच्या पोषणाच्या दृष्टीने नारळातले घटक हे खूप फायदेशीर आणि परिणामकारक असतात. पोषण तज्ज्ञ सांगतात की नारळात प्रथिनं, फायबर, मॅग्नीज, तांबं, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशिअम, कर्बोदकं आणि आरोग्याच्या दृष्टीनं चांगले फॅटस मोठ्या प्रमाणात असतात. नारळात असलेले फॅटस हे इतर आहार घटकातील फॅटसच्या तुलनेने लवकर शोषले जातात आणि त्याचा शरीरावर परिणामही इतर फॅटसच्या तुलनेत वेगळा होतो. नारळामधले फॅटस हे शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि चरबी कमी करण्यास मदतही करतात.2. नारळात कर्बोदकं असतात पण त्यांचं प्रमाण अतिशय कमी असतं. त्या तुलनेत नारळात फायबर आणि चांगले फॅटस भरपूर असतात. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहातं. नारळातील फायबरचं पचन हळूहळू होतं आणि नारळातले हे गुणधर्म इन्शुलिनची संवेदनशिता वाढवतात.3. अनेक संशोधनात हे दिसून आलं आहे की ओलं खोबरं नियमित खाल्ल्यानं हदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो. शुध्द खोबर्याच्या तेलाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.4. ओल्या खोबर्यात फेनोलिक घटक समूह असतो. हा समूह पेशींचं ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवतो. हा फेनोलिक घटक समूह म्हणजे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. तसेच नारळात असलेल्या पॉलीफेनॉल कोलेस्ट्रॉलमुळे रक्त वाहिन्यात गुठळ्या होण्यापासून संरक्षण मिळतं.नारळातल्या या विविध गुणधर्मांचा उपयोग शरीरास होण्यासाठी नारळाचं पाणी पिणं, ओलं खोबरं नुसतं खाणं, ओल्या खोबर्याच्या विविध पाककृती करणं, स्वयंपाकात नारळाचं शुध्द तेल वापरणं, नारळाचं दूध , सुकं खोबरं या विविध स्वरुपात नारळ आहारात असायला हवं.
नारळाच्या चविष्ट आणि पौष्टिक पाककृती
नारळाचं आइस्क्रिम
छायाचित्र:- गुगल
ताज्या आंब्याचा गर आणि नारळाचं दूध एकत्र करुन इटालियन पेनाकोटा हा गोड पदार्थ तयार केला जातो. पण हेच घटक वापरुन आपण नारळाचं आइस्क्रीम करु शकतो. हे आइस्क्रीम अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असतं. यात असलेल्या फायबर आणि जीवनसत्त्वांच्या विपुलतेमुळे नारळाचं आइस्क्रिम खाऊन शरीरास फायदाच होतो. आंब्याच्या सीझनमधे आंब्याचा गर टाकून हे आइस्क्रिम करावं. एरवी नारळाचं आइस्क्रीम करताना एक कप दूध, अर्धा चमचा कॉर्न फ्लोअर, पाव कप दूध पावडर, एक मोठा चमचा लिक्विड ग्लुकोज, एक कप व्हीप क्रीम, पाव कप कंडेन्स्ड मिल्क, पाऊण कप नारळाचं दूध, शहाळ्यातली पाव कप मलई आणि पाव चमचा कोकोनट इसेन्स घालावं.नारळाचं आइस्क्रीम करताना आधी भांड्यात दूध घ्यावं. त्यात कॉर्न फ्लोअर, साखर आणि दूध पावडर मिसळून ती दुधात एकजीव करावी. मग हे दूध गॅसवर ठेवावं. ते सतत ढवळत राहावं. दूध तापलं की त्यात लिक्विड ग्लुकोज घालावं. तोपर्यंत एका भांड्यात व्हीप क्रीम घेऊन ते घुसळावं. नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालावं, नारळाची मलई मिक्सरमधे वाटून त्यात घालावी. आणि हे मिर्शण पुन्हा ब्लेण्डरनं घुसळावं. नंतर त्यात गार झालेलं दुधाचं मिश्रण घालावं. पुन्हा ब्लेण्डरनं हे मिश्रण घुसळून घ्यावं. नंतर त्यात नारळाचं दूध घालावं. मिश्रण पुन्हा ब्लेण्डरनं घुसळून घ्यावं. शेवटी यात कोकोनट इसेन्स घालावा. मिश्रण व्यवस्थित हलवून आइस्क्रीमच्या भांड्यात काढावं. आणि फ्रीज सेट करुन ते फ्रीजरम्धे भांडं झाकून ठेवावं. तीन चार तासात आइस्क्रीम तयार होतं.
नारळ आणि पनीर कोफ्ते
छायाचित्र:- गुगल
कोफ्ते करण्यासाठी पाच उकडून स्मॅश केलेले बटाटे, एक कप खोवलेलं नारळ, एक कप दूध, एक कप किसलेलं पनीर, अर्धा कप बेसन , थोडंसं तांदळाचं पीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, 3 ते 4 टमाटे, 3 चमचे साखर, 1 चमचा जिरे, थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसर तेल घ्यावं.सर्वात आधी बटाटे आणि पनीर एकत्र मळून घ्यावं. नंतर त्यात बेसन, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि लाल तिखट घालावं. नंतर या मिश्रणाचे कोफ्त्याच्या आकाराचे गोळे करावेत. नंतर हे कोफ्ते तांदळाच्या पिठात घोळावेत. कढईत तेल गरम करावं. तेलात कोफ्ते सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. तळलेले कोफ्ते एका ताटात काढून ठेवावेत. फोडणीसाठी तेल घेवून त्यात टमाट्याची प्युरी घालावी आणि ती चांगली परतावी. ती परतली गेली की त्यात दूध, खोवलेलं नारळ आणि चवीनुसार मीठ घालावं. मिर्शण उकळलं की त्यात तळलेले कोफ्ते घालावेत. कोफ्ते घातल्यावर थोडावेळ ते त्यात शिजू द्यावेत. नारळाचे कोफ्ते पुरी, पराठे, पोळी यासोबत छान लागतात.
नारळाची खीर
छायाचित्र:- गुगल
स्पेशल खीर खायची असल्यास नारळाची खीर करावी. नारळाची खीर करण्यासाठी दोन वाट्या खोवलेलं खोबरं म्हणजेच नारळाचा चव, एक लिटर सायीचं दूध, 2-3 चमचे खसखस, 2-3 चमचे साजूक तूप, 7-8 काजू, अर्धी वाटी साखर, 6-7 बदाम,4-5 पिस्ते , 10-15 बेदाणे, 2-3 चमचे सुक्या खोबर्याचा किस, केशर, वेलची पावडर आणि एक चमचा ताजी साय एवढं साहित्य घ्यावं.नारळाची खीर करताना नारळ फोडून घ्यावं. खोबर्याची तपकिरी पाठही काढून घ्यावी. खोबरं खोवून घ्यावं. एका वाटीत पाणी घेऊन त्यात खसखस दहा मिनिटं भिजत घालावी. दहा मिनिटानंतर भिजलेली खसखस वाटून घ्यावी. सुक्यामेव्याचे बारीक काप करुन घ्यावेत.जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळायला ठेवावं. एक कढईत एक चमचा तूप घालावं, त्यात एक एक करुन सर्व सुकामेवा परतून घेऊन तो बाजूला ठेवावा. नंतर त्याच कढईत पुन्हा एक चमचा तूप घालून खसखशीची पेस्ट एक दोन मिनिटं परतून घ्यावी आणि तीही बाजूला काढून ठेवावी. नंतर कढईत एक चमचा तूप घालून खोवलेलं खोबरं सात आठ मिनिटं छान परतून घ्यावं. हे सर्व परते आणि भाजेपर्यंत दूध उकळतं. आता या दुधात परतलेला नारळाचा चव आणि खसखस पेस्ट घालावी. हे घातल्यानंतर 10 ते 15 मिनिटं दूध सतत ढवळत राहावं. नंतर त्यात साखर, केशर, सुकामेवा घालावा. परत खीर पाच ते सात मिनिटं उकळावी. खीरीला पुन्हा उकळी फुटली की त्यात वेलची पूड, सुक्या खोबर्याचा कीस आणि ताजी साय घालावी. पुन्हा पाच मिनिटं खीर ढवळत तिला उकळी फुटी दिली की नारळाची पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर तयार होते.
नारळाचा पराठा
छायाचित्र:- गुगल
नारळाचा खमंग चवीचा पराठा करण्यासाठी एक नारळ , 2 कप मैदा, 1 कप कोमट दूध, अर्धा कप साजूक तूप, 2 चमचे पीठी साखर, 2 चमचे रवा, अर्धा कप साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा वेलची पूड घ्यावी.आधी नारळ फोडून ते खोवून घ्यावं. एका ताटात मैदा, रवा आणि पीठी साखर घालून ते एकत्र करावं. त्यात हळूहळू तूप घालावं, बेकिंग पावडर आणि चवीपुरती मीठ घालून मिर्शण मळून घ्यावं. मैदा मळताना त्यात पाणी न घालता दूध वापरावं. मैदा सैल मळू नये. पुरीच्या कणकेप्रमाणे मैदा घट्ट मळावा.खोवलेल्या खोबर्यात साखर आणि वेलची पावडर टाकून ती नीट एकत्र करावी. चव येण्यासाठी यात काजू किंवा बदाम पूडही घालावी. भिजवलेला मैदा थोडा वेळ मुरल्यानंतर त्याच्या दोन लाट्या घ्याव्यात. एक लाटी मोठी लाटावी आणि एक पहिल्या लाटीपेक्षा थोडी छोटी लाटावी. यामुळे खोबर्याचं सारण बाहेर येत नाही. मोठी पोळी खाली ठेवावी. त्यावर दोन चमचे खोबर्याचं सारण घालावं. त्यावर छोटी पोळी ठेवावी. आणि पोळीचे काठ बंद करुन घ्यावेत. सारण भरल्यानंतर पराठा लाटू नये. तवा गरम करुन पराठा तूप लावत खमंग भाजावा. पराठा दोन्ही बाजूने भाजावा. हा नारळाचा गोड पराठा दूध किंवा दह्यासोबत छान लागतो.
ओटस आणि नारळाचा डोसा
छायाचित्र:- गुगल
ओटस आणि नारळाचा डोसा अतिशय पौष्टिक असतो. हा डोसा तयार करण्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप कणिक, 1 कप ओटसचं पीठ, अर्धा कप खोवलेलं नारळ, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ आणि तेल घ्यावं.डोसा करताना आधी तांदळाचं पीठ, कणिक आणि ओटसचं पीठ एकत्र करावं. त्यात बारीक चिरलेली मिरची, खोवलेलं खोबरं लाल तिखट आणि मीठ घालावं. पाणी घालून डोश्याचं पीठ तयार करावं. हे मिश्रण रात्रभर तसंच राहू द्यावं. दुसर्या दिवशी डोसे करताना तवा गरम करावा. तेल लावावं. डोशाचं पीठ घालून तो पसरुन घ्यावा. डोशावर थोडं तेल घालावं. डोसा दोन्ही बाजूने भाजावा. नारळाच्या चटणीसोबत छान लागतो.