७ जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन (World food safety day) म्हणून साजरा केला जातो. आपण घरी तर स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घेतो. पण सुरक्षेचं काय? स्वच्छ्ता आणि सुरक्षितता. दोन्ही गोष्टी एकत्र येतात. विशेषतः अन्न किंवा जेवणखाण या बाबतीत. आता आपण भारतीय वैयक्तिक किंवा घरगुती स्वच्छतेच्या बाबतीत अती सावधान असतो. कोरोना काळात तर आपण काय काय स्वच्छता बाळगली.
म्हणजे अगदी वॉशिंग मशीनमध्ये भाज्या धुणे, ते उन्हात सामान ठेवणे, कूकरच्या वाफेने भांडी निर्जंतुक करणे, जे जे सुचेल ते ते करत व्हायरसला हरवण्यासाठी प्रयत्न केले. अर्थात आता हे प्रकार आपण करत नाहीत, पण खाण्यापिण्यासंदर्भात आपल्या स्वच्छतेच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. आपण घरात तरी स्वयंपाक करताना सगळं चकाचक करून घेतो. म्हणजे आपण काय काय करतो पाहा.
आपण स्वच्छ पाण्याच्या नावाखाली आधल्या दिवशीचे पाणी ओतून नवे पाणी भरतो. तांदूळ चोळून चोळून धुतो. भाज्या चिरून धुतो. थोडक्यात स्वच्छतेविषयी आग्रही असतो. खूप काळजी घेतो. पण हे सगळं घरी करत असताना संध्याकाळी जाऊन कोपऱ्यावर चायनीज, भेळ खातो, समोसे हदडतो. उघड्यावरील सरबते ढोसतो. रंग घातलेल्या मिठाया, आईस्क्रीम खातो. बिर्याणी गिळतो. किती विरोधाभास आहे. नमनाला इतके तेल ओतायचे कारण येऊ घातलेला म्हणजे आगामी जागतिक अन्न सुरक्षा दिवस. ७ जूनला हा दिवस जगभर साजरा केला जातो, अन्न सुरक्षा आणि अन्नातून होणारी विषबाधा टाळणे यासंदर्भात जनजागृती केली जाते.
आता अन्न सुरक्षा म्हणजे फक्त स्वच्छता अशी समजूत असेल तर चूक.
अन्न सुरक्षा याच्या अंतर्गत अगदी कृषी उत्पादने, त्यावर मारली जाणारी खते, जंतुनाशके. धान्य कशात कसे साठवले जाते त्या जागा, काही अन्न पदार्थांंवरील केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, वापरले जाणारे रंग, पाणी, अगदी अन्न शिजवली जातात ती भांडी, हे सर्व अन्न सुरक्षा या अंतर्गत येते. दुधातील, पनीरमधील भेसळ याबद्दल माहीत असेलच पण अन्न सुरक्षा यामधील हा अगदी छोटा भाग. हा विषय खूप खोल आहे.
आपण आपले रोजच्या आयुष्यातील संदर्भ पाहू..
बाहेर जे तळलेले पदार्थ मिळतात ते तेल परत परत वापरले जाते, तूप म्हणून वनस्पती तूप घेतात, पदार्थ आकर्षक दिसावा यासाठी वाट्टेल तसा रंग मारतात, फळं टिकावीत यासाठी मेण लेप देतात, मोठमोठ्या हॉटेलात घाऊक प्रमाणावर शीतगृहात मसाले, प्राणीज उत्पादने साठवले जातात आणि अनेकदा त्यात बुरशी येते. चायनीजमध्ये चव वाढावी यासाठी विशिष्ट पूड टाकतात, ज्याचे दुष्परिणाम नंतर होतात.
भारतात तर सार्वजनिक ठिकाणी, बऱ्याच हॉटेल्समधे स्वच्छता ही सर्वात तळाशी असते असे चित्र अनेकदा दिसते. अगदी बेसिक नियम पण पाळले जात नाहीत. आपण जे मंचुरियन खातो ते, अथवा पाणीपुरीच्या पुऱ्या कसे तयार होतात हे बघितले तर भूक मरेल, तसे व्हिडिओ अधनंमधनं व्हायरल होतातच.
हे झाले खण्याविषयी, पण सुरक्षा म्हणाल तर ती पण आपण बघत नाही.
किती उदाहरणे आहेत जिथे गॅस सिलिंडरच्या स्फोटाने अनेक बळी गेलेले आढळतील. अन्नातून पुरेसं पोषणही न मिळणं हा मुद्दा आहेच. मुद्दा काय की अन्न सुरक्षा म्हणजे निव्वळ अन्न शिजवताना घेण्याची काळजी नव्हे तर आपण जे खातो किंवा खाणार ते कुठून आले आहे, कसे तयार झाले आहे, हे पण जाणून घेणे. याला एथिकल फुड केअर असे म्हटले जाते. तसेच काहीही अन्नपदार्थ विकत घेताना त्यामधील घटक पदार्थ नीट वाचणे, समजून घेणे पण गरजेचे आहे.
फ्रोजन डेझर्ट आणि आइस्क्रीम यांच्यात काय फरक आहे? जानेवारी फेब्रुवारीत मिळणारे आंबे आणि एप्रिल मे मधे मिळणारी सफरचंद का खाऊ नयेत? विशिष्ट वेळी किंवा ऋतूत विशिष्ट आहार का घ्यावा? ठरावीक पदार्थ ठरावीक भांड्यात का करावेत? हे सर्व अन्न सुरक्षा या खाली येते. आधी म्हटल्याप्रमाणे हा विषय खूप व्यापक आहे. पण काही नेम नियम पाळले आणि सजग राहिले तर आपण आपला खारीचा वाटा उचलू शकतो. निदान आपल्यापुरती तरी आपण अन्न सुरक्षेची काळजी घेऊ शकतो.
शुभा प्रभू साटम
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
shubhaprabhusatam@gmail.com